काही अडचणींमुळे आपल्याला विम्याचा हप्ता वेळेवर भरणे शक्य होत नाही. अशा स्थितीत विमा कंपन्यांकडून साधारणतः एक महिन्यांची अतिरिक्त मुदत ग्रेस पीरियड (Grace Period) म्हणून दिली जात असते. हप्ता भरण्याच्या शेवटच्या तारखेपासून पुढे एक महिना ग्रेस पीरियड असतो. पण त्यानंतरही तो हप्ता भरणे काहींना शक्य होत नाही. परिणामी ती पॉलिसी बंद पडते.
जीवन विमा हा एक करार असतो आणि त्यात पहिला पक्ष हा विमाधारक असतो आणि दुसरा पक्ष विमा पॉलिसी उतरवणारी कंपनी. या कराराचे नियम आणि अटी पॉलिसीच्या कागदपत्रात दिलेली असते. परंतु बहुतांश मंडळी अटीतील बारकावे पाहत नाहीत.
पॉलिसी लॅप्स झाल्यामुळे किंवा बंद पडल्यामुळे विमाधारकाची जोखीम /रिस्क कव्हर संपते. वास्तविक, कोणत्याही विमाधारकाची पॉलिसी बंद पडावी असे कंपनीला वाटत नसते. कारण त्यात त्यांचेही नुकसान असते. त्यामुळे पॉलिसी सुरू ठेवण्याबाबत विमा कंपन्या ग्राहकांना इमेल, SMS किंवा आपल्या प्रतिनिधीमार्फत हप्ता जमा करण्याबाबत सूचना देतात. आता तर हप्ता भरण्याची थेट लिंकही SMSद्वारे पॉलिसीधारकाला पाठवली जाते. त्यामुळे शाखेत जाण्याची गरज भासत नाही.
पॉलिसी सुरु राहिल्यास त्याचे सर्व फायदे विमाधारकाला मिळतात. परंतु पॉलिसी बंद पडल्यास वारसदाराला दाव्याचा अधिकार मिळत नाहीत. त्यामुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन बंद पॉलिसी पुन्हा सुरू करण्याबाबत काही नियम तयार करण्यात आले आहेत. पारंपरिक विमा पॉलिसी बंद पडल्यानंतर पाच वर्षांपर्यंत ती पुन्हा चालू करता येणे शक्य आहे.
पॉलिसी सक्रिय करताना कंपनीकडून आरोग्य प्रमाणपत्र, आरोग्य तपासणी प्रमाणपत्र, हप्त्याच्या थकबाकीची रक्कम, विलंब शुल्क आदींची मागणी केली जाते. विमाधारक कंपनीला सर्वप्रकारचे कागदपत्रे आणि रक्कम भरत असेल तर बंद पॉलिसी पुन्हा सुरू होऊ शकते. आपल्याकडे मनी बॅक पॉलिसी असेल तर कंपनीला मनी बॅकच्या रकमेतून थकबाकी वजा करता येते. उदा. मनी बॅकच्या बंद पॉलिसीची हप्त्यापोटी 50 हजाराची थकबाकी असेल आणि 40 हजार रुपये मनी बॅक शिल्लक असेल तर विमाधारक हा अर्ज देऊन 40 हजाराची मनी बॅकची रक्कम विमा पॉलिसीत समाविष्ट करण्याची विनंती करु शकतो.
अलीकडील काळात काही विमा कंपन्यांनी कष्टकरी, गरीब वर्गासाठी विशेष योजना आणल्या आहेत. त्यानुसार 3 वर्षे हप्ते भरले नाहीत तरीही पॉलिसी सुरू राहते आणि विमाधारकाला कवचही मिळत राहते. याबाबत कंपनीकडे अथवा विमा प्रतिनिधीकडे विचारणा करुन घ्यावी.
आपण जर दीर्घकाळ विमा पॉलिसीधारक असाल आणि काही कारणास्तव हप्ते भरणे शक्य झाले नसेल तर कंपनीशी चर्चा करुन अशी पॉलिसी पुन्हा सुरू करताना विलंब शुल्क, दंड आदींमध्ये सवलत मिळवता येऊ शकते.