बँकेत खाते सुरु करणे हे तसे सोपे काम आहे. पण ते टिकवणे आणि नीट चालवणे हे थोडे कष्टाचे असू शकते. त्या खात्याचे योग्य व्यवस्थापन जर झाले तर तुमचे बरेच पैसे वाचू शकतात आणि ह्या चांगल्या सवयी तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतात.
बहुतेक जणांची बॅंकेत एका पेक्षा जास्त खाती असू शकतात आणि काही वेळेस एका पेक्षा जास्त शहरांमध्ये ही असू शकतात. असं करणं जरी बेकायदेशीर नसलं तरी ही खाती व्यवस्थापित करणे हे खूप जिकिरीचे काम ठरू शकते. वेगवेगळ्या ठिकाणी असलेली खाती सांभाळणे हे आता डिजिटल पद्धतीमुळे सोपे वाटत असले तरीही काही व्यवहार मात्र त्या त्या शाखेत जाऊनच करावे लागतात. त्यामुळे शक्यतो जास्त आणि निरनिराळ्या ठिकाणी खाती काढणे टाळा.
किमान शिल्लक ठेवा आणि ओव्हरड्राफ्ट टाळा
तुमच्याकडे झिरो बॅलन्स खाते असल्याशिवाय, बहुतेक खाजगी बँकांना तुम्ही किमान (तिमाही) शिल्लक ठेवण्याची आवश्यकता असते. तुमच्या खात्यात आवश्यक असेल तितका कमीत कमी निधी कायम असल्याची खात्री करा. अन्यथा तुम्हाला बॅलन्स पुरेसा न ठेवल्या बद्दल बँक दंड आकारू शकते आणि त्या दंडाद्वारे तुमची बरीच रक्कम खात्यातून कमी होवू शकते. तुमच्या मुदत ठेवींसाठी म्हणजेच फिक्स डिपॉझिट्ससाठी स्वीप-इन आणि मोबाईल अकाउंट अलर्ट यांसारख्या सुविधांचा वापर करून तुमची शिल्लक ठराविक मर्यादा ओलांडल्यावर तुम्हाला अलर्ट देणारे संदेश मदतीचे ठरू शकतात
त्याच बँकेची एटीएम मशीन वापरा
आरबीआयच्या नियमांनुसार, अनेक बँका पहिल्या पाच मोफत व्यवहारांनंतर अन्य बँकांच्या ATM मशीन मधून रोख पैसे काढण्यासाठी शुल्क आकारतात. त्यामुळे आपल्या बँकेच्या ATM मधूनच शक्यतो सर्व व्यवहार करणे फायदेशीर ठरू शकते. यामध्ये फक्त पैसे काढणे समाविष्ट नसून अन्य गोष्टी जसे की, खात्यातील शिल्लक रक्कम तपासणे, ATM पिन क्रमांक बदलणे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी देखील समाविष्ट आहेत. ही पद्धत देशात आणि देशाबाहेर देखील आहे.
बँक स्टेटमेंट्स तपासा
कोणत्याही त्रुटी, संशयास्पद/अनधिकृत एन्ट्रीज, अज्ञात किंवा न समजणारे बँक शुल्क किंवा दंड आकारले गेले नाहीत, याची खात्री करण्यासाठी तुमच्या स्टेटमेंटचे किंवा कोणत्याही बँकेच्या नोटीसचे नियमितपणे आणि तत्परतेने वाचन करा. काही चुकले असल्यास, तुमच्या बँकेशी संपर्क साधा आणि तुमची तक्रार ताबडतोब कळवा.
मोबाइल-ऑनलाइन बँकिंग सुरक्षितता
लाखो ग्राहकांनी त्यांच्या खात्यातील शिल्लक, त्यांची बिले भरण्यासाठी आणि त्यांचे पैसे कुठे जातात याचा मागोवा घेण्यासाठी डिजिटल साधने वापरण्यास सुरुवात केली आहे. मोबाईल आणि ऑनलाइन बँकिंगमुळे काही वेळेस मोठे नुकसान ही होऊ शकते. तसेच, तुमच्या मोबाईल / कॉम्प्युटरमध्ये आवश्यक अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर, फायरवॉल, पिन, पासवर्ड यांसारख्या संरक्षक गोष्टींचा वापर करुन हा धोका कमी केला जाऊ शकतो. याशिवाय सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपला मोबाइल आणि नेट बँकिंगचा कोणताही पासवर्ड इतरांना शेअर करू नका.
अनावश्यक शुल्क टाळा
जर तुम्ही कोणाला चेक दिला असेल तर खात्यात पुरेसे पैसे आहेत का हे तपासून घ्या. जर चेक क्लिअर नाही झाला तर तुम्हाला बँकेकडून दंड आकारला जाऊ शकतो. तसेच तुम्ही ज्याला चेक दिला आहे. त्याच्याकडून तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. म्हणून चेक देताना कायम काळजीपुर्वक व्यवहार करा.
बिले वेळेवर भरा
क्रेडिट कार्डची बिले वेळेवर भरा. समजा बिल भरण्याच्या तारखेला पैसे भरले नाहीत तर बिलाच्या रकमेवर तुम्हाला अतिरिक्त व्याज भरावे लागू शकते. क्रेडिट कार्डची बिले भरण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी तुम्ही तुमचे खाते आणि कार्ड लिंक करु शकता जेणेकरुन तुमच्या खात्यातुन कार्डाची रक्कम आपोआप भरली जाईल.
बँकिंगच्या या चांगल्या सवयी केवळ तुमचे जीवन सोपे करत नाही. तर काही प्रमाणात तुम्हाला अनावश्यक खर्च कमी करण्यास आणि थोडी अधिक बचत करण्यास मदत करतील.