Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Petrol Pump Business: स्वतःचा पेट्रोल पंप सुरू करायचाय? जाणून घ्या प्रक्रिया...

Petrol Pump Business

Image Source : www.valuationoffice.blog.gov.uk

भारतातील पेट्रोल पंप डीलरशिपसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला एक प्रोसेस फॉलो करावी लागेल. डीलरशिप मिळवण्यासाठी तुम्हांला काही गोष्टींची पुर्तता करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया ही माहिती सविस्तरपणे…

पेट्रोल पंप टाकला की पैशाला मरण नाही असं म्हणतात. भारतात मोठ्या प्रमाणात टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्या चालवल्या जातात. गाड्यांची संख्या जितकी जास्त तितकीच पेट्रोलची मागणी देखील अधिक हे काही वेगळे सांगायला नको.

बरेच लोक पेट्रोल पंप सुरु करावा यासाठी माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र अनेकदा त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. खोट्या जाहिरातींना भुलून कुणाशीही आर्थिक व्यवहार करू नका. या लेखात आपण जाणून घेऊयात पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया, निकष आणि पात्रता.

भारतातील पेट्रोल पंप डीलरशिपसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला एक प्रोसेस फॉलो करावी लागेल. डीलरशिप मिळवण्यासाठी तुम्हांला काही गोष्टींची पुर्तता करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया ही माहिती सविस्तरपणे…

अर्जदाराचे वय

जर तुम्ही वैयक्तिक डीलरशिपसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर अर्ज करताना अर्जदाराचे वय किमान 21 वर्षे असावे. वयाची कमाल मर्यादा 55 वर्षे इतकी आहे हे लक्षात असू द्या. 
अर्जदाराला जन्म प्रमाणपत्र सादर करणे देखील आवश्यक आहे.

नागरिकत्वाचे निकष 

केवळ भारतीय नागरिकत्व असलेल्या व्यक्तीलाच पेट्रोल पंप डीलरशिपसाठी अर्ज करता येतो हे देखील लक्षात ठेवा. NRI म्हणजेच अनिवासी भारतीयांबाबत बोलायचे झाल्यास, 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ (182 दिवस)  जे अनिवासी भारतीय देशात वास्तव्यास आहेत त्यांना देखील पेट्रोल पंप डीलरशिपसाठी अर्ज करता येऊ शकतो.

शैक्षणिक पात्रता

ग्रामीण भागात जर पेट्रोल पंप सुरु करायचा असल्यास, अर्जदार जर अनुसूचित जाती जमातीतील असेल तर त्याने किमान 10 वी किंवा त्याच्या समकक्ष शिक्षण पूर्ण केलेले असावे, तसेच अर्जदार खुल्या वर्गातील असेल तर त्यांच्यासाठी किमान शिक्षणाची अट ही बारावीपर्यंतचे शिक्षण ही आहे. तसेच शहरी भागात पेट्रोल पंप टाकायचा असल्यास अर्जदार किमान पदवीधर असला पाहिजे. अर्जदाराला पेट्रोल पंप डीलरशिपसाठीची प्रक्रिया, कागदपत्रे हाताळता यायला हवी यासाठी ही शिक्षणाची अट देण्यात आली आहे.

जमिनीचीबाबदचे नियम 

 पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी योग्य जमीन उपलब्ध असणे आवश्यक आहे. पेट्रोल पंपसाठी 800 चौ. मीटर - 1200 चौ. मीटर क्षेत्राची जागा आवश्यक आहे. तुम्ही ज्या जागेवर पेट्रोल पंपसाठी अर्ज करत आहात, ती जागा ऑइल मार्केटिंग कंपनीच्या (OMC) नियम व अटींची पूर्तता करत आहे हे तपासून घेणे आवश्यक आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांचे नियम व अटी वेगवेगळे असू शकतात हे देखील लक्षात घ्या.

पेट्रोल कंपन्यांना पेट्रोल पुरविणे सोपे आणि परवडणारे असले पाहिजे, तरच ते डीलरशिप देतील हे लक्षात असू द्या. तसेच ग्राहकांची उपलब्धता आणि परिसरातील प्रतिस्पर्धी कंपन्यांचे पेट्रोल पंप हे देखील पेट्रोल कंपनी बघत असते.

तुम्ही सुचवलेली जागा दाट लोकवस्तीच्या ठिकाणी असता कामा नये. तसेच अग्निशमन विभागाच्या नियम व अटींचे पालन करणे देखील यासाठी आवश्यक आहे.  

अर्जदाराची आर्थिक सक्षमता

 अर्जदाराकडे पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी आणि त्याचे दैनंदिन व्यवहार सुरळीत  चालवण्यासाठी आवश्यक आर्थिक संसाधने असणे आवश्यक आहे. यामध्ये जमीन, बांधकाम, पेट्रोल पंपाची उपकरणे, तंत्रज्ञान, खेळते भांडवल आणि इतर खर्चाचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील डीलरशिपसाठी 12-15 लाख (जर जमीन स्वत:च्या मालकीची असेल) रुपयांची गुंतवणूक अर्जदाराच्या नावे असली पाहिजे. तर शहरी भागात डीलरशिपसाठी 20-25 लाख (जर जमीन स्वत:च्या मालकीची असेल) रुपयांची गुंतवणूक अर्जदाराच्या नावे असली पाहिजे.

यात बँक ठेवी, बाँड, शेअर्स, मुदत ठेवी, म्युच्युअल फंड, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि पोस्टल योजनेतील बचत खाती यांमधील अर्जदाराची गुंतवणूक ग्राह्य धरली जाते.

या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आगोदर करून घ्यावी लागेल. जर तुम्ही हे पात्रता निकष पूर्ण करत असाल तर तुम्ही पुढील कारवाईसाठी कामाला लागू शकता. यासाठी देखील तुम्हाला काही गोष्टींची माहिती करून घ्यावी लागेल आणि पेट्रोल पंपासाठी कंपनीला अर्ज कसा कारायचा? कोणती कागदपत्रे सादर करायची हे देखील बघावे लागेल. जाणून घेऊयात अर्ज सादर करण्याच्या प्रक्रिया नेमकी कशी आहे…

1) ऑइल मार्केटिंग कंपनी (OMC) निवडा

तुमच्या परिसरात कुठल्या ऑइल मार्केटिंग कंपनीचा पेट्रोल पंप नाहीये हे आगोदर जाणून घ्या. भारतात, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या प्रमुख ऑइल मार्केटिंग कंपनी आहेत.

सदर ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या वेबसाइटला भेट द्या किंवा त्यांच्या डीलरशिप अर्ज प्रक्रियेबद्दल आणि आवश्यकतांबद्दल माहिती गोळा करण्यासाठी त्यांच्या प्रादेशिक कार्यालयांशी संपर्क साधा. पेट्रोल पंप मिळवून देतो असे म्हणणाऱ्या कुठल्याही एजंटच्या भानगडीत पडू नका. ऑइल मार्केटिंग कंपनीत ओळख असल्याचे सांगून ग्रामीण भागात अनेकांची आर्थिक फसवणूक झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत.

2) कंपनीकडे अर्ज करा 

निवडलेल्या OMC च्या प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधा किंवा पेट्रोल पंप डीलरशिपसाठी अर्ज मिळवण्यासाठी करण्यासाठी त्यांच्या वेबसाइटला भेट द्या. काही OMC ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देतात  जे त्यांच्या वेबसाइटवरून थेट डाउनलोड करता येऊ शकतात.

अर्ज भरताना तुम्ही अचूक माहिती देत आहात याची खात्री करा. तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, आर्थिक पार्श्वभूमी, जमिनीची उपलब्धता तसेच इतर आवश्यक माहितीचा तपशील द्या. तसेच वर उल्लेख केलेली सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असतील याची खात्री करून घ्या.

ज्या ऑइल मार्केटिंग कंपनीसाठी तुम्ही अर्ज करू इच्छितात त्या कंपनीच्या  प्रादेशिक कार्यालयात आवश्यक ती कागदपत्रे जोडून अर्ज सबमिट करा.

3) अर्ज छाननी आणि जागेची पाहणी 

तुमचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर ऑइल मार्केटिंग कंपनी तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन करेल आणि तुम्ही सादर केलेल्या कागदपत्रांची सखोल छाननी करेल. तुम्ही सादर केलेल्या माहितीची पडताळणी, उलट तपासणी कंपनी करू शकते हे देखील लक्षात असू द्या. तसेच कंपनी अर्जदाराची पार्श्वभूमी देखील तपासू शकते आणि तुमच्या आर्थिक सक्षमतेचे मूल्यांकन देखील करू शकते.

तुमचा अर्ज सुरुवातीच्या छाननी प्रक्रियेत मंजूर झाल्यास, तुम्ही सुचवलेल्या जमिनीचे मूल्यांकन करण्यासाठी पेट्रोल कंपनी जागेची तपासणी करेल. तुमच्या जमिनीचे स्थान, वाहतुकीची सुलभता, जमिनीचा आकार आणि इतर तांत्रिक आवश्यकता यासारख्या घटकांचे मूल्यांकन केले जाईल.

4) अर्जदाराची मुलाखत 

जमिनीच्या यशस्वी तपासणीनंतर, तुम्हाला ऑइल मार्केटिंग कंपनीच्या निवड समितीकडून मुलाखतीसाठी बोलावले जाऊ शकते. ही मुलाखत तुमच्यासाठी डीलरशिप उमेदवार म्हणून तुमची योग्यता दाखवण्याची संधी आहे. तुमची पार्श्वभूमी, अनुभव, आर्थिक क्षमता आणि पेट्रोल पंपाच्या योजनांशी संबंधित प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पेट्रोल, पेट्रोलियम मंत्रालय आदी विषयांची सखोल माहिती अर्जदाराला माहिती असणे आवश्यक आहे.

5) लेटर ऑफ इंटेंट (LoI)

मुलाखत उत्तीर्ण झाल्यानंतर कंपनीकडून तुमची डीलर म्हणून नियुक्ती केली जाते. तुम्हाला ऑइल मार्केटिंग कंपनीकडून लेटर ऑफ इंटेंट (LoI) दिले जाईल. यात डीलरशिपसाठी कंपनीकडून नियम, अटी आणि शर्ती दिलेल्या असतील.

6) कायदेशीर आणि आर्थिक औपचारिकता 

एकदा की तुम्हाला ऑइल मार्केटिंग कंपनीकडून लेटर ऑफ इंटेंट (LoI) प्राप्त झाले, त्यानंतर तुम्हाला विविध कायदेशीर आणि आर्थिक औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात. यात आवश्यक कागदपत्रे प्रदान करणे, सुरक्षा ठेव भरणे, आवश्यक करारांवर स्वाक्षरी करणे, स्थानिक प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच परवाने मिळवणे आदी गोष्टींचा समावेश आहे.

पेट्रोल पंप सुरु करताना सुरक्षा ठेव रक्कम ही ग्रामीण भागासाठी 10 लाख रुपये इतकी आहे तर शहरी भागासाठी  30 लाख रुपये इतकी आहे.

7) बांधकाम आणि कमिशनिंग

कायदेशीर आणि आर्थिक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, तुम्ही पेट्रोल पंपाच्या बांधकामाला सुरुवात करू शकता. बांधकाम केल्यानंतर, पेट्रोल कंपनी त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी तपासणी करेल. एकदा की पेट्रोल पंपाचे बांधकाम पेट्रोल कंपनीने मंजूर केले, तर त्यानंतर तुम्हाला पेट्रोल कंपनीकडून आवश्यक परवाने दिले जातील आणि तुम्ही पेट्रोल पंप कार्यान्वित करू शकता.

लक्षात असू द्या, या संपूर्ण प्रक्रियेत केवळ आणि केवळ कंपनीच्या अधिकृत व्यक्तीशीच संपर्क करा. जोवर तुम्हांला लेटर ऑफ इंटेंट (LoI) कंपनीकडून मिळत नाही तोवर कुणालाही सुरक्षा ठेव म्हणून रक्कम हस्तांतरित करू नका. आर्थिक फसवणुकीपासून सावध रहा.