वर्षभर तेजी आणि मंदीच्या लाटेवर गुंतवणूकदारांना धक्के देणाऱ्या सेन्सेक्स आणि निफ्टीने वर्ष 2022 ची घसरणीने सांगता केली. शुक्रवारी 30 डिसेंबर 2022 रोजी सेन्सेक्स 293 अकांच्या घसरणीसह 60840.74 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 85.70 अंकांच्या घसरणीसह 18105.30 अंकांवर स्थिरावला.
शुक्रवारी सकाळी बाजारात तेजीचे वातावरण होते. मात्र ही तेजी नफेखोरांपुढे फारकाळ टिकली नाही. खासगी बँका, एफएमसीजी शेअर्समध्ये विक्रीचा ओघ सुरु झाला आणि निर्देशांकांमध्ये घसरण सुरु झाली. सार्वजनिक बँका, मेटल आणि मिडिया या क्षेत्रात मात्र गुंतवणूकदारांनी खरेदी सुरुच ठेवली. बजाज फिनसर्व्ह, बजाज ऑटो, टायटन, कोल इंडिया, ओएनजीसी या शेअरमध्ये वाढ झाली. आयशर मोटर्स, एसबीआय लाईफ हे शेअर घसरले. बीएसईवर 100 हून अधिक शेअर्सने 52 आठवड्यांतील उच्चांकी स्तर गाठला. यात कॅनरा बँक, आरईसी, अपोलो मायक्रो सिस्टम, आरबीएल बँक, मोल्ड टेक टेक्नॉलॉजी, जिंदाल स्टील अॅंड पॉवर या शेअर्सचा समावेश होता.
निफ्टीला 17774 अंकांचा निर्णायक सपोर्ट आहे. मागील तीन आठवड्यांच्या तुलनेत निफ्टी 1.68% ने वाढल्याचे दिसून येते. वर्ष 2022 मध्ये निफ्टीमध्ये 4.3% वाढ झाली तर डिसेंबर 2022 मध्ये तो 3.5% ने घसरल्याचे दिसून आले. शेअर मार्केटच्या आकडेवारीनुसार परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुरुवारी शेअर मार्केटमध्ये 572.78 कोटींचे शेअर्स विक्री केले.
निफ्टी बँक, निफ्टी एफएमसीजी इंडेक्समध्ये 0.5% घसरण झाली. पीएसयू बँक इंडेक्स 1.5% आणि निफ्टी मेटल इंडेक्स 0.5% ने वधारला. निफ्टीवर एसबीआय लाईफ इन्शुरन्स, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, ग्रासिम इंडस्ट्रीज या शेअरमध्ये घसरण झाली.