IMD Weather Forecast: उन्हाळा ऋतू संपत आला असून जूनपासून मान्सूनच्या सरी कोसळण्यास सुरुवात होईल. यंदा एल-निनोमुळे अपुरा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, आता हवामान विभागाने ‘सर्वसाधारण पाऊस’ होईल असे म्हटले आहे. भारताच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा 20 टक्क्यांच्या आसपास आहे. मात्र, अर्थव्यवस्थेतील इतर क्षेत्रांवर त्याचा परिणाम दिसून येतो.
जर मान्सून पुरेसा झाला नाही तर कृषी क्षेत्रातील उत्पन्न खाली येण्याची शक्यता असते. मागील तीन वर्षांपासून कोरोना आणि मंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. रिटेल, ऑटो, सह इतर वस्तू आणि सेवांची मागणी घटली आहे. आता कुठे ग्रामीण बाजारपेठ सुरळीत होत आहे.
हवामान विभागाने दुसऱ्या टप्प्यातील लाँग रेंज हवामान अंदाज 2023 जाहीर केला आहे. त्यानुसार या वर्षी पाऊस सर्वसाधारण असेल असे म्हटले आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान 96% पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये 4 टक्के अंदाज वरखाली होऊ शकतो.
सर्वसाधारण पाऊस म्हणजे नक्की काय?
जेव्हा पावसाचा अंदाज 96% ते 104% टक्क्यांच्या दरम्यान वर्तवण्यात येतो तेव्हा तो सर्वसाधारण पाऊस असतो. सरासरी 87 सेंटीमीटर पाऊस पडू शकतो. वायव्य भारतात पावसाचे प्रमाण सर्वसाधारणपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम राजस्थान राज्यावर होऊ शकतो.
एल-निनो म्हणजे?
पूर्व पॅसिफिक समुद्रातील तापमानात प्रमाणापेक्षा जास्त वाढ झाल्याने नैऋत्य दिशेकडून येणारे वारे कमकुवत होतात. त्यामुळे भारतात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सून दरम्यान, एल-निनो परिस्थिती उद्भवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र, त्याचा खूप मोठा परिणाम पावसाच्या प्रमाणावर होईल, असे दिसत नसल्याचे म्हटले आहे.
स्कायमेटचा अंदाज काय?
स्कायमेट ही हवामानाचा अंदाज वर्तवणारी आघाडीची खासगी कंपनी आहे. एल-निनोमुळे “सर्वसाधारणपेक्षा कमी” पाऊस पडेल. तसेच दुष्काळाची शक्यता 60% राहू शकते, असे स्कायमेटने म्हटले आहे.
मान्सून आणि महागाईचा संबंध
मान्सून सिझनमध्ये भारतामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. अन्नधान्याचे उत्पन्न पुरेसे होण्यास या पावसाचा मोठा वाटा आहे. मात्र, जर अपुरा पाऊस झाल्याने कृषी उत्पन्न घटून महागाई वाढण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे सर्वजण चांगल्या पावसाची अपेक्षा करत असतात. यंदा जागतिक स्तरावर मंदीचे सावट असून नुकतेच युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था जर्मनी मंदीत सापडला आहे. अमेरिकेतील स्थितीही ही कमकुवत आहे.