कळतनकळत कोट्यवधी रुपयांची लॉटरी लागावी, हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र देशातील इन्कम टॅक्स कायद्यानुसार लॉटरी किंवा बक्षिस म्हणून जिंकलेली रक्कम 10,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास त्यावर बक्षिस जिंकलेल्या व्यक्तीला टॅक्स भरावा लागतो. जिंकलेल्या रकमेवर संबंधिताने टॅक्स भरला नाही, तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. जाणून घेऊया की जर एखाद्याला कोट्यवधी रुपयांची लॉटरी लागली तर त्याला टॅक्स रूपात किती पैसे सरकारला द्यावे लागतील.
लॉटरी म्हणजे एखाद्या प्रक्रियेत सहभागी झालेल्या व्यक्तीला अचानकपणे जाहीर झालेली मोठी रक्कम असते. या प्रक्रियेत एकाचवेळी अनेक व्यक्तींना सहभागी करून, त्यांच्याकडून विशिष्ट मूल्य एकत्रित करून विजेत्या व्यक्तीला लॉटरीची रक्कम दिली जाते. लॉटरीत सहभागी झालेली व्यक्ती अतिशय अल्प गुंतवणूक करून मोठे बक्षीस जिंकू शकते. त्याचप्रमाणे त्याचे मोठे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. इन्कम टॅक्स कायद्यानुसार ऑनलाईन गेम शो किंवा क्वीजमधून मिळालेली रक्कम करपात्र असते.
सवलतीशिवाय आकारला जातो कर
- विजेत्याला कुठल्याही सवलतीशिवाय 30.9% रक्कम कर म्हणून भरावी लागते.
- बक्षीस म्हणून मिळालेली रक्कम ही तुमच्या एकूण उत्पन्नात जोडली जाणार नाही. यामुळे तुम्हाला आयकर प्रणालीतील सवलतीचा फायदा घेत येणार नाही
- तुम्हाला गेम शो मधून जिंकलेल्या बक्षिसांच्या बाबतीत 80C ते 80U अंतर्गत टॅक्समध्ये कोणतीही वजावट किंवा सूट मिळणार नाही.
- जर तुमची जिंकलेली रक्कम कार किंवा दागिने किंवा अपार्टमेंट किंवा कोणतीही जंगम किंवा स्थावर मालमत्ता असेल, तर तुम्हाला बक्षिसावर दावा करण्यापूर्वी सरकारला 30.9% TDS भरावा लागेल.
इतका कर आकारला जाईल?
इन्कम टॅक्स कायदा 1961 च्या कलम 115BB नुसार, सरकार लॉटरी, क्रॉसवर्ड कोडी, घोड्यांच्या शर्यती, पत्त्यांचे खेळ आणि कोणत्याही प्रकारचा जुगार किंवा सट्टेबाजी यासह शर्यतींमधून जिंकलेल्या रकमेवर टॅक्स लावते. यावर कायद्यानुसार सरसकट 30% टॅक्स लागू केला जातो. तो वजा केल्यावर उर्वरित रक्कम विजेत्याला दिली जाते. इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 194B नुसार, जर बक्षिसाची रक्कम 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर विजेत्याच्या रकमेतून 30% रक्कम कपात करून उर्वरित बक्षिसाची रक्कम दिली जाते.