उन्हाळा सुरू झाला आहे. त्यात सध्या वातावरणातील उष्मा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे रात्रीची निवांत झोप मिळवण्यासाठी पहाटेपर्यंत नियमितपणे एसीचा वापर केला जात आहे. पण यामुळे विजेच्या बिलास भरमसाठ वाढ होत आहे. अशावेळी गार वाऱ्याबरोबरच बिलही कमी करण्याच्या काही टीप्स आपण जाणून घेणार आहोत.
बऱ्याच जणांना एसी कसा वापरावा याची योग्य पद्धत माहित नसते. म्हणजे त्यांचा संबंध फक्त एसीतून थंड हवा येते, इतकाच असतो. पण ती थंड हवा किती आणि कशी घ्यायची याची त्यांना पुरेशी माहिती नसते. त्यामुळे बरेच जण AC 20-22 डिग्रीवर ठेवतात आणि रुममधील वातावरण जेव्हा बऱ्यापैकी थंड होते. तेव्हा त्यांना थंडी वाजू लागते. मग ते अंगावर पांघरून घेतात. बरेच जण एसीचा असाच वापर करतात. पण ही चुकीची पद्धत आहे. यामुळे शरीरावर विपरित परिणाम तर होतोच. त्याचबरोबर विजेचे बिल सुद्धा भरमसाठ येते.
माणसाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान 37 डिग्री सेल्सियस असते.त्यानुसार माणसाचे शरीर 23 ते 39 अंशांपर्यंतचे तापमान सहन करू शकतो. त्यानंतर मात्र शरीर या तापमानात साथ देऊ शकत नाही. यामुळे त्या व्यक्तीला थंडी वाजणे, शिंका येणे किंवा चक्कर येणे असा त्रास होऊ शकतो. यामुळे शरीरावर गंभीर परिणाम देखील होऊ शकतो.
AC वापरण्याची योग्य पद्धत काय?
एसी हा किमान 26 अंशावर ठेवावा आणि त्यावेळी पंखा कमी वेगाने फिरेल असा ठेवावा. यामुळे त्या खोलीतील हवा खेळती राहते. तसेच संपूर्ण घरभर थंड हवा पसरते. एसीचे तापमान 26 अंश असले तरी ते बाहेरील वातावरणापेक्षा खूपच कमी असते. यामुळे शरीराचे तापमान योग्य राहण्यास मदत होते.
तसेच एसी 26 अंशावर ठेवल्याने विजेचे बिल सुद्धा कमी येते. ग्लोबल वार्मिंगचे परिणाम कमी करण्यासही याची मदत होते. समजा 5 दशलक्ष घरांमधील AC 26 अंशावर ठेवून वापरल्यास त्या प्रत्येक घरातून सुमारे 1 युनिट विजेची बचत होईल त्यातून प्रति दिन 5 दशलक्ष युनिट वीज वाचू शकते. त्यामुळे 26 डिग्रीपेक्षा कमी अंशावर एसी चालवू नका.