Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Insurance Frauds: विमा घेताय? होऊ शकते फसवणूक, जाणून घ्या सविस्तर

Insurance Frauds: विमा घेताय? होऊ शकते फसवणूक, जाणून घ्या सविस्तर

Image Source : www.canarahsbclife.com

Insurance Frauds: ऑनलाईन फसवणुकीच्या बातम्या रोजच आपल्याला ऐकायला येतात. फक्त याच ठिकाणी फसवणूक होते असं नाही. ती इतरही ठिकाणी होते. आज आम्ही तुम्हाला विमा (Insurance) घेताना कशी फसवणूक होऊ शकते याविषयी सांगणार आहोत. तसेच, त्यापासून स्वत:चा बचाव कसा करायचा हेही जाणून घेणार आहोत.

विमा घ्यायचा ठरवल्यावर आपण आपल्या सोयीनुसारच ते घेण्याला प्राधान्य देतो. पण, आपल्याला त्याची तेवढी माहिती राहत नाही. त्यामुळे स्कॅमर्स आपल्याला सहजरित्या फसवतात. पण, कधी-कधी तेही आपल्याला माहिती होत नाही. या प्रकारामुळे बऱ्याच जणांना फसवणुकीला सामोर जावे लागते. कारण, स्कॅमर्स ज्यांना विम्याविषयी काही माहिती नाही, त्यांना खोटी आश्वासनं आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन फसवतात. त्यामुळे आज आपण काही फसवणुकीचे प्रकार पाहणार आहोत. तसेच त्याच्यांशी कसं निपटायचं हेही जाणून घेणार आहोत.

फेक पाॅलिसी

फसवणूक करण्यासाठी काही स्कॅमर्स फेक पाॅलिसी विकतात आणि तेच खरे विमा एजंट असल्याचे भासवतात. त्यामुळे नवीन असलेली व्यक्ती या प्रकाराला बळी पडते आणि त्यांच्या जाळ्यात ओढल्या जाते. यासाठी हे स्कॅमर्स ऑनलाईन आणि फोनचा वापर करून त्यांना पाॅलिसीविषयी चांगल्या गोष्टी सांगतात. त्यामुळे ग्राहकांचा त्यांच्यावर लगेच विश्वास बसतो. अशा पद्धतीने फेक पाॅलिसी विकून स्कॅमर्स त्यांच्याकडून पैसे लाटतात.

एजंटपासून राहा सावध

बऱ्याचवेळा फेक एजंट पाॅलिसीच्या कव्हरेज, फायदे आणि प्रीमियमविषयी चुकीची माहिती देतात किंवा त्यात फेरफार करतात. याविषयी ग्राहकांना जास्त माहिती नसल्यामुळे, ते पाॅलिसी घेऊन टाकतात. पण, नंतर त्यांना समजते की यात बऱ्याच गोष्टी नाहीत, ज्या एजंटने पाॅलिसी घेताना सांगितल्या होत्या. त्यामुळे असाच त्यांचा पैसा वाया जातो.

प्रीमियम करत नाहीत जमा

स्कॅमर्स विमा एजंट असल्याचे भासवून बऱ्याच वेळा ग्राहकांकडून प्रीमियम कलेक्ट करतात. मात्र, कंपनीच्या खात्यावर ते पैसे ट्रान्सफर करत नाहीत. अशा पद्धतीची फसवणूक शक्यतो ऑफलाईन पाॅलिसी खरेदी करताना केली जाते. ग्राहकांना विश्वास असतो की आपल्याकडे पाॅलिसी आहे. पण, ग्राहक जेव्हा तिचा लाभ घ्यायला जातात, तेव्हा त्यांना कळते की आपली पाॅलिसीच नाही. त्यामुळे ऑफलाईन पाॅलिसी घेताना सतर्क राहणे गरजेचे आहे.

व्याजमुक्त लोनची ऑफर 

काही स्कॅमर्स पाॅलिसी घेणाऱ्याला त्यांच्या बिझनेससाठी व्याजमुक्त लोन देण्यात येईल, असे आश्वासन देऊन पॉलिसी विकतात. अशा आश्वासनांना काही जण लगेच बळी पडतात आणि पाॅलिसी घेतात.

नोकरीची गॅरंटी

काही स्कॅमर्स एखाद्या व्यक्तीला पाॅलिसी घेतल्यास, तिच्या संबंधी नोकरी देण्याचे आश्वासनंही देतात. त्यामुळे एखादी गरजू व्यक्ती नोकरी पाहत असल्यास, लगेच त्यांच्या जाळ्यात ओढली जाते.

असा करा तुमचा बचाव

  • कोणत्याही विमा कंपनीकडून पाॅलिसी खरेदी करताना, तिची सर्व माहिती काढणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही त्यांच्या वेबसाईटचा वापर करू शकता आणि पाॅलिसीविषयी महत्वाची माहिती काढू शकता.
  • एखाद्या एजंटने खूप चांगली ऑफर देऊ केल्यास, लगेच त्याला बळी न पडता. अशावेळी पहिले कंपनीची माहिती चेक करण्याला प्राधान्य द्या. कारण, कंपन्या त्यांच्या बजेटच्या बाहेर ऑफर देत नाही. त्यामुळे अशा एजंटपासून सावध राहा.
  • विमा पाॅलिसी घेण्यापूर्वी त्याविषयी असलेले पेपर पूर्ण वाचून घेणे आणि नियम व अटी समजून घेणे आवश्यक आहे.
  • पाॅलिसी घेताना ऑनलाईन खरेदी करण्याला पहिले प्राधान्य द्या. ते तुमच्यासाठी अधिक सुरक्षित ठरेल.
  • एखादी व्यक्ती पाॅलिसी विकण्यासाठी मागे लागली असल्यास, त्याला तुम्ही ओळखपत्र मागून आणि कंपनीविषयी विचारून त्याची माहिती काढू शकता.