तुमच्या पुढील उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी बचत करण्यासाठी खरं तर तुम्ही आताच कामाला लागलं पाहिजे. कुठल्याही पर्यटनाला जायचं म्हणजे खर्च हा आलाच. आता या खर्चाचं काळजीपूर्वक आणि शिस्तबद्ध नियोजन केलं आणि चांगल्या बचतीच्या सवयी लावल्या तर अशक्य असं काहीच नाही!
आर्थिक अडचणींबद्दल काळजी न करता अविस्मरणीय सहलीचा आनंद घेण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा निधी असल्याची खात्री करून घ्यायला हवी. यासाठी काही आवश्यक टिप्स आम्ही इथे तुमच्यासाठी देणार आहोत. बघा जमतंय का!
Table of contents [Show]
पैशाचं नियोजन
तुम्हाला तुमच्या सुट्टीत जिथे कुठे फिरायला जायचं आहे , त्याच्याबद्दल अगोदर अभ्यास करायला हवा. म्हणजे तुम्हाला अंदाजे किती पैसे लागतील हे ठरवता येईल आणि त्यानुसार नियोजन करता येईल. यासाठी प्रवास, निवास, जेवण यासारख्या खर्चाचा विचार करा. म्हणजे जर तुम्ही केदारनाथला जायचा प्लान बनवत असाल तर त्यानुसार सगळा प्रवास, बुकिंग, तिथली महागाई आदींचा विचार आताच केला पाहीजे.
पैशाचा हिशोब ठेवा
तुम्ही तुमचा खर्च कुठे कमी करू शकता हे ओळखण्यासाठी तुमचे सध्याचे उत्पन्न आणि खर्चाचा हिशोब ठेवायला सुरुवात करा. एक्सेल शीट हा तर एक उत्तम पर्याय. तुम्ही पैसे कुठे आणि कुठल्या कारणासाठी खर्च करत आहात याचा तुम्हाला अंदाज येईल आणि वायफळ खर्च कुठे होतोय याची तुम्हाला कल्पना येईल. तुमच्या उत्पन्नाचा काही भाग खास तुमच्या सुट्टीतील खर्चासाठी राखून ठेवा.
पर्यटनासाठी वेगळे सेव्हिंग खाते
ऐकायला जरा वेगळ वाटत असलं तरी आजकाल अनेक लोक पर्यटनासाठी लागणाऱ्या खर्चाची तजवीज एक स्वतंत्र सेव्हिंग खाते बनवून सुरु करतात. तुमच्या उत्पन्नातील ठराविक रक्कम त्या खात्यावर जमा करत चला, या बचतीचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल! .
अनावश्यक खर्च कमी करा
तुमच्या मासिक खर्चाचा तुम्हाला एकदा का अंदाज आला, तुम्ही तुमचा वायफळ खर्च कुठे होतोय हे ओळखू शकता आणि त्यानुसार पर्यटनासाठी सुरु केलेल्या स्वतंत्र सेव्हिंग खात्यात तुमची बचत वाढवू शकता. फास्टफूड, सिनेमा, कोल्ड ड्रिंक यावरचा खर्च कमी केला तरी तुमची चांगली बचत होईल
थोडक्यात काय तर घरचं जेवण खाण्यावर भर द्या, ज्यामुळे बचत तर होईल पण आरोग्य देखील चांगले राहील. तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवा आणि ओला-उबरवरचा खर्च नियंत्रित करा. छोट्या स्वरूपातील ही बचत दीर्घकाळासाठी एक उत्तम परतावा देईल हे विसरू नका.
ट्रॅव्हल डील आणि रिवॉर्ड प्रोग्राम्स एक्सप्लोर करा
ट्रॅव्हल डील, सवलत आणि लॉयल्टी प्रोग्राम्सवर लक्ष ठेवा. विशेष ऑफरचा लाभ घेण्यासाठी वेगवगेळ्या ट्रॅव्हल वेबसाइटला फॉलो करा आणि त्यांच्या लॉयल्टी प्रोग्राममध्ये सामील व्हा. ट्रॅव्हल पॉइंट्स किंवा प्रवासाशी संबंधित खर्चासाठी कॅशबॅक देणारी क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स वापरा.
या काही प्रातिनिधिक स्वरूपात सांगितलेल्या काही मोजक्या टिप्स आहेत. जर तुम्ही तुमच्या बचतीसाठी वचनबद्ध राहिलात, पुरेसे नियोजन केले तर तुम्ही तुमच्या पुढील सुट्टीसाठी पुरेसा निधी जमा करू शकता. लक्षात ठेवा, बचतीची लवकर सुरुवात करणे आणि त्यात सातत्य राखणे या चांगल्या सवयी तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महत्त्वाच्या आहे.