Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Startup Funding : देशातल्या स्टार्टअप फंडिंगमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत 35%ची घट   

स्टार्ट अप फंडिंग रोडावलं

भारतात स्टार्टअप उद्योग वाढतायत असं चित्र निर्माण झालं आहे. पण, 2022 मध्ये या क्षेत्रासाठीचा वित्त पुरवठा आधीच्या तुलनेत चक्क 35% नी कमी झाला आहे. स्टार्ट अपवरचा गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झालाय का, पाहूया

यावर्षीच्या जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत देशात स्टार्टअपमध्ये (Startup Funding) 24 अब्ज 70 कोटी अमेरिकन डॉलर इतकी गुंतवणूक झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत 37 अब्ज अमेरिकन डॉलर उभे राहिले होते. ट्रॅक्सन (Tracxn) या संशोधन करणाऱ्या संस्थेनं सादर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.    

जगभरात वाढती महागाई (Inflation) आणि त्याला उत्तर म्हणून मध्यवर्ती बँकांनी (Central Bank) अंगिकारलेलं दरवाढीचं धोरण यासाठी कारणीभूत असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. आताच्या जागतिक आर्थिक परिस्थितीवर मंदीचं सावट आहे. अशावेळी एकूणच गुंतवणुकदारांनी आखडता हात घेतला आहे. त्यामुळे स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला गुंतवणूकदार तयार नाहीत.     

एकूण निधीबरोबरच फंडिंग राऊंड्समध्येही (Funding Rounds) घसरण झाली आहे. यावर्षी एकूण 1,841 फेऱ्या पार पडल्या. शेवटच्या फेरीमध्ये मिळणारं फंडिंग तर गेल्यावर्षीच्या तुलनेत 45% नी कमी झालं आहे.     

रिटेल आणि फिनटेक या क्षेत्रातल्या स्टार्टअपना दुभती गाय म्हटलं जातं. त्या नफ्यात येण्याचा वेळ कमी आहे. आणि त्यांची कामगिरीही चांगली असते. पण, यंदाच्या वर्षी असा स्टार्टअपनाही पुरेसा निधी मिळालेला नाही. कंपनी पब्लिक लिमिटेड होईपर्यंत किंवा स्वत:च्या पायावर पूर्णपणे उभी राहीपर्यंत कंपनीला आर्थिक मदतीची गरज पडते. अशा फेऱ्यांनाच लास्ट स्टेज फंडिंग असं म्हणतात. अशी आर्थिक मदत वेळेवर न मिळाल्यामुळेच आणि धंद्यातल्या तोट्यामुळे झोमॅटो (Zomato), ओयो (Oyo) यासारख्या कंपन्यांना नोकर कपात किंवा पगार कपात करावी लागली आहे.     

कंपनीला सुरुवातीला लागणार निधी हा तुलनेनं कमी असतो. त्यामुळे अशा फेरीत गुंतवणुकीची जास्त संधी असते. पण, यंदा पहिल्या फेरीतलं फंडिंगही 45%नी कमी आहे. येणाऱ्या दोन ते तीन तिमाहींमध्ये अशीच परिस्थिती असेल असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.