Credit card limit: किरकोळ आणि आपत्कालीन काळात आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी क्रेडिट कार्ड हे उपयोगी ठरते. तसेच जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर योग्यपणे करत असाल म्हणजे तर त्याचे फायदेही घेता येतात. मात्र, बँकेकडून सुरुवातीला क्रेडिटची लिमिट ही कमी प्रमाणात दिली जाते. जर तुमचा वापर योग्य असेल आणि तुम्हाला तुमच्या कार्डची मर्यादा वाढवायची असेल, तर ती कशी वाढवायची? तसेच क्रेडिट स्कोअरची मर्यादा वाढवणे फायद्याचे आहे का? याबाबतची माहिती जाणून घेऊ..
Table of contents [Show]
क्रेडिट कार्डच्या मर्यादेत वाढ-
क्रेडिट कार्डची सेवा देणाऱ्या वित्तीय संस्था क्रेडिटची मर्यादा वाढवण्यासाठी नेहमीच तयार असतात. मात्र, क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यासाठी अनेक मुद्दे प्रभावी ठरतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे उत्पन्न, आणि तुमचा क्रेडिट स्कोअर हे होय. तसेच तुमच्या क्रेडिट कार्डच्या कर्जाची परतफेड करण्याचा इतिहास हा देखील क्रेडिटची मर्यादा वाढवण्यावर प्रभाव टाकणार घटक आहे. दरम्यान, पुढील काही मुद्दे विचारात घेऊन आपण क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवू शकतो
उत्पन्नाच्या तपशीलासह वित्तीय संस्थेकडे विनंती -
जर तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवायची असेल तर यासाठी तुम्हाला तुमचे एकूण वार्षिक उत्पन्न, तुमचा खर्च याबाबतच्या तपशीलांसह वित्तीय संस्थेकडे क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यासाठी अर्ज करावा लागेल. तुमचे उत्पन्न विचारात घेऊन वित्तीय संस्था क्रेडिट लिमिट वाढवण्यावर विचार करू शकतात.
तुमची बिले वेळेवर भरणे-
तुम्ही क्रेडिट लिमिटचा जेवढा वापर करता त्याची बिले नियमित आणि वेळेवर भरावीत. त्यामुळे तुमच्या सुरळीत आणि चोख व्यवहारामुळे क्रेडिट युटिलायझेशन रेशोनुसार तुम्हाला क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्यासाठी वित्तीय संस्थेकडूनच ऑफर दिल्या जातात.
क्रेडिट स्कोअर
तुमच्या क्रेडिटकार्डची मर्यादा वाढवण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असणे गरजेचे आहे. तुमचा क्रेडिट स्कोअर हा तुमच्या बिले भरण्याच्या सातत्यावर अवलंबून आहे. तुम्ही कर्जाची थकबाकी ठेवली अथवा, हप्ते चुकवल्यास तुमचा क्रेडिट स्कोअऱ कमी होतो. त्यामुळे क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यासाठी क्रेडिट स्कोअर चांगला ठेवणे गरजेचे आहे. तुमचा क्रेडिट स्कोअर बँकेच्या मानकांनुसार झाला की बँक तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा पुन्हा वाढवू शकते.
बँकेकडून ऑफर
जर तुम्ही क्रेडिट कार्डचा योग्य वापर करत असाल आणि तुमचा व्यवहार हा चोख असेल तर बँकेकडूनच तुम्हाला क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्यासाठी ऑफर मिळतात. त्यावेळी तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवून घेऊ शकता.
मर्यादेत वाढ करणे फायद्याचे की तोट्याचे
जर तुम्ही मर्यादीत खर्च करत असाल, किंवा तुमचे उत्पन्न चांगले असेल तर क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवल्यास त्याचे अनेक फायदे घेता येतात. मात्र, तुमचे उत्पन्न मर्यादित असेल आणि क्रेडिट कार्डची मर्यादा जास्त आहे. म्हणून तुम्ही खर्च करत असाल तर तुम्हाला तुम्हाला जास्त खरेदीची सवय लागू शकते. परिणामी तुम्हाला अधिकच्या कर्जांवाढीसारख्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते. तसचे तुम्ही थकबाकी वेळत भरू नाही शकल्यास तुमचे व्याजही जास्त जाते शिवाय तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो.