Sweet Corn Farming : पावसाळ्यात नवनवीन रानमेवा खायला मिळतो. त्यामध्ये सर्वांच्या आवडीचे म्हणजे मक्याचे कणीस. थंडगार पाऊस सुरू असतांना गरम गरम मक्याचे कणीस खाण्यात वेगळीच मज्जा आहे, असे आपण नेहमी ऐकतो. पावसाळा सुरू होताच प्रत्येकाच्या मनात कणीस खाण्याची इच्छा निर्माण होते. त्यामुळेच मकेच्या कणासांची मागणी वाढते आणि शेतकऱ्याला भावही चांगला मिळतो. तर जाणून घेऊया, स्वीट कॉर्न लागवड कशी केली जाते?
अनेक शेतकरी जनावरांचा चारा म्हणून मका लागवड करतात. मात्र, मका हे पीक चाऱ्याबरोबरच कणसांच्या विक्रीतून चांगला नफा मिळवून देते. शहरी भागात अथवा पर्यटन स्थळी मकेच्या कणसांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. विशेषत: पावसाळ्यात याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि दरही चांगला मिळतो. शहरात भाजलेले एक कणीस 40 रुपयांपर्यंत विकले जाते. लहान व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी हा एक चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय ठरतो. तर शेतकऱ्यांसाठी देखील अशा व्यावसायिकांकडून कणसांना चांगला दर मिळू शकतो.
स्वीट कॉर्नची मागणी जास्त
स्वीट कॉर्न ही मक्याचीच एक जात आहे. खास करून भाजून अथवा उकडून खाण्यासाठी म्हणून या स्वीट कॉर्नला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मक्याचे कणीस परिपक्व होण्यापूर्वीच दुधाळ स्थितीत असतानाच त्याची काढणी केली जाते. स्वीट कॉर्नला सर्वत्र पसंती दिली जाते. त्यामुळे स्वीट कॉर्नची मागणी पाहता शेतकऱ्यांनी खास विक्रीसाठी म्हणून स्वीट कॉर्न मका लागवड केल्यास चांगल्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळू शकते.
स्वीट कॉर्न लागवड
- रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात तुम्ही स्वीट कॉर्नची लागवड करू शकता.
- स्वीट कॉर्नची लागवड करताना मकेच्या चांगल्या वाणाची निवड करावी.
- कमी वेळेत पक्व होणाऱ्या कीटक प्रतिरोधक जाती निवडणे उत्तम.
- लागवडीसाठी रानाची योग्य मशागत करून घ्यावी.
- सरी पद्धतीने पीक लागवडीस प्राधान्य द्यावे.
- 20 ते 30 सेमी अंतरावर सरीमध्ये मका टोचून घ्यावी.
- तण आणि कीड नियंत्रणासाठी वेळेवर अंतर्गत मशागत करावी
- वेळेवर खतांची मात्रा द्यावी, गरजेनुसार कीटकनाशकांची फवारणी घ्यावी
- पीक काढणीला आले असल्याची वेळत खात्री करावी
- स्वीट कॉर्नच्या लागवडीसाठी एकरी 5 हजार रुपये खर्च येऊ शकतो.
- ज्या बाजारपेठेत योग्य भाव आहे तिथेच पीक पाठवावे
- शक्यतो किरकोळ विक्रत्यांकडे मका विक्री केल्यास चांगला दर मिळू शकतो
किती उत्पन्न मिळू शकते?
स्वीट कॉर्नपासून अनेक पदार्थ बनवले जाते. शिवाय ते पौष्टिकही असते त्यामुळे त्याची मागणी जास्त असते. बाजारात मिळणारे अनेक वेपर्ससुद्धा स्वीट कॉर्नपासून बनवलेले असतात. मार्केटमध्ये स्वीट कॉर्नला चांगला भाव मिळतो. म्हणजेच यातून शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळू शकते. स्वीट कॉर्नला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी 20 ते 30 रुपये किलो अथवा प्रति नग किमान 5 आणि कमाल 12 रुपयांपर्यंतचा दर मिळतो.