India Rejected China Proposal: चीनची इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी BYD चा भारतात प्लांट उभारण्याचा आणि 1 अब्ज डॉलर गुंतवणुकीचा प्रस्ताव मंजूर होणे कठीण आहे. सुरक्षेच्या कारणास्तव चिनी इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या BYD ला देशात प्लांट किंवा दुकान उभारण्याची परवानगी देण्यास भारत सहमत नाही. BYD ने स्थानिक कंपनीच्या भागीदारीत भारतात इलेक्ट्रिक कार आणि बॅटरी बनवण्यासाठी 1 अब्ज डॉलर गुंतवणुकीचा प्रस्ताव सादर केला आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव नाकारला प्रस्ताव
सुरक्षेच्या कारणास्तव सीमापार कंपन्यांना भारतीय बाजारपेठेपासून दूर ठेवण्याची सरकारची भूमिका पाहता चीनी कंपन्यांच्या प्रवेशाबाबत गृह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात अस्वस्थता आहे. परदेशी कंपन्यांना भारतात येण्यासाठी स्थानिक कंपन्यांशी करार करावे लागतात. काही प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की, स्थानिक कंपन्या केवळ डमीची भूमिका साकारतात.
चिनी इलेक्ट्रिक कंपनी भारतात वेगाने पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. BYD आणि खाजगी मालकीच्या हैदराबादस्थित मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चरने भारतीय नियामकांना संयुक्त इलेक्ट्रिक वाहन प्लांट बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे.
BYD ची योजना
BYD भारतात हॅचबॅक ते लक्झरी मॉडेलपर्यंत संपूर्ण ईव्ही मालिका आणण्याची योजना आखत आहे. BYD ही ईव्ही आणि प्लग-इन हायब्रिड वाहनांची जगातील सर्वात मोठी उत्पादक आहे आणि टेस्लाला आव्हान देण्यासाठी जागतिक स्तरावर वेगाने विस्तारत आहे. BYD ला भारतात गुंतवणुकीसाठी मान्यता मिळाल्यास, यूएसए वगळता सर्व प्रमुख जागतिक कार बाजारपेठांमध्ये ते अस्तित्व मिळवेल.
याआधीपण चीनच्या ग्रेट वॉल मोटर्सने भारतात आपला विस्तार करण्याचा प्रयत्न केला. भारत सरकारने यापूर्वीपण चीनी कंपन्यांसाठी नियम कडक केले.