खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने आज बुधवारी 1 मार्च 2023 रोजी एमसीएलआर व्याजदरात 0.10% वाढ केली आहे. बँकेच्या व्याजदर वाढीनंतर गृह कर्ज आणि इतर कर्जांच्या व्याजदरात वाढ होणार आहे. तसेच विद्यमान कर्जदारांवर कर्जाचा मासिक हप्ता वाढेल.
आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईटनुसार आज 1 मार्चपासून एमसीएलआर व्याजदर 8.50% इतका वाढला आहे. त्याआधी तो 8.40% इतका होता. तीन महिन्यांचा एमसीएलआर दर 8.55% इतका वाढला आहे. सहा महिन्यांसाठीचा एमसीएलआर दर 8.70% इतका वाढला आहे. एक वर्षासाठी एमसीएलआरचा दर 8.75% इतका वाढला आहे. बँकेच्या व्याजदर वाढीनंतर गृह कर्जाचा ईएमआय वाढणार आहे. त्याचबरोबर वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जांच्या मासिक हप्त्यात देखील वाढ होणार आहे. एमसीएलआरनुसार ज्यांनी कर्ज घेतली असतील त्यांचा कर्जाच्या मासिक हप्ता वाढणार आहे.
आयसीआयसीआय बँकेचा बाह्य घटकांवर आधारित कर्जाचा दर हा 9.25% इतका आहे. बाह्य घटकांवरील कर्जदर हा रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराशी संलग्न आहे. हा व्याजदर 30 सप्टेंबर 2022 पासून लागू असल्याचे आयसीआयसीआय बँकेने म्हटले आहे.
यापूर्वी ICICI Bank ने ठेवीदारांना खूश केले
आयसीआयसीआय बँकेने नुकताच ठेवींच्या व्याजदरात 0.25% इतकी वाढ केली होती. 2 कोटींहून अधिक आणि 5 कोटींपेक्षा कमी रकमेच्या मोठ्या मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवण्यात आला होता. आयसीआयसीआय बँकेचा 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या ठेवींचा व्याजदर 4.75% ते 7.15% या दरम्यान आहे. 15 महिने ते 2 वर्षांच्या मुदत ठेवींवर 7.15% इतके व्याज आहे. 2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्ष मुदत ठेवींवर 7% आणि 3 वर्षांहून अधिक आणि 10 वर्षांपर्यंतच्या ठेवींवर 6.75% इतके व्याज मिळेल, असे बँकेने म्हटले आहे.
बँकेने 7 ते 29 दिवसांच्या ठेवींवरील व्याजदरात 0.15% वाढ करुन तो 4.75% इतका केला होता. 30 ते 45 दिवसांच्या ठेवींवरील व्याजदरात बँकेने 0.25% वाढ केली असून त्यावर आता 5.50% व्याज मिळणार आहे. 46 दिवस ते 60 दिवसांच्या ठेवीवर 5.75% व्याज मिळेल, असे बँकेने म्हटले आहे. 61 दिवस ते 90 दिवसांच्या ठेवींवर 6% आणि 91 दिवस ते 184 दिवसांच्या मुदत ठेवींवर 6.50% व्याज मिळणार आहे.
रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरवाढीचा परिणाम
गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने पतधोरणात व्याजदर वाढवला होता. रिझर्व्ह बँकेने रेपो दर 0.25% ने वाढवला आणि तो 6.50% इतका केला होता. महागाई अद्याप जास्त असल्याने रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सहाव्यांदा वाढ केली होती. सहा वेळा पतधोरणात झालेल्या दरवाढीनंतर रेपो 2.50% ने वाढला आहे. महागाईचा आलेख असाच वाढत राहिला तर यापुढे व्याजदर वाढीचे सत्र सुरुच राहील, असे संकेत आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले होते. रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरवाढीनंतर बँकांनी देखील व्याजदरात वाढ केली होती.