कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत जितके सदस्य सामील होतात, त्यावरून किती लोकांना रोजगार मिळाला आहे याचा अंदाज लावता येतो. कुठल्याही कंपनीत नोकरीला लागल्यानंतर कंपनी कर्मचाऱ्यांना पीएफ (Provident Fund) देत असते. यासाठी त्यांच्या नवीन कर्मचाऱ्यांची नोंद EPFO (Employees' Provident Fund Organisation) कार्यालयात करावी लागते. जितक्या कर्मचाऱ्यांची नव्याने नोंद होते, तितके रोजगार वाढले आहेत असे मानले जाते.
या वर्षी मे-2023 महिन्यात 16.30 लाख सदस्य कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत (EPFO) सामील झाले आहेत असे श्रम आणि रोजगार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.
कामगार मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीमध्ये असे सांगण्यात आले की, यावर्षी मे महिन्यात 16.30 लाख सदस्य सामील झाले आहेत. आकडेवारीनुसार, मे महिन्यात देशभरातील 3,673 कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना EPFO च्या सामाजिक सुरक्षा निधीत नोंदणीकृत केले आहे. 3,673 कंपन्यांमधील एकूण 16.30 लाख कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मे महिन्यात यापैकी सुमारे 8.83 लाख नवीन सदस्य ईपीएफओमध्ये सामील झाले आहेत. याचाच अर्थ बाकीचे कर्मचारी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत शिफ्ट झाले आहेत. तसेच 8.83 लाख कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच रोजगार मिळाला आहे.
EPFO adds 16.30 lakh net members, around 8.83 lakh new members, during May 2023
— EPFO (@socialepfo) July 20, 2023
For More details: https://t.co/Ydc54qhtI3
Payroll Data Link : https://t.co/de7CGpLyGp#EPF #ईपीएफ #employees #AmritMahotsav #EPFOwithyou #HumHaiNa #पीएफ@PMOIndia
युवा कर्मचारी अधिक
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नवीन भागधारकांपैकी सर्वाधिक 56.42 टक्के कर्मचारी हे 18 ते 25 वयोगटातील आहेत. आकडेवारीनुसार, मे महिन्यात प्रथमच ईपीएफओचा भाग बनलेल्या 8.83 लाख नवीन कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 2.21 लाख महिला होत्या. महिलांचा रोजगारातील हा वाढता सहभाग आशादायी आहे असे जाणकारांचे म्हणणे आहे.
कामगार मंत्रालयाच्या मते, राज्य पातळीवर महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, हरियाणा आणि गुजरात ही राज्ये रोजगाराच्या बाबतीत आघाडीवर आहेत. याचाच अर्थ या राज्यांमधील कंपन्यांनी रोजगार दिला असून त्यांच्या कर्मचाऱ्यांची नोंद EPFO मध्ये केली आहे.