मुलांच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी किंवा कोणत्याही सरकारी योजनेत त्यांची नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आधार कार्डच्या बायोमेट्रिक तपशिलाच्या माध्यमातून सरकारला सगळी माहिती मिळत असते. युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने 5 वर्षांखालील मुलांसाठी बायोमेट्रिक तपशीलांची आवश्यकता नसल्याचे सांगतिले आहे. UIDAI ने मुलांच्या आधार कार्डसाठी हा नियम बदलला आहे. UIDAI ने मुलांच्या आधार कार्डला ‘बाल आधार कार्ड’ असे नाव दिले आहे आणि त्याचा रंग निळा आहे. वयाची 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे आधार कार्ड निष्क्रिय होते. म्हणून 5 वर्षानंतर बाल आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे.
बाल आधार कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- मुलाचे जन्म प्रमाणपत्र
- शाळा ओळखपत्र किंवा मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतील फोटो आयडी
- पालकांचे आधार कार्ड
बाल आधार कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा
- UIDAI च्या https://uidai.gov.in/ अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- आधार कार्ड नोंदणी लिंकवर क्लिक करा.
- मुलाचे नाव, पालकांचा फोन नंबर, ई-मेल पत्ता इत्यादीसह सर्व माहिती भरा.
- पत्ता, परिसर, जिल्हा, राज्य इत्यादी माहिती भरा.
- निश्चित भेट टॅबवर क्लिक करा. आधार कार्डसाठी नोंदणीची तारीख निश्चित करा आणि जवळच्या केंद्राची निवड करा.
वेबसाईटवरून मिळालेल्या तारखेला आधार कार्ड केंद्राच्या कार्यालयात जाताना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि संदर्भ क्रमांक, ऑनलाईन माहिती भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट सोबत घेऊन जा. संबंधित अधिकाऱ्यांना मुलाचे वय 5 वर्षे पूर्ण झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याची बायोमॅट्रिक माहिती म्हणजे बोटाचे ठसे आणि डोळे स्कॅन केले जातील आणि ते आधार कार्डशी लिंक केले जाईल. पण जर मुलाचे वय 5 वर्षांपेक्षा कमी असेल तर फक्त मुलाचा फोटो घेतला जातो.
आधार कार्ड काढण्याची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक पोचपावती क्रमांक दिला जातो. या क्रमांकाच्या आधारे तुम्ही अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता. अर्जदाराला 60 दिवसांच्या आत नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे आधार कार्ड तयार झाल्याची सूचना मिळते. त्यानंतरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 90 दिवसांच्या आत बाल आधार कार्ड तुम्ही दिलेल्या पत्त्यावर मिळेल. मूल 5 वर्षाचे झाल्यानंतर मात्र हे बाल आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे असते. अपडेट करतेवेळी बोटांचे ठसे आणि डोळे स्कॅन करून बायोमॅट्रिक माहिती आधार कार्डशी लिंक केली जाते.