मागील काही दिवसांपासून चीनने सीमेवरील हरकती वाढवल्या आहेत. भारतीय भू-भागात घुसखोरी होत असल्यामुळे चिनी मालावर बहिष्कार टाकावा, अशी मागणी विरोधक आणि भाजप समर्थकांकडूनही होत आहे. मात्र, जर भारताने चिनी मालावर बहिष्कार घातला तर त्याचा तोटाच भारताला होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांतील व्यापाराची आकडेवारी पाहता भारताच्या व्यापारात तूट आहे. ही तूट कमी करण्यासाठीही चिनी मालावर निर्बंध घालावेत, अशी मागणी होत आहे.
2021-22 सालात भारताच्या एकूण आयातीपैकी चीनमधून झालेली आयात सुमारे पंधरा टक्के आहे. मात्र, ही चीनच्या एकूण व्यापाराच्या फक्त 2.8% आहे. त्यावरून असे दिसून येते की चीनला निर्बंधामुळे तोटा होण्यापेक्षा भारतालाच जास्त तोटा होऊ शकतो. सोबतच चीनकडून जो माल भारत आयात करतो, तो भारतीय अभियांत्रिकी, फार्मा आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगासाठी अति महत्त्वाचा आहे. जर भारताने चिनी मालावर निर्बंध घातले तर त्याचा फटका स्थानिक उद्योगांना बसेल.
भारत चीनला फक्त एकूण निर्यातीच्या 5% वस्तू निर्यात करतो. त्यामुळे चीनने भारतीय वस्तूंवर बंदी घातली तरी जास्त काही फरक पडणार नाही. मात्र, हे पूर्णत: खरे नाही. जर चीनने भारतीय उद्योगांसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कच्च्या मालाची आयात रोखली तर त्याचा फटका येथील उद्योगांना बसेल.
२०२१ साली भारताने चीनकडून सुमारे ८७ बिलियन डॉलर मुल्याच्या वस्तू आयात केल्या. यामध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रिकल मशिनरी, अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियंट, बॉयलर, न्युक्लिअर रिअॅक्टर, ऑरगॅनिक केमिकल, इलेक्ट्रिकल मशिनरी, प्लास्टिकच्या वस्तू आणि खतांचा समावेश होता. या वस्तू चीनकडून आयात होणे बंद झाले तर भारतीय उद्योगांना आणि ग्राहकांनाही फटका बसेल. त्यामुळे जरी चिनी मालावर निर्बंध घालण्याची मागणी केली जात असली तरी त्याचा तोटा भारताला जास्त होईल, असे दिसते. याउलट चिनी मालावर बंदी न घालता भारताने युरोपीयन युनियन सोबत व्यापार वाढवला पाहिजे. तसेच मुक्त व्यापार करारावर लवकर सह्या केली पाहिजे. त्यामुळे भारताचा इतर देशांशी व्यापार वाढेल. तसेच चीनचा इतर देशांशी मिळून सामना केला पाहिजे.