सणासुदीच्या काळात देशातील अन्नधान्याच्या किमती स्थिर राहव्यात यासाठी केंद्र सरकारकडून वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सरकारने भारतातून बासमती वगळता साधा तांदूळ निर्यात करण्यास बंदी घातली होती. याचा भारतातून तांदूळ आयात करणाऱ्या देशांवरही परिणाम दिसून आला. दरम्यान आता भारत सरकारने UAE ला नॉन-बासमती तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे.
75,000 टन तांदळाच्या निर्यातीस परवानगी
केंद्र सरकारने देशांतर्गत तांदळाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी 20 जुलैपासून बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. दरम्यान आता सरकारने भारतातून तब्बल 75 हजार टन तांदूळ निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे. हा तांदूळ नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेडद्वारे यूएईला निर्यात केला जाणार आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
निर्यात धोरणात सुधारणा
युएईला तांदूळ देण्याचा निर्णय घेताना सरकारने DGFT नियमानुसार इतर देशांना त्यांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संबंधित देशाच्या सरकारच्या विनंतीनंतर तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. सिंगापूरच्या अन्नसुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारताने गेल्या महिन्यात तांदळाच्या निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी भारताकडून निर्यात धोरणात बदल करत 75 हजार टन तांदूळ निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे.
हे आयातदार देश
भारताकडून तांदूळ आयात करणाऱ्या देशामध्ये पश्चिम आफ्रिकन बेनिन हा देश बिगर बासमती तांदळाचा प्रमुख आयातदार आहे. त्यानंतर UAE, नेपाळ, बांगलादेश, चीन, टोगो, सेनेगल, गिनी, व्हिएतनाम, जिबूती, मादागास्कर, कॅमेरून सोमालिया, मलेशिया आणि लायबेरिया या देशाकडून ही भारतामधून तांदळाची आयात केली जाते.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            