Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Insurance Mis-selling: चुकीची विमा पॉलिसी घेण्यापासून स्वत:ला कसे वाचवाल? 'या' गोष्टी ध्यानात ठेवा

Life Insurance fraud

तुम्ही जर सतर्क नसाल तर एखाद्या विमा पॉलिसीची गरज नसतानाही ती तुमच्या माथी मारली जाऊ शकते. मग पश्चाताप करण्याची वेळ येईल. बनावट कॉलद्वारेही फसवणूक होऊ शकते. पॉलिसी संदर्भातील काही माहिती जाणीवपूर्वक तुमच्यापासून लपवली जाते. आणि फक्त वरवरचे फायदे सांगून पॉलिसी विकली जाते यास Insurance Mis-selling असे म्हणतात.

Insurance Mis-selling: बाजारात विविध विमा आणि गुंतवणुकीच्या हजारो योजना आहेत. ग्राहक मिळवण्यासाठी कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. सर्वसामान्य ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा विमा एजंट आणि बनावट कंपन्यांकडून घेतला जातो. चुकीच्या विमा पॉलिसी ग्राहकांच्या माथी मारून एजंट कमिशन कमावण्याकडे लक्ष देतात. बऱ्याच वेळा विमा प्रतिनिधीचे लक्ष त्याचे पॉलिसी विकण्याचे टार्गेट पूर्ण करण्याकडे असते. या लेखात पाहूया चुकीच्या विमा पॉलिसी घेण्यापासून स्वत:चा बचाव कसा कराल?

बनावट कॉलद्वारे फसवणूक?

विमा कंपनीचा प्रतिनिधी बोलत असल्याचे फोनवरून नागरिकांना भासवले जाते. टर्म, जीवन, आरोग्य किंवा विविध गुंतवणुकीच्या आकर्षक योजनांची माहिती दिली जाते. बड्या कंपन्यांच्या नावे फोन येऊ शकतो. अनेक वेळा मोठ्या कंपन्यांच्या बनावट संकेतस्थळाचा वापरही यासाठी केला जातो. तुम्ही जर या संकेतस्थळावर माहिती दिली तर तुमचे खाते रिकामे होऊ शकते. 

फोन नंबरची खात्री केल्याशिवाय कोणतीही खासगी माहिती देऊ नका. तुम्हाला दिलेल्या योजनेची माहिती आणि कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती पडताळून पाहा. बनावट कॉल करणारे तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी पडताळणी कॉल ठेवतात. विविध मेलद्वारे माहिती मागितली जाते. तुमची कागदपत्रे आणि इतर माहिती घेतली जाते. यातून ग्राहकाला विश्वास पटतो. मात्र, अशा अज्ञात फोनवरून कोणतीही विमा पॉलिसी खरेदी करू नये.

विमा एजंटद्वारे चुकीची पॉलिसी घेणं कसं टाळाल?

तुम्ही बँकेत फक्त पैसे काढण्यासाठी गेले असाल तरी तेथे विमा आणि गुंतवणूक एजंट विविध योजनांची माहिती देत असतात. तसेच तुम्ही कर्ज सुविधा देणाऱ्या साइटवर नोंदणी केली असेल तर तेथील माहितीचा वापर करून एजंट फोन करतात. 

जेव्हा तुम्हाला एजंट एखाद्या योजनेची माहिती सांगतो तेव्हा लगेच कोणताही निर्णय घेऊ नका. विमा योजना तुमच्या गरजेची नसल्यास स्पष्टपणे नकार द्या. किंवा फक्त योजनेची माहिती घ्या. विमा कंपनी, योजना आणि त्याचे फायदे पडताळून पाहा. (What is Insurance Mis-selling) विमा एजंट पॉलिसीच्या फक्त सकारात्मक बाजू सांगतो. नकारात्मक बाजू सहसा सांगत नाही. कारण, पॉलिसी विकून त्याला कमिशन मिळणार असते. जसे की कमी परतावा, पॉलिसीतील बारकावे, व्याजदर नक्की किती मिळेल हे तो सांगत नाही. हे तुम्ही स्वत:हून अभ्यासू शकता. 

एकाच विमा पॉलिसीची माहिती घेऊन खरेदी करू नका. (How to avoid Insurance Mis-selling) बाजारात इतर कंपन्या कोणते बेनिफिट देत आहेत ते पडताळून पाहा. त्यानंतरच पॉलिसी खरेदी करा. पॉलिसी घेतल्यानंतर निर्णय चुकला असे वाटत असेल तर फ्री लूक पिरियडमध्ये पॉलिसी रद्द करा. तुम्ही भरलेले सर्व पैसे माघारी मिळतील. 

चुकीची पॉलिसी खरेदी करण्यापासून कसे वाचाल?

विमा प्रतिनिधीची ओळख पडताळून घ्या. प्रत्यक्ष भेटीत ID कार्ड पाहू शकता. फोनवर अधिकृत एजंट असल्याची ओळख पटल्याशिवाय काहीही माहिती देऊ नका. 

बिनव्याजी कर्ज, मोफत विमा योजना, बंद झालेल्या पॉलिसीचे पैसे काढून मिळतील असे कॉल बनावट असण्याची जास्त शक्यता आहे. 

तुमच्या आधीच्या पॉलिसीची माहिती विमा प्रतिनिधीला देऊ नका. 

प्राथमिक बोलणे झाल्यानंतर सर्व माहिती तुम्ही अधिकृत सोर्सद्वारे काढू शकता. ही माहिती पडताळून पाहा.