‘घर बघावे बांधून आणि लग्न करावे बघून’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. घर बांधताना आणि लग्न करताना कितीही नियोजन केले तरी वेळेवर काही ना काही गडबड ही होतेच. महागाईच्या युगात आता तर लग्नाचा खर्च देखील परवडत नाहीये. सामान्य नागरिकांना लग्नाचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागते.
जर लग्न मुंबईत होणार असेल तर? बापरे! मुंबई हे भारतातील सर्वात महाग शहर आहे. या शहरात लग्न करणे म्हणजे दिव्यच. खरे तर मुंबईत परवडणाऱ्या दरात लग्नाचे नियोजन करणे हे एक आव्हानात्मक काम आहे. परंतु, लग्नाचे बजेटिंगसह काळजीपूर्वक नियोजन केल्यास एक सुंदर आणि संस्मरणीय लग्नसोहळा आपल्याला अनुभवता येऊ शकतो.
तुम्ही देखील मुंबईत खिशाला परवडणाऱ्या लग्नाची योजना आखत असाल तर या टिप्सचा जरूर विचार करा.
Table of contents [Show]
आधी बजेट मगच लग्न
लग्न हा खरे तर खासगी सोहळा असतो. नवदाम्पत्य वैवाहिक जीवनाला सुरुवात करणार असतात. या आनंदाच्या क्षणी आपले सगेसोयरे, मित्र-मंडळी देखील हजर हवीत असे आपल्याला वाटते. परंतु आपली इच्छा आणि आपले बजेट याचा ताळेबंद लागत नसेल तर, अंथरून पाहून पाय पसरा.
आधी लग्नाचे बजेट बनवा. किती खर्चात आपल्याला लग्न करायचे आहे हे एकदा ठरवले की पुढचे नियोजन करणे सोपे होऊ शकते. लग्नाचे ठिकाण, जेवणाचे नियोजन, कपडे आणि फोटोग्राफी यांसारख्या आवश्यक खर्चांचा आधी अंदाज घ्या. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील यासाठी प्रयत्न करा.
मुंबईत कपडे, हॉल, जेवण सगळचं काही परवडणाऱ्या दरात मिळणार नाही. त्यामुळे हॉलचे बुकिंग किमान 6 महिन्याआधी केल्यास स्वस्तात तुम्हांला हॉल मिळू शकेल. तसेच केटरर्ससोबत देखील आधीच बोलणी करून ठेवा. आधीच सर्व गोष्टी बुक केल्यास तुम्हांला नक्कीच फायदा होऊ शकतो.
नेमके पाहुणे, उत्तम नियोजन
लग्नसोहळा हा आयुष्यातील महत्वाचा प्रसंग असतो. तुमच्या जवळच्या लोकांसोबत तुम्ही हा सोहळा अनुभवला तर अविस्मरणीय आठवणी तुम्ही जमा करू शकता. मात्र लग्नासाठी तुम्ही जर भरभरून पाहुणे मंडळी बोलवत असाल तर आलेल्या पाहुण्या-रावळ्याचे नियोजन करणे तुम्हांला महागात पडू शकते.
जितके जास्त लोक, तितका जास्त खर्च, हे विसरू नका. मुंबईतील लग्नांमध्ये जेवणाचा प्लेटनुसार हिशोब असतो.सरासरी एका प्लेटसाठी 400-500 रुपये खर्च येतो.
आठवड्याच्या शेवटी, म्हणजे शनिवार आणि रविवार या दिवशी हॉलला खूप मागणी असते. तसेच सुट्टीचा दिवस असल्याने अधिक पाहुणे येण्याची शक्यता असते. त्यामुळे शनिवार-रविवार सोडून जर तुम्ही लग्नाचा दिवस ठरवणार असाल तर ते तुमच्या फायद्याचे ठरू शकते.
तुमच्या जवळचे मित्र-मंडळी, पाहुणे तुमच्या लग्नासाठी कसेही पोहोचतील, त्याची चिंता तुम्ही करण्याची गरज नाही!
लग्नाचे ठिकाण निवडताना काळजी घ्या
मुंबईत भव्य-अलिशान हॉटेल्सपासून लहान बँक्वेट हॉल, कम्युनिटी हॉल, गार्डन्स, रिसोर्ट आदी सुविधा उपलब्ध आहेत. तुमच्या बजेटनुसार तुम्ही ही ठिकाणे निवडू शकता. मुंबईत हॉलचा खर्च प्रचंड आहे हे विसरू नका. 25 हजार ते 15-20 लाख रुपयांचे हॉल देखील मुंबईत उपलब्ध आहेत.
मुंबईतील जोडप्यांनी खरे तर लग्नाचे ठिकाण निवडताना विशेष काळजी काळजी घ्यायला हवी. लग्नासाठी असे हॉल निवडावेत जिथे केटरर्सची मोनोपोली नसेल. हॉलवालेच आपल्या जेवणाची सुविधा करत असतील तर साहजिकच ते आपल्याला महागात पडू शकते. आपल्याला हवे ते खाद्यपदार्थ, कमी बजेटमध्ये ठरवणे अशावेळी अवघड होऊ शकते. या सर्व गोष्टींचा देखील विचार व्हायला हवा.
डेस्टिनेशन वेडिंगचा जर विचार करत असाल तर पैशाचा देखील अधिक विचार करावा लागेल हे लक्षात घ्या. मुंबईच्या आसपास इगतपुरी, नाशिक, कर्जत, माळशेज अशी काही डेस्टिनेशन वेडिंगची ठिकाणे आहेत. परंतु प्रवासाचा खर्च, वेडिंग प्लॅनरचा खर्च मोठा होईल.
जेवणावरचा खर्च सांभाळून…
लग्नसोहळ्यात सर्वात जस्त खर्च हा जेवणावर होत असतो. लग्नातील जेवणाचा मेन्यू ठरवताना उगाचच अनावश्यक खाद्यपदार्थ ठेवू नयेत. स्टार्टर्स ठेवताना त्यात मर्यादित व्हरायटी असेल याची काळजी घ्या. भरमसाठ स्टार्टर्सचे ऑप्शन ठेवले तर मेन कोर्स जेवण वाया जावू शकते. अनेकदा असा अनुभव येत असतो.
त्यामुळे अन्न वाया जावू नये आणि पैशाची देखील बचत व्हावी यासाठी जेवणाचे नियोजन पद्धतशीर करणे गरजेचे आहे. गुणवत्तेशी तडजोड न करता स्वादिष्ट आणि परवडणारे अन्न देऊ शकतील अशा स्थानिक केटरर्सचा शोध घ्या. .
वेडिंग प्लॅनर टाळा
मुंबईत लग्न करायचा विचार करत असताना वेडिंग प्लॅनरची मदत घेणे टाळा. स्वतः नवरा मुलगा आणि नवरी मुलगी लग्नाच्या नियोजनात सहभाग घेऊ शकत नाही. परंतु घरातील तरुण भावंडांना ही जबाबदारी दिली तर लग्नाच्या सजावटीचे, पाहुण्यांचे राहण्याचे, खाण्याचे नियोजन कमी खर्चात आणि उत्तम नियोजनात करता येऊ शकते. वेडिंग प्लॅनरचा अतिरिक्त खर्च टाळून घरातील व्यक्तींनीच याची जबाबदारी घेतली तर अनावश्यक खर्च टाळता येऊ शकेल.
लक्षात ठेवा, लग्नखर्चात बचत करणे म्हणजे आपल्या आनंद सोहळ्यात तडजोड करणे असा होत नाही. लग्नाचे काळजीपूर्वक नियोजन केल्यास,आपले प्राधान्यक्रम ठरवल्यास आणि बजेटचा विचार केल्यास, तुम्ही मुंबईत एक अविस्मरणीय लग्नसोहळा पार पाडू शकता.