IIT Bombay Placement: देशातील मोजक्या IIT कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळावा म्हणून विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ लागलेली असते. देशातील सर्वात दर्जेदार शिक्षण संस्थेत प्रवेश मिळावा म्हणून विद्यार्थी जीवाचं रान करतात. येथे शिक्षण घेतल्यावर मेहनतीला फळंही तसंच मिळतं. चालू वर्षी IIT बॉम्बेतील विद्यार्थ्यांना 3.7 कोटी रुपयांपर्यंत मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये पॅकेज मिळाले. जागतिक स्तरावर मंदीसदृश्य परिस्थिती असतानाही आयआयटीयन्सला नोकरी देण्यासाठी कंपन्या उत्सुक दिसल्या.
परदेशी कंपन्यांचे पॅकेज किती?
परदेशातील कंपन्यांनी सर्वाधिक 3.7 कोटींचे वार्षिक पॅकेज दिले. मागील वर्षी परदेशातील कंपन्यांनी सर्वाधिक 2.1 कोटींचे पॅकेज दिले होते. त्यात मोठी वाढ झाली. तर स्थानिक कंपन्यांनी सर्वाधिक 1.7 कोटींचे पॅकेज दिले. मागील वर्षीपेक्षा यात किंचित घट झाली. 2022 मध्ये IIT बॉम्बेतील विद्यार्थ्यांना स्थानिक कंपन्यांनी 1.8 कोटींचे पॅकेज दिले होते.
कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक डिमांड?
इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीचे विषयांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक मागणी राहिली. आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना सरासरी 21.8 लाखांचे पॅकेज मिळाले. (IIT Bombay highest placement 2023) 2020-21 साली 17.9 लाखांचे सरासरी पॅकेज मिळाले होते. तर 2021-22 साली 21.5 लाखांचे पॅकेज मिळाले होते.
नुकत्याच झालेल्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये 16 विद्यार्थ्यांना 1 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या ऑफर्स मिळाल्या. कॉलेज पूर्ण होण्याआधीच 300 विद्यार्थ्यांना प्रि प्लेसमेंट ऑफर मिळाली. (IIT Bombay highest package 2023) त्यातील 194 विद्यार्थ्यांनी ऑफर स्वीकारल्या. 65 विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून ऑफर्स मिळाल्या.
कोणत्या देशांकडून सर्वाधिक ऑफर्स?
अमेरिका, जपान, युके, नेदरलँड, हाँगकाँग, तैवान मधील कंपन्यांकडून सर्वाधिक ऑफर्स आल्या. आयआयटी बॉम्बेकडून दोन टप्प्यात प्लेसमेंट घेतली जाते. पहिला टप्पा डिसेंबर आणि दुसरा टप्पा जून/जुलै दरम्यान असतो. 97 इंजिनिअरिंग कंपन्यांनी 458 विद्यार्थ्यांना ऑफर दिली. तर 88 आयटी कंपन्यांनी 302 विद्यार्थ्यांना ऑफर दिली. दरम्यान, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी भरती रोडावली आहे.
बी. टेक, दुहेरी पदवी (ड्युअल डिग्री) आणि एम. टेक कोर्सेस करणाऱ्या 90% विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली. 2022-23 प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये 82% विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग नोंदवला. 1,845 पैकी 1516 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली. पीएचडीचे शिक्षण घेणाऱ्या फक्त 31% विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली.