BS6-II emission standards: वाहनांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकार आता अधिक कठोर नियमावली आणत आहे. 2020 साली BS-6 नियमावली लागू झाल्यानंतर आता एप्रिल 2023 पासून पुढचा टप्पा म्हणजेच BS6-II लागू होणार आहे. याचा परिणाम वाहन निर्मिती कंपन्यांसह ग्राहकांवरही होणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी रिअल टाइम म्हणजेच गाडी चालू असताना किती प्रदूषण होते, हे मोजण्यासाठी अत्याधुनिक डिव्हाइसेस गाडीला बसवण्यात येतील. त्यामुळे सहाजिकच गाड्यांच्या किंमतही वाढतील. नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये अनेक कार निर्मिती कंपन्यांनी गाड्यांच्या किंमती वाढवल्या आहेत. येत्या काळात आणखी किंमतीही वाढू शकतात.
BS6-II नियमांमध्ये वेगळं काय? (BS6-II emission standards)
सुरुवातीला जेव्हा BS6 स्टेज 1 नियम लागू करण्यात आले होते. त्यामध्ये गाडी फक्त लॅबोरेटरी एन्व्हायरमेंटमध्ये तपासली जायची. गाडीतून किती प्रदूषण होते, हे लॅबमधील चाचण्यांमधूनच निष्कर्ष काढले जायचे. त्यानुसार गाड्यांना परवानगी दिली जायची. मात्र, आता BS6 नियमांनुसार वाहन रिअल टाइम म्हणजे रस्त्यावर चालवत असताना किती प्रदूषण करते, हे मोजले जाणार आहे. जर नियमांपेक्षा जास्त प्रदूषण वाहनातून होत असेल तर वाहन कंपनीला दंडही होऊ शकतो. Real Driving Emissions (RDE) चे नियम वाहन कंपन्यांना लागू करण्यात आले आहेत.
वाहनांमध्ये Onboard diagnostics device (OBD-2) बसवण्यात येईल. त्यामुळे गाडी वेगात चालवताना किती इंधन लागते, ट्रॅफिक सिग्नलला गाडी थांबल्यानंतर गाडीला किती इंधन लागते किंवा गाडी किती प्रदूषण करते हे गाडीत बसवलेल्या डिव्हाइसद्वारे समजेल. हे डिव्हाइसेस बसवण्यासाठी गाडीच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्येही बदल करावे लागणार आहेत. तसेच अत्याधुनिक सेमीकंडक्टर गाडीमध्ये बसवण्यात येतील. याचाही कंपन्यांना जास्त खर्च होईल. वाहन निर्मिती कंपन्या हा खर्च ग्राहकांकडून वसूल करतील. म्हणजेच वाहनांच्या किंमती चालू वर्षात आणखी वाढण्याची शक्यता आहे.
वाहनाच्या किंमतींवर कसा परिणाम होईल? (BS6-II Impact on vehicle prices)
प्रवासी वाहने म्हणजे कारच्या किंमती 10 हजार ते 50 हजारपर्यंत वाढू शकतात. इंजिनच्या प्रकारानुसारही किंमती कमी जास्त होऊ शकतात. जेव्हा बीएस-6 चा पहिला टप्पा लागू झाला होता तेव्हा गाड्यांच्या किंमती सुमारे 50 हजार ते 90 हजार रुपये वाढल्या होत्या. मात्र, त्या तुलनेने बीएस -6 चा दुसरा टप्पा लागू होताना किंमती तुननेने कमी वाढतील, असे दिसते. कमर्शिअल वाहने जसे की, ट्रक, टेप्मो, ट्रॅक्टर यांच्या किंमती सुमारे 5% वाढू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. दुचाकींच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होवू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. असे झाले तर ग्रामीण भागातील दुचाकींची विक्री कमी होऊ शकते, असे फायनान्शिअल एक्सप्रेसने म्हटले आहे.
देशामध्ये महागाई सतत वाढत आहे. त्यात BS-6 लागू केल्यानंतर वाहनांच्या किंमती आणखी वाढल्या आहेत. 2020 पासून ही वाढ प्रामुख्याने दिसून येते. सरकारने वाहनांसाठी सुरक्षा मानकेही अधिक कठोर केली आहेत. मात्र, याचा परिणाम पुढील काही काळ वाहन विक्रीवर दिसू शकतो. किंमती स्थिर होई पर्यंत ग्राहक वाहन खरेदीचा निर्णय लांबणीवर टाकू शकतात.