गेल्या काही वर्षांपासून देशात रियल इस्टेट व्यवसायात प्रचंड उलाढाल होत आहे. घराच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत.घराच्या बांधकामासाठी लागणारा कच्चा माल देखील महाग झाल्यामुळे घराच्या किंमतीत कमालीची वाढ पाहायला मिळते आहे. आधीच महागाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता भाड्याने घर घेणे पसंद केल्याचे नुकत्याच एका अहवालात निदर्शनास आले आहे.मॅजिकब्रिक्सने नुकताच याबाबत एक अहवाल प्रकाशित केला आहे. ज्यात देशातील आघाडीच्या शहरांमध्ये भाड्यांच्या घराच्या मागणीत सातत्याने वाढ होत असल्याचे म्हटले आहे. सोबतच मागणी वाढल्यामुळे घरांचे भाडे देखील वाढले आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. गेल्या तीन महिन्यात ही वाढ सरासरी 4.1 टक्के इतकी आहे असे या अहवालात नमूद केले आहे.
मॅजिकब्रिक्सने देशातील आघाडीच्या 13 शहरांमध्ये याबाबत एक पाहणी केली. या पाहणीत त्यांना आढळलेली निरीक्षणे त्यांनी नोंदवली आहेत.
किती वाढले भाडे?
डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत जानेवारी ते मार्च या कालावधीत गुरुग्राममध्ये 8.2 टक्के, नोएडामध्ये 5.1 टक्के,हैदराबादमध्ये 4.9 टक्के आणि मुंबईत 4.2 टक्क्यांनी घरभाडेवाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. सोबतच ठाणे शहरातील घरभाड्यात मात्र घट झाली असल्याचे देखील म्हटले आहे. ठाणे शहर सध्या मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या ठाणे शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुल उभे राहत आहेत. ठाणे परिसरात घरांची उपलब्धता अधिक असल्यामुळे घरभाडे कमी होत असल्याने या अहवालात म्हटले आहे.
कोणत्या शहरात सर्वाधिक मागणी
तामिळनाडू राज्यातील चेन्नईत भाड्याच्या घरांना मागणी वाढताना दिसते आहे. गेल्या तिमाहीत चेन्नईत 14.3 टक्के, बेंगळुरूमध्ये 12.2 टक्के, हैदराबादमध्ये 10.8 टक्के तर पुण्यात 7.8 टक्के भाड्याच्या घरांना मागणी वाढली असल्याचे मॅजिकब्रिक्सने म्हटले आहे.
भाड्यांच्या घरांना मागणी -0.7 टक्के कमी असूनही नोएडामध्ये पुरवठा मात्र 4.2 टक्क्यांनी वाढला असल्याचे अहवालात म्हटले आहे.नोएडा परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात बांधकाम होत असल्याने हे चित्र पाहायला मिळते आहे. असे असले तरी भाड्याच्या घरांची मागणी कमी होऊनही नोएडा परिसरात घरभाडे 5.1 टक्क्यांनी वाढले आहे.
निर्मिती खर्च आणि देखभाल खर्च अधिक
घरभाड्यात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यासाठी लागणारा अवाढव्य निर्मिती खर्च आणि बांधलेल्या घराची निगा राखण्यासाठी लागणारा देखभाल खर्च. वाढत्या महागाईमुळे या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गृह संकुलाच्या देखभाल खर्चात (Maintenance Bill) वाढ झाली असल्यामुळे घरमालक तो खर्च घरभाड्यातूनच वसूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे घरभाड्यात वाढ झाली आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे.