Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पती-पत्नी दोघेही नोकरी करणारे असतील तर त्यांच्यातील आर्थिक व्यवहार कसे असावेत!

पती-पत्नी दोघेही नोकरी करणारे असतील तर त्यांच्यातील आर्थिक व्यवहार कसे असावेत!

विविध कारणांमुळे आजकाल पती-पत्नी दोघांनाही नोकरी करावी लागत आहे. नोकरी करत असताना अशा जोडप्यांमधील आर्थिक व्यवहार (financial planning) कसे असायला पाहिजेत, याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

सध्या पती-पत्नी दोघेही नोकरी किंवा एखादा व्यवसाय करत असल्याची अनेक उदाहरणं आपण पाहतो. याची कारणं वेगवेगळी असू शकतील. काही जोडप्यांना नोकरी करण्याशिवाय पर्याय नसतो. तर काही जणांना आपापलं करिअर घडवायचं असतं. काही जोडपी पॅशन तर काही आवड म्हणून नोकरी करत असतात. नोकरीची ही कसरत सांभाळताना सुरूवातीची काही वर्षे खूप छान जातात. पण कालांतराने त्यात आर्थिक बाबींवरून ताणतणाव निर्माण होऊ शकतात. ते टाळण्यासाठी नोकरी करणाऱ्या पती-पत्नी यांच्यातील आर्थिक व्यवहार कसे असायला पाहिजेत याविषयी आपण चर्चा करणार आहोत.

एक जोडपं एकाच कॉर्पोरेट कंपनीत उच्च पदावर काम करतात. या दोघांची बँक खाती वेगवेगळी असून ते घरातील सर्व खर्च विभागून घेतात. उदाहरणार्थ, विजेचे बिल, दुधाचे बिल, किराण्याचे बिल, घरखर्च इत्यादी सर्व गोष्टींचा दर महिन्याला हिशोब करून दोघांना किती पैसे द्यावे लागतील याचा हिशोब मांडतात. अशाचप्रकारे अनेक जोडपी संसारासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी विभागून खर्च करतात. पण अशाप्रकारे पती-पत्नीने खर्च वाटून घ्यायचा की, दोघांपैकी एकानेच घरखर्च करायचा आणि दुसऱ्याचा पगार बचतीसाठी किंवा इतर गोष्टींसाठी वापरायचा हे प्रत्येकाच्या वैयक्तिक निर्णयावर अवलंबून आहे.

आर्थिक व्यवहारांबद्दल पारदर्शकता हवी

कोणत्याही नात्यात आर्थिक व्यवहारांबद्दल पारदर्शकता असेल तर त्या नात्यात कधीच कटूपणा येत नाही. याला पती-पत्नीही अपवाद नाहीत. दोघांना किती पगार मिळतो, त्या पगारातील रक्कम कशाप्रकारे खर्च करायची, किती पैशांची बचत करायची, कोणत्या बँकेत खाती आहेत, किती क्रेडिट कार्ड आहेत, याविषयीची सर्व माहिती जोडीदाराला असणे आवश्यक आहे.

माझा पगार-तुझा पगार

लग्नाच्या सुरुवातीला पती-पत्नीमध्ये तितकासा संवाद होत नाही. आर्थिक बाबींविषयी तर एकमेकांशी चर्चादेखील होत नाही. त्यामुळे सुरुवातीला घरातील खर्च जोडपी वाटून घेतात. पण लग्नाच्या काही काळानंतर खर्च वाटून न घेता जोडीदारापैकी एकाला मिळत असलेल्या पगाराची बचत करता येऊ शकते, याचा आढावा जोडप्यांनी घ्यायला हवा. अशाप्रकारे नियोजन करताना पती-पत्नीच्या नात्यात सर्व आलबेल आहे ना, हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे. दोघांमध्ये सतत भांडणे होत असतील किंवा हे नाते अधिक काळ टिकणे शक्य नाही, असे वाटत असल्यास एकमेकांसोबत आर्थिक व्यवहार करणे टाळणे योग्य ठरू शकते. अनेक जोडप्यांमध्ये लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही ‘माझा पगार-तुझा पगार’ असा संवाद ऐकायला मिळतो. जो एका परिपूर्ण नात्यासाठी योग्य नाही.

एकाच्या पगारातून खर्च करण्याची सवय 

जोडीदारापैकी केवळ एकाने घरखर्च करण्याचा पर्याय योग्य ठरू शकतो. जसे की, पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतात तेव्हा त्यांना खर्च वाटून घ्यायची सवय लागलेली असते. पण मूल झाल्यावर अथवा घरात वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यायची असल्यास जोडीदारापैकी एकाला नोकरी सोडण्याशिवाय पर्याय नसतो. अशावेळी फक्त एकाच्या पगारातून घरखर्च भागवण्याची सवय असल्यास जोडीदाराने नोकरी सोडल्यावर घरखर्च कसा भागवायचा याचे टेन्शन येत नाही. तसेच जोडीदारापैकी एकाचा पगार बचत करत राहिल्याने एक चांगली रक्कम खात्यात शिल्लक राहू शकते. ही रक्कम नवीन घर घेण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी वापरता येऊ शकते.

जोडीदारापासून लपवू नयेत या गोष्टी

  1. दोघांपैकी एकाने कोठे आर्थिक गुंतवणूक केली असेल तर ती जोडीदाराला माहीत असणे आवश्यक आहे.
  2. डेबिट - क्रेडिट कार्डचे पासवर्ड जोडीदारापासून लपवू नये.
  3. जीवन विमा काढला असल्यास त्याची माहिती जोडीदाराला द्यावी.
  4. बँक खाती आहेत, त्यात किती पैसे आहेत याची जोडीदाराला असावी.

एकूणच आर्थिक नियोजनाविषयी पती-पत्नींमध्ये सुसंवाद आणि सुस्पष्टता असावी. दोघांनी एकमेकांपासून काहीही लपवून ठेवू नये. यातील एकाचे निधन झाल्यास जोडीदाराला पैसे मिळवण्यास मनस्ताप होऊ शकतो. त्यामुळे आर्थिक बाबींविषयी नात्यात संवाद असणे गरजेचे आहे.