माहिती आणि तंत्रज्ञानाशी संबंधित शिक्षणाला सध्या मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जात आहे. या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना करिअरच्याही खूप मोठ्या संधी आहेत. मात्र, यासाठी शिक्षणाचा खर्चही तसाच मोठा आहे. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंग (AI & ML) याचे महत्त्व दिवसेंदिवस अधिक वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर IIIT-हैदराबाद (International Institute of Information Technology) यांनी स्थापन केलेल्या हैदराबादेतील तंत्रज्ञान इनोव्हेशन हब(TIH) यांच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग (AI & ML) या प्रोग्रॅमिंगसाठी एक वर्षभराचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या विद्यार्थ्यांसाठी मिळेल संधी-
कृत्रिम बुद्धिमत्ता/मशीन लर्निंगवरील हा 50-आठवड्याचा विद्यार्थी प्रशिक्षण कार्यक्रम हैदराबाद आणि आसपासच्या तांत्रिक संस्थांमध्ये, AICTE द्वारे मंजूर केलेल्या बी टेक (4-वर्षीय) करणाऱ्या अंडरग्रॅज्युएट अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आहे. जे सध्या द्वितीय अथवा तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स उपलब्ध आहे. त्यासाठी संबंधित महाविद्यालयाच्या विभागांचे प्रमुख,डीन, किंवा संस्थाचालकांनी दोन संभाव्य विद्यार्थ्यांची शिफारस करणे आवश्यक आहे. तसेच जे विद्यार्थी आयआयआयटी हैदराबादपासून प्रवासाच्या काही अंतरावर आहेत, त्यांनाच या कार्यक्रमात सहभागी करण्याचा विचार केला जाणार आहे. या कोर्ससाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण शुल्क आकारले जाणार नाही.
15 जुलैपर्यंत नोंदणीची मूदत-
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग (AI & ML)च्या कोर्ससाठी नोंदणी करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना 15 जुलै 2023 पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर ऑगस्ट 2023 पासून कोर्सचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. प्रत्येक आठवड्याला रविवारच्या दिवशी क्लासेस घेतले जाणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून हा कोर्स पूर्ण करावा लागणार आहे. IIIT-हैदराबादमधील प्राध्यापक आणि इतर प्रस्थापित आयटी संस्थामधील तज्ञ विद्यार्थ्यांना AI/ML संदर्भातील सर्व सिद्धांत, ट्यूटोरियल, संकल्पना याची माहिती देणार आहेत.
80% उपस्थिती अनिवार्य-
ज्या विद्यार्थ्यांना कोर्ससाठी मोफत प्रवेश मिळणार आहे. त्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स पूर्ण होईपर्यंत 80% उपस्थिती लावणे आवश्यक आहे. तसेच त्याने हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण करणे आवश्यक आहे. दरम्यान, अभ्यासक्रम पूर्ण करण्याची हमी म्हणून विद्यार्थ्यांकडून ठराविक रक्कम (10000 रुपये) अनामत रक्कम म्हणून घेतली जाईल. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता https://ihub-data.iiit.ac.in/programs/events/ वर उपलब्ध आहेत.