सध्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. सरकारी योजनांच्या माध्यमातून तुम्ही सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करून सर्वोत्तम परतावा मिळवू शकता. सरकारकडून वेगवेगळ्या आर्थिक गुंतवणूक योजना राबविल्या जात आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तिप्पट परतावा मिळवू शकता. पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी योजनेत (Sukanya Samriddhi Yojana) गुंतवणूक करून तुम्ही मॅच्युरिटीवेळी तिप्पट परतावा मिळवू शकता.या योजनेतील गुंतवणुकीवर सरकारकडून सर्वोत्तम व्याजदर देण्यात येत आहे. या योजनेतून तिप्पट परतावा मिळवण्यासाठी मासिक आधारावर किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल,जाणून घेऊयात.
सुकन्या समृद्धी योजनेबद्दल जाणून घ्या
केंद्र सरकारकडून 2015 साली सुकन्या समृद्धी योजनेची (Sukanya Samriddhi Yojana) सुरुवात करण्यात आली. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सुरु केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) पालक 10 वर्षाच्या आतील मुलींच्या नावाने गुंतवणूक करू शकतात आणि मुलीच्या उच्च शिक्षणासाठी (Higher Education) किंवा लग्नासाठी (Wedding) मोठा फंड तयार करू शकतात.
ही गुंतवणूक 15 वर्ष सलग करावी लागते. त्यानंतर 5 वर्षाचा वेटिंग पिरिअड देण्यात येतो. या काळात गुंतवणूक करावी लागत नाही. विशेष म्हणजे या कालावधीत देखील ग्राहकांना व्याजदर मिळतो. हा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर 21 वर्षांनंतर यातील पैसे त्या मुलीला मिळतात.
या खात्यातील पैसे पालक मुलीच्या वयाच्या 18 व्या वर्षी शिक्षणासाठी काढू शकतात. मुलीच्या शिक्षणासाठी पालक एकूण रकमेपैकी 50% रक्कम काढू शकतात. या योजनेत सध्या 8% व्याजदर देण्यात येत आहे. यामध्ये मुलीच्या नावे किमान 250 रुपये, तर कमाल 1.50 लाख रुपये वार्षिक गुंतवणूक करता येते.
तिप्पट परतावा मिळवण्यासाठी मासिक किती रुपये गुंतवावे लागतील?
तिप्पट परतावा मिळवण्यासाठी तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकता. तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत (SSY) वार्षिक 1.5 लाखांची गुंतवणुक करायला सुरुवात केली, तर groww च्या कॅलक्युलेटर नुसार तुमची एकूण गुंतवणूक 22 लाख 50 हजार रुपये होईल.
मासिक आधारावर या गुंतवणुकीचा विचार केला, तर गुंतवणूकदाराला महिना 12,500 रुपये गुंतवावे लागतील. या गुंतवणुकीवर 8% व्याजदराच्या हिशोबाने 44 लाख 84 हजार 534 रुपयांचे व्याज मिळेल. थोडक्यात मॅच्युरिटीवेळी पालकांना एकूण 67 लाख 34 हजार 534 रुपये मिळतील. म्हणजेच गुंतवलेल्या रकमेच्या तिप्पट रक्कम गुंतवणूकदाराला मिळणार आहे. ज्याचा वापर मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी करता येऊ शकतो.
कर सवलत मिळवता येते का?
सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणुकीवर 1.5 लाख रुपयांपर्यंत आयकराच्या कलम 80Cअंतर्गत कर सवलत (Tax Free) मिळवता येते. यामध्ये मिळणाऱ्या व्याजावर आणि मॅच्युरिटीच्या संपूर्ण रकमेवर कर भरावा लागत नाही. ही संपूर्ण रक्कम करमुक्त असते.