भारत आता जगातील अनेक देशांसाठी दारूची मोठी बाजारपेठ बनत आहे. मग ती रशियन व्होडका असो वा इटालियन वाईन. भारतातील दारू पिण्याची सामाजिक मान्यता आणि मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात झालेली वाढ हे याचे प्रमुख कारण आहे असे मानले जात आहे. यामध्ये ब्रिटनमध्ये बनणाऱ्या स्कॉच आणि व्हिस्कीचा देखील समावेश आहे, ज्यासाठी भारत आता सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे. काही वर्षांपूर्वी फ्रान्स देशात व्हिस्की आणि स्कॉचला सर्वात जास्त मागणी होती, आता या बाबतीत भारताने फ्रान्सला देखील मागे टाकले आहे. ब्रिटनमधून भारताच्या स्कॉच व्हिस्कीच्या आयातीत 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
21.9 कोटी खंबा आयात...
स्कॉच व्हिस्की असोसिएशन (SWA) ही स्कॉटलंडच्या वाईन उद्योगातील अग्रगण्य संस्था आहे.या संस्थेच्या मते भारताने गेल्या वर्षी स्कॉच व्हिस्कीच्या 700 मिलीच्या 219 दशलक्ष बाटल्या आयात केल्या आहेत, तर फ्रान्सने 205 दशलक्ष बाटल्या आयात केल्या आहेत. भारतात, साधारण बोली भाषेत 700 मिली दारूच्या बाटलीला 'खंबा' म्हणतात. एकेकाळी उच्चभ्रू लोकांसाठी केवळ व्हिस्की आणि स्कॉच असते अशी सामाजिक धारणा होती, परंतु आता सर्वसामान्य लोक या दारूच्या प्रकाराचे सेवन करताना आघाडीवर आहेत. गेल्या दशकाच्या तुलनेत, यूकेसाठी भारतीय स्कॉच बाजार 200 टक्क्यांहून अधिक वाढला आहे आणि त्याने फ्रान्सला देखील मागे टाकले आहे.
India is now the top importer of Scotch Whiskey as it imported 219 million bottles of whisky last year. This marks a 60% rise in demand for #ScotchWhisky from the country.@eriknjoka gets you the details
— WION (@WIONews) February 11, 2023
For more videos, visit: https://t.co/AXC5qRugeb pic.twitter.com/ZFlk3h7js2
स्कॉच व्हिस्की फक्त 2 टक्के विकली जाते
भारत आणि ब्रिटनमधील मुक्त व्यापार कराराच्या (Free Trade Act) चर्चेतही या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले जात आहे . सध्या भारत आणि ब्रिटनमध्ये FTA चर्चेची 7वी फेरी सुरू आहे. SWA नुसार, भारतात स्कॉच व्हिस्कीवर उच्च दर आहे. त्यामुळे स्कॉच व्हिस्कीच्या आयातीत दुहेरी अंकी वाढ होऊनही भारतीय व्हिस्की बाजारात स्कॉचचा वाटा केवळ 2 टक्के आहे.
SWA चा अंदाज आहे की भारत आणि UK यांच्यात FTA करार झाल्यास, भारतातील स्कॉच व्हिस्कीवरील शुल्कावरील भार 150 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. त्यामुळे स्कॉच व्हिस्की बाजारात स्वस्त होणार असून त्याची मागणी लक्षणीय वाढणार आहे. दारूचा हा प्रकार महाग असला तरी लक्षणीय संख्येने त्याची आयात वाढते आहे. भारतात दारू पिणे हे वाईट मानले जात होते परंतु गेल्या काही वर्षांपासून दारू पिण्याला सामाजिक मान्यता प्राप्त होताना दिसते आहे. तसेच मध्यमवर्गीय लोकांचा आर्थिक स्तर उंचावल्यामुळे देखील दारू पिणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे.
दारू सेवनाने राज्यांच्या महसुलात वाढ
इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चनुसार (India Ratings and Research), राज्याच्या कर महसूलापैकी 39.9 टक्के राज्य जीएसटी (State GST) आणि 21.9 टक्के पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमधून (VAT) येतात. यानंतर अबकारीचा क्रमांक येतो, राज्यांना उत्पादन शुल्कातून 11.2 टक्के उत्पन्न मिळते. यातील बहुतांश महसूल दारूवरील उत्पादन शुल्कातून येतो.
जागतिक अल्कोहोल बाजाराची (Global Alcohol Market) 1448.2 अब्ज डॉलर इतकी आहे आणि 2022 ते 2028 दरम्यान वार्षिक 10.3 टक्के दराने यात वाढ होण्याची अपेक्षा आहे. 2025 पर्यंत दारूची बाजारपेठ 1976 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. मनोरंजक गोष्ट अशी आहे की भारतातील अल्कोहोल मार्केट जगातील सर्वात वेगाने घोडदौड करताना दिसत आहे. भारतीय अल्कहोल मार्केटची उलाढाल आज घडीला 52.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे. भारतातील अल्कोहोल मार्केट वार्षिक आठ टक्क्यांनी वाढताना दिसत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या काही वर्षांत देशातील मद्य उत्पादनात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचे कारण भारतातील शहरी लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि त्याच वेळी लोकांचे उत्पन्नही वाढत आहे.
2020-21 च्या आकडेवारीनुसार, संपूर्ण देशात उत्पादन शुल्कातून सुमारे एक लाख 75 हजार कोटी रुपये कमावले गेले. उत्तर प्रदेश हे दारूपासून सर्वाधिक कमाई करणारे राज्य ठरले आहे. या आर्थिक वर्षात यूपीचा अबकारी महसूल 31,517 कोटी रुपये होता. हे राज्याच्या एकूण महसुलाच्या 21.8 टक्के इतका आहे. या प्रकरणात 20,950 कोटी रुपयांसह कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्याच्या एकूण महसुलात उत्पादन शुल्काचा वाटा 20.6 टक्के होता. महाराष्ट्राला उत्पादन शुल्कातून 17,477 कोटी रुपये मिळाले आहेत. मध्य प्रदेशला दारूवरील करातून 11,873 कोटी रुपये मिळाले आहेत. या यादीत तामिळनाडू 7,262.30 कोटी रुपयांच्या कमाईसह पाचव्या क्रमांकावर आहे. हे उत्पन्न दारूच्या कायदेशीर विक्रीतून आहे.