आपली अर्थव्यवस्था इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे (Electric mobility) वळवण्याचा प्रयत्न भारताचा आहे. यासाठी महत्त्वाचं आहे, ते बॅटरी आणि त्यासाठी लागणारं लिथिअम (Lithium). मात्र भारत या कारणासाठी इतर देशांवर अवलंबून होता. विशेषत: चीनकडून (China) भारत लिथिअम आयात करत होता. त्यामुळे याबाबत भारत स्वयंपूर्ण नव्हता. आता मात्र लिथिअमचा साठा भारतात सापडल्यानं या क्षेत्रात भारतानं ठेवलेलं लक्ष्य पूर्ण होई किंवा त्याकडे भारताची वाटचाल वेगात होईल, असं दिसत आहे.
Table of contents [Show]
जम्मू काश्मीरपेक्षा मोठा साठा
राजस्थानमध्ये लिथिअमचा दुसरा साठा नुकताच सापडलाय. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि खाण खात्याच्या अधिकार्यांना राजस्थानातल्या नागौर जिल्ह्यातल्या देगानाजवळ लिथियमचा मोठा साठा सापडलाय. याबाबतची सविस्तर माहिती अद्याप सांगण्यात आलेली नाही. मात्र याआधी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा साठा सापडला होता. त्यापेक्षाही हा साठा मोठा असल्याची माहिती मात्र देण्यात आलीय.
चीनची मक्तेदारी मोडणार?
राजस्थानातल्या देगानामध्ये सापडलेला साठा हा इतका मोठा आहे, की जवळपास 80 टक्के बॅटरीची गरज त्याद्वारे पूर्ण केली जाईल, असं बोललं जात आहे. त्यामुळे भविष्यात चीनवर अवलंबून राहणं आता भूतकाळच बनणार आहे. राजस्थानात हा साठा सापडलाय. त्यामुळे राजस्थानची स्थिती सुधरण्यासही यामुळे मोठी मदत होणार आहे. या क्षेत्रात मागच्या काही काळापासून चीनची जी मक्तेदारी आहे, ती मोडून काढण्यात भारताला यश येणार आहे. भारत या लिथिअमची निर्यातदेखील करू शकणार आहे, असं मानलं जात आहे.
गैर जीवाश्म क्षमता वाढवणं गरजेचं
इंधनाचे साठे हळूहळू संपत चालले आहेत. शिवाय आता वापरल्या जाणाऱ्या इंधनामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होतेय. या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक वाहनांना सरकारद्वारे प्रोत्साहन देण्यात येतंय. भारतही इलेक्ट्रिक वाहन वापरण्यास प्रोत्साहन देतंय. 2030पर्यंत देशात विकल्या जाणाऱ्या वाहनांपैकी जवळपास 30 टक्के वाहनं इलेक्ट्रिक असावी, हे लक्ष्य ठेवण्यात आलंय. त्यामुळे भारताला गैर जीवाश्म (Non fossils) इंधनक्षमता 500 गीगावॉटपर्यंत वाढवायचीय.
लाखो कोटी रुपये किंमत
राजस्थानच्या लिथिअम रिझर्व्हचा विस्तार नेमका किती आहे, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. त्याआधी जम्मू काश्मीरमध्ये सापडलेल्या लिथिअमच्या साठ्याची किंमत लाखो कोटी रुपये असल्याचं समोर आलं. आता त्यापेक्षाही मोठा साठा सापडलाय. आंतरराष्ट्रीय बाजारात एक टन नॉन-फेरस मेटल लिथियमची किंमत सुमारे 57.36 लाख रुपये आहे. त्या पार्श्वभूमीवर 59 लाख टन लिथियमची किंमत सुमारे 3.3 लाख कोटी रुपये इतकी येते.
टंगस्टनसाठी प्रसिद्ध होता परिसर
लिथिअमचा दुसरा मोठा साठा राजस्थानातल्या देगानात सापडलाय. देगाना इथल्या रेनवट टेकडीभोवती हा साठा सापडला. मात्र या ठिकाणाहून कधीकाळी देशाला टंगस्टनचा पुरवठा केला जात होता. ब्रिटिश राजवटीत साधारणपणे 1914च्या आसपास या भागात टंगस्टनचा शोध लागला होता. टंगस्टनदेखील विविध उपकरणांमध्ये उपयुक्त आहे. याचा वापर प्रामुख्यानं बल्ब, हीटर आणि प्रेसचं फिलामेंट बनवण्यासाठी केला जातो.
चीनमधून स्वस्तात टंगस्टन आयात
इंग्रजांच्या सैन्यातल्या विविध साहित्यासाठी टंगस्टन वापरलं जात होतं. पहिल्या महायुद्धात त्याचा वापर झाल्याचं दिसून आलं. स्वातंत्र्यानंतर याच टंगस्टनपासून सर्जिकल साधनं बनवण्यात आली होती. पुढे चीनमधून स्वस्तात टंगस्टन आयात होऊ लागलं. त्यामुळे या भागातलं टंगस्टन काढण्याचं काम हळूहळू बंद पडू लागलं. आता याच परिसरात लिथिअमचा साठा सापडलाय.