• 03 Oct, 2022 22:31

पीएम किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता मिळाला नाही, अशी दाखल करा तक्रार

government  scheme farmer

जर तुम्ही 31 मे पूर्वी तुमच्या बँकेत KYC अपडेट केले असूनही 11 व्या हप्त्याची रक्कम मिळाली नसेल तर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी च्या अधिकृत संकेतस्थळ, इमेल, टोल फ्री क्रमांक यांच्या साहाय्याने तक्रार करू शकता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी (PM-Kisan Samman Nidhi) योजनेचा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत असल्याची घोषणा 31 मे रोजी केली. या 11 व्या हप्त्याचे पैसे मिळाले नसतील तर तुम्ही पीएम किसान योजनेच्या संकेतस्थळावर जाऊन तक्रार करू शकता.  तसेच या संकेतस्थळावर लॉगिन करून आपले नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे पाहू शकता. या योजनेच्या लाभासाठी 31 मे पूर्वी बँकेत केवायसी (KYC) अपडेट करणे गरजेचे होते.  जर तुम्ही KYC अपडेट करूनही पैसे आले नसतील तर तुम्ही त्याबाबत तक्रार करू शकता. यापूर्वी जानेवारीमध्ये सरकारकडून पीएम किसान योजनेच्या 10 व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले होते. पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात 2 हजार रुपये जमा  होतात.

 

पीएम किसानवर लॉगिन कसे करायचे 

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. इथे फार्मर कॉर्नर (Farmer Corner) या विभागात जाऊन बेनिफिशरी लिस्ट (Beneficiary List) वर क्लिक करून तुमचा राज्य, जिल्हा, तालुका, गाव निवडून लाभार्थ्यांची यादी पाहू शकता. तुमचे यादीत नाव किंवा खात्यात पैसे का आले नाही हे पाहण्यासाठी बेनिफिशरी स्टेस्टेस  वर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक टाकून तपशील मिळवा (Get Data ) वर क्लिक करा. 

हेल्पलाईनद्वारे माहिती घेता येते

pmkisan-ict@gov.in आणि pmkisan-funds@gov.in यावर ईमेल करून माहिती घेऊ शकता. किंवा 011-24300606,155261 या पीएम-किसान हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करू शकता. तसेच 1800-115-526 या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधू शकता.

लाभार्थी शेतकऱ्यांचे हप्ते कोणत्या बँकेत जमा होतात. 

निधी विभागाच्या मान्यताप्राप्त बँक आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या प्रायोजक बँकेद्वारे ठरलेल्या बँकांमधील लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये निधी हस्तांतरित केला जातो. शेड्यूल बँक, पोस्ट ऑफिस, ग्रामीण बँक, सहकारी बँक किंवा इतर कोणतीही वित्तीय संस्था असू शकते. या सर्व बँकिंग व्यवहाराची देखरेख नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) करते. 

पीएम किसान सन्मान निधी योजना काय आहे?

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan Samman Nidhi)  योजना 1 डिसेंबर 2018 पासून देशात लागू करण्यात आली. या योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांचा आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 4 महिन्यांच्या अंतराने 2 हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

पावसाळा सुरु होणार असल्याने सरकारकडून मिळणारी ही 2 हजार रुपयांची मदतही शेतकऱ्यांसाठी आधार ठरू शकते. जर तुम्हाला 11 वा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही वरील माहितीचा आधार घेऊन तक्रार करू शकता.