घराचं स्वप्न साकार करण्यासाठी बहुतांश मंडळी गृहकर्ज घेतात. व्याजदराची आकारणी कशी आहे, यावर कर्ज स्वस्त दरात मिळाले की, महाग याचे आकलन करता येते. अर्थात व्याजदरासंदर्भात आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित राहतो आणि तो म्हणजे फिक्स्ड दराचे (Fixed Rate) गृहकर्ज घ्यावे की फ्लोटिंग दराचे (Floating Rate). चालू महिन्यात आरबीआयने (Reserve Bank of India) दीर्घकाळानंतर अचानक धोरणात्मक व्याजदरात वाढ केली आणि ती तात्काळ लागू करण्यात आली. त्यानंतर अनेक बँकांनी व्याजदरात वाढ करण्यास सुरवात केली. अशावेळी घर खरेदीचा विचार करणार्या मंडळींना कर्जाचा कोणता प्रकार निवडावा यावरून संभ्रम राहू शकतो. फिक्स्ड घ्यावे की फ्लोटिंग. पण दोन्हीपैकी एकाची निवड करताना काही गोष्टी ध्यानात घेणे आवश्यक आहे.
फिक्स्ड रेटचा पर्याय निवडताना
फिक्स्ड रेट (निश्चित दर) च्या श्रेणीतील गृहकर्ज घेताना निश्चित केलेला व्याजदर हा संपूर्ण कालावधीत एकच राहतो. म्हणजेच दहा, वीस, तीस वर्षासाठी एकच व्याजदर ग्राहकाच्या कर्जाला लागू राहतो. हा पर्याय निवडताना पुढील गोष्टीवर विचार करा.
- यापेक्षा व्याजदर आणखी कमी होणार नाही, असे वाटत असल्यास.
- व्याजदर अचानक कमी झाले आणि तो दर कायम ठेवायचा असेल तर
- सध्याच्या काळात असणारा हप्ता हा दीर्घकाळासाठी परवडणारा आहे, असे जर वाटत असल्यास.
फ्लोटिंग रेटवर गृहकर्ज घेताना
बाजाराच्या हिशोबाने फ्लोटिंग रेट हा कमी जास्त होत असतो. हा दर बेंचमार्क रेटशी जोडलेला असतो. उदा. काही दिवसांपूर्वीच आरबीआयने धोरणात्मक दरात वाढ केल्यानंतर बँकांनी देखील आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ केली. आरबीआयने पुढील काळातही दर वाढविले तर बँक देखील पुन्हा व्याजदरात वाढ करू शकते. यानुसार आपण फ्लोटिंग रेटचा पर्याय निवडताना काही बाबींचे आकलन करावे.
फिक्स्ड होम लोनचा दर हा सर्वसाधारणपणे फ्लोटिंग रेट लोनपेक्षा अधिक असतो. हा फरक खूप असेल तर आपण फ्लोटिंग रेटचा विचार करू शकता. यात कमी कालावधीत व्याजापोटी होणारा खर्च हा काहीप्रमाणात वाचवू शकता.
- आगामी काळात व्याजदर कमी होण्याची शक्यता वाटत असेल तर
- लोन प्रीपेमेंटच्या बाबतीत पेनल्टीपासून वाचायचे असेल तर
होम लोनच्या पर्यायाबाबत संभ्रमात असाल तर आपण दोन्ही पर्यायांची निवड करू शकता. म्हणजेच थोडे फिक्स्ड आणि थोडे फ्लोटिंग. उदा. आपण अन्य कर्जाचा हप्ता भरत असाल तर गृहकर्जासाठी फिक्स्ड दराच्या आधारावर होम लोनचा पर्याय निवडू शकता. पहिले कर्ज संपल्यानंतर आपण उर्वरित काळासाठी फ्लोटिंगचा पर्याय निवडू शकता. या प्रकियेसाठी काही बँका शुल्क आकारतात.