Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

घटस्फोटामुळे निर्माण झालेला होमलोनचा पेच कसा सोडवणार?

Divorce and Home Loan

घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरू असताना त्या जोडप्यांनी सर्व पर्यायांचा विचार करणं गरजेचं आहे. जेणेकरून भविष्यात त्यांना कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. विशेषत: त्या दोघांवर होमलोनची जबाबदारी असेल तर त्यांनी योग्य पर्याय निवडणं आवश्यक आहे.

घटस्फोटामुळे दोन व्यक्तींसोबत दोन कुटुंबांमध्ये दुरावा निर्माण होतो. हा दुरावा भावनात्मक तर असतोच. पण त्याचबरोबर यामुळे दोन्ही कुटुंबांना एका आर्थिक पेचप्रसंगातून जावे लागते. कारण घटस्फोटामुळे (Divorce) विभक्त होणारे नवरा-बायको हे एकमेकांशी जोडली गेलेली प्रत्येक वस्तू वेगळी करतात. या गोष्टी मानसिक ताण देणार्‍या असतातच. त्याचबरोबर अनेक आर्थिक समस्याही निर्माण करणार्‍या असतात. या भावनात्मक तणावाच्या वातावरणात आर्थिक बाबींवरही तितकेच लक्ष देणं महत्त्वाचं आहे. जर घराची खरेदी संयुक्त कर्जाने (Joint Loan) घेतलेली असेल तर जबाबदारीची विभागणी कशी होणार हा एक प्रश्न उरतो. अशा स्थितीत योग्य मार्ग काढल्यास विभक्त होणारं कुटुंब किचकट कायद्याच्या कचाट्यातून कशाप्रकारे वाचू शकते. याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.


सर्व पर्यायांचा विचार करा

घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरू असताना यादरम्यान कोणत्याही प्रकारचा करार करताना सर्व पर्यायांचा विचार करणं गरजेचं आहे. जेणेकरून भविष्यात कायदेशीर अडचणी येणार नाहीत. जर विभक्त होणाऱ्या जोडीने अगोदरच अशा पर्यायांची निवड केली असेल तर त्यांना भविष्यात उद्भवणार्‍या स्थितीचा सामना करणं सोपं होऊ शकत.

घर ठेवायचे की विकायचे?

होमलोन किंवा घरासंबंधी घेण्यात येणारा सर्वात मोठा निर्णय म्हणजे, ते घर ठेवायचे की विकायचे. जर त्यांना घर विकण्याची इच्छा असेल तर त्यातून मिळालेल्या पैशातून होमलोन फेडता येऊ शकते आणि उरलेले पैसे आपापसात वाटून घेऊ शकतात. यामुळे दोघांवर असलेल्या होमलोनच्या जबाबदारीतून बाहेर पडता येऊ शकते. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असताना दोघांच्या नावावर असलेलं घर विकून होमलोन फेडणं हाच एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

बांधकाम व्यवसायात मंदी असल्यास

जर रिअल इस्टेटमध्ये (Real Estate) मंदी असेल तर घराच्या विक्रीतून मिळणारा पैसा हा अपेक्षेपेक्षा खूपच कमी मिळू शकतो. अशा स्थितीत मालमत्ता विकण्याचा (Sale of Property) व्यवहार नुकसानकारक ठरू शकतो. परिस्थिती अशीही असू शकते जसे की, घटस्फोट घेणारे नवरा-बायको हे घर किंवा फ्लॅटचा ताबा घेण्याची वाट पाहत असतील आणि ते होमलोनचा ईएमआय (EMI) भरत असतील. तर अशावेळी त्या दोघांनी एका मध्यस्थीची मदत घेऊन हा व्यवहार पूर्ण करणं हिताचं ठरू शकतं.

जबाबदारीचे समान विभाजन 

घटस्फोटाच्या नियमानुसार प्रत्येक गोष्टीची फक्त वाटणी होत नाही; तर त्या दोघांनाही एकमेकांच्या संपत्तीतून, मालमत्तेतून आणि कर्जातून बाहेर पडावे लागते. साधारणत: घटस्फोट घेणार्‍या दाम्पत्यांचे लक्ष हे एकमेकांच्या मालमत्तेकडे असते. मात्र कर्जासारख्या जबाबदार घटकांकडे विभक्त होणार्‍या दाम्पत्याचे दुर्लक्ष होते.

जोडीदाराचा हिस्सा खरेदी करायचा

जर दोघांपैकी एकाला राहत्या घरावर अधिकार राखायचा असेल तर दुसर्‍याला संबंधित घराच्या भागीदारीची किंमत देऊन तो हिस्सा विकत घेता येऊ शकेल. यादरम्यान, घरासाठी अगोदर किती पैसा दिला आहे? याचाही हिशोब करावा लागेल. मालमत्तेच्या अधिकाराचे हस्तांतरण करण्यावर एकमत झाल्यानंतर बँकेला जोडीदाराचे नाव वगळण्यासाठी कळवावे लागेल.

बँकांच्या नियमांची पूर्तता

बँक दोन्ही घटकांशी निगडीत असलेल्या जोखमीची शक्यता लक्षात घेऊन होमलोन देत असते. जर संयुक्तपणे कर्ज दिले असेल तर त्या आधारावर दोघांचेही क्रेडिट रेटिंग (Credit Rating) होते. अशा स्थितीत दोघांपैकी जो घर राखण्याच्या तयारीत आहे; तो होमलोन फेडण्यासाठी सक्षम आहे, हे बँकेला सिद्ध करुन द्यावे लागेल. त्यानुसार बँक होमलोनचे व्हेरिफिकेशन करून त्यानुसार निर्णय घेऊ शकते.

टॅक्स सवलतीचे लाभ व कायदेशीर वाद

बहुतांश जोडपी ही संयुक्तपणे होमलोन (Joint Home Loan) घेतात. विशेषत: दोघेही नोकरदार असतील तर अशा स्थितीत होमलोनची रक्कम अधिक मिळण्यासाठी दोघेही संयुक्तपणे अर्ज करतात. जॉईंट होमलोनच्या स्थितीत दोघांनाही टॅक्स सवलतीमध्ये लाभ मिळतो. कारण दोघेही होमलोनचे ईएमआय भरत असतात. अशावेळी त्या जोडप्यांमध्ये वाद निर्माण झाल्यास किंवा ते कायद्याच्या कचाट्यात सापडल्यास त्याचा परिणाम दोघांवरही होऊ शकतो.