Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Egg's Price and Export: देशात अंड्यांचा तुटवडा तरीही जानेवारीत तब्बल 5 कोटी अंड्यांची निर्यात होणार

Egg Export

Egg's Price and Export: मागील दोन आठवडे राज्यात अंड्यांचे भाव वाढले आहेत. अनेक शहरांमध्ये अंड्यांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी भाववाढ केली आहे. मात्र असे असतानाही जानेवारी महिन्यात भारतातून अंड्यांची विक्रमी निर्यात होण्याची शक्यता आहे.

एकीकडे देशात आणि महाराष्ट्रात अंड्यांचा तुटवडा जाणवत असला तरी दुसऱ्या बाजूला अंड्यांची निर्यात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भारतातून जानेवारीमध्ये तब्बल 5 कोटी अंड्यांची रेकॉर्डब्रेक निर्यात होण्याची शक्यता आहे. यातील सर्वात मोठा वाटा मलेशियाला निर्यात करण्यात आला आहे.  (India Set to record 50 million egg export in January)

रशिया-युक्रेन युद्धामुळे आशियातील अनेक देशांचे आयात-निर्यातीचे गणित बिघडवलं आहे. त्याचा फटका मलेशियाला देखील बसला आहे. मलेशियाने भारतातून अंड्यांची आयात सुरु केली आहे. भारतासाठी मात्र ही मोठी संधी निर्माण झाली आहे. यापूर्वी भारतातून सिंगापूरला अंडी, पोल्ट्री उत्पादनांची निर्यात केली जात होती. मात्र मलेशियाला मागील काही दिवसांपासून अंड्यांची प्रचंड निर्यात करण्यात आली आहे. चालू जानेवारी महिन्यात भारतातून 5 कोटी अंड्यांची निर्यात होण्याची शक्यता आहे.

मलेशिया, ओमान, कतार या देशांमध्ये अंड्यांची निर्यात करण्यात आली आहे. पहिल्यांदाच मलेशियातून भारतीय अंड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे तामिळनाडुमधील नम्मकलच्या पोनी फार्म्सचे सह व्यवस्थापकीय संचालक सास्ती कुमार यांनी सांगितले. भारतातून मलेशियाला डिसेंबर महिन्यात 50 लाख अंडी निर्यात करण्यात आली होती. जानेवारीमध्ये अंड्यांची निर्यात दुपटीने वाढून ती 1 कोटी पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी मलेशियाला 1.5 कोटी अंड्यांची निर्यात केली जातील , असे कुमार यांनी सांगितले. येत्या काळात श्रीलंका आणि सिंगापूर या देशांमध्ये भारतातून अंड्यांची निर्यात होईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

देशभरात अंडी महागण्याची कारणे (Reasons Behind Rising Egg Price) 

  • पशुखाद्य महागल्याने अंडी उत्पादक पोल्ट्री मालकांचा खर्च वाढला
  • बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले
  • मागील वर्षभरात बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याने 4.3 कोटी कोंबड्या नष्ट करण्यात आल्या
  • नोव्हेंबरमध्ये राष्ट्रीय पातळीवर 100 अंड्यांचा भाव 293.57 रुपये इतका होता
  • जानेवारीत 100 अंड्यांचा भाव 575 रुपये इतका वाढला

महाराष्ट्रात अंडी महागली कारण (Egg Shortfall in Maharashtra)

महाराष्ट्रात दररोज किमान एक कोटी अंड्यांचा तुटवडा भासत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी अंड्यांचे भाव वधारले आहेत.  अंड्यांचा शेकड्याचा दर 500 रुपयांवर गेला आहे. एक डझनचा भाव 85 ते 90 रुपयांच्या दरम्यान आहे. राज्यात दररोज सरासरी किमान अडीच कोटी अंड्यांची मागणी आहे. त्या बदल्यात मागील दोन आठवडे दररोजचा अंड्यांचा पुरवठा निम्म्याने कमी झाला आहे. दररोज किमान 1 ते 1.25 कोटी अंड्यांचा पुरवठा होत आहे. त्यामुळे बहुतांश शहरांमध्ये अंड्यांचे भाव वाढले आहेत.