ठेवी न घेणारी आणि सोने तारण कर्ज क्षेत्रातील एक महत्त्वाची बिगर बॅंकिंग कंपनी (एनबीएफसी) इंडेल मनी लिमिटेडने प्रत्येकी 1000 रुपये दर्शनी मूल्याच्या सुरक्षित, विमोचन करण्यायोग्य, अपरिवर्तनीय रोख्यांच्या (एनसीडी) सार्वजनिक विक्रीचा तिसरा टप्पा जाहीर केला. ही रोखे विक्री 6 जून 2023 रोजी खुली होईल आणि 19 जून 2023 रोजी बंद होईल. या योजनेत जास्तीत जास्त 71 महिने गुंतवणूक केली तर त्यावर एकत्रितपणे 12.25% इतके व्याज मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे.
कंपनीच्या माहितीनुसार गुंतवणूकदाराला 400 दिवसांसाठी 9.00% कुपन रेट देण्यात आला आहे. त्याशिवाय 24 महिन्यांच्या गुंतवणुकीवर 10.50% कुपन रेट आहे. 61 महिन्यांसाठी तो 11.50% इतका आहे. यात सिरिज 1- 400 दिवसांसाठी (मासिक व्याज), सिरिज 2- 400 दिवसांसाठी (एकत्रित व्याज), सिरिज 3-24 महिन्यांसाठी (मासिक व्याज), सिरिज 4 - 24 महिन्यांसाठी (एकत्रित व्याज), सिरिज-5- 61 महिन्यांसाठी (मासिक व्याज), सिरिज 6- 61 महिन्यांसाठी (एकत्रित व्याज) आणि सिरिज 7 - 72 महिन्यांसाठी (एकत्रित व्याज) असे पर्याय आहेत.
गोल्ड लोन उद्योगातील आमच्या स्पर्धात्मक सामर्थ्याचा फायदा हा आमचे या बाजारपेठेतील स्थान वाढवण्यासाठी आहे. कर्ज योजनांमध्ये पोर्टफोलिओ वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे आणि ते केवळ सध्याचे शाखांचे जाळे वापरूनच नव्हे तर नवीन शाखा उघडण्याद्वारे देखील विस्तारण्याचे नियोजन आहे. वाढीव महसूल, नफा आणि दृश्यमानता हे घटक शाखांचे जाळे वाढवत नेणारे ठरतील असे मत इंडेल मनीचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश मोहनन यांनी व्यक्त केले.
सुरक्षित, विमोचन करण्यायोग्य, अपरिवर्तनीय रोख्यांचे (एनसीडी) दर्शनी मूल्य प्रत्येकी 1000 रुपये आहे. रोखेविक्रीत 50 कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेच्या बेस इश्यूचा समावेश आहे. अतिरिक्त भरणा झाल्यास आणखी 50 कोटी रुपयांपर्यंत, असे एकूण 100 कोटी रुपयांपर्यंत निधी मिळविण्याचा पर्याय आहे. या रोखे विक्रीचे प्रमुख व्यवस्थापक विव्हरो फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा. लि. हे आहेत. या रोख्यांद्वारे जमा केलेला निधी पुढील कर्ज आणि वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने वापरला जाईल.
इंडेल मनीने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कर्ज वितरणात 210% वाढ नोंदवत आर्थिक वर्षात 3000 कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले. सोने तारण कर्जाचा (गोल्ड लोन) कंपनीच्या एकूण कर्ज वितरणात 92% वाटा आहे. इंडेल मनीने तिच्या व्यवस्थापन अंतर्गत मालमत्तेत (एयूएम) 72% वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ती आधीच्या वर्षातील 669 कोटी रुपयांवरुन 1155 कोटी रुपयांवर गेली आहे.
आता इंडेल मनीने चालू आर्थिक वर्षासाठी 2100 कोटी रुपयांच्या एयूएमचे लक्ष्य निर्धारीत केले आहे. जे 81% वर्षागणिक वाढीचे सूचक आहे. यापुढेही एकूण एयू्एममध्ये गोल्ड लोनचा वाटा 90% अधिक राखण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. इंडेल मनीने मे 2022 मध्ये एनसीडी विक्रीचा दुसरा टप्पा सादर करुन त्यातून 100 कोटी रुपये उभारले होते.
कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये रोख्यांच्या सार्वजनिक विक्रीद्वारे अंदाजे 300 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. रोखे विक्रीमधून मिळालेला निधी सोन्याच्या कर्जाच्या व्यवसायासाठी वापरण्याची योजना कंपनीने आखली आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये नवीन भौगोलिक क्षेत्रांमध्ये विस्तारण्यासाठी खासगी इक्विटी (पीई) वाढवण्याचे नियोजन देखील कंपनीने योजले आहे. सध्या इंडेल मनी आठ राज्यांमध्ये कार्यरत आहे आणि आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत 15 राज्यांमध्ये 500 हून शाखांद्वारे विस्तारण्याची कंपनीची योजना आहे.