LPG insurance policy: तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या घरातील LPG गॅस सिलेंडरवर 50 लाख रुपयापर्यंतचे विमा संरक्षण मिळते. या विम्याबाबत अनेकांना माहिती नाही. गॅस वितरक कंपन्याही या विम्याबाबत जाहिरात करत नाहीत. जर गॅस गळतीमुळे दुर्घटना घडली तर जीवित किंवा मालमत्तेची हानी भरून निघू शकते. त्यासाठी तुमच्याकडे नोंदणीकृत गॅस कनेक्शन असायला हवे. दुर्घटनेस जर तुमचा निष्काळजीपणा जबाबदार असेल तर विम्याचा दावा नाकारला जाईल.
गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याच्या अनेक बातम्या तुम्ही वृत्तपत्रांमधून वाचल्या असतील. अशी आपत्ती कधीही आणि कोणावरही येऊ शकते. त्यामुळे तुम्ही आधीपासून जागृत असायला हवे. ज्यांना या विम्याबद्दल माहिती नाही त्यांना जागृत करा. गॅस कंपन्यांकडून विमा संरक्षण देण्यास कधीपासून सुरुवात झाली यास एक भारतातील मोठी घटना कारणीभूत आहे.
भोपाळ गॅस दुर्घटनेपासून धडा
भोपाळमधील युनियन कार्बाइड कंपनीत 1984 साली गॅस गळती झाली होती. या दुर्घटनेमुळे कंपनीतील आणि परिसरातील सुमारे 4 हजार नागरिक मृत्युमुखी पडले. त्यानंतर सरकारने पब्लिक लायबिलिटी कायदा 1991 (THE PUBLIC LIABILITY INSURANCE ACT, 1991) साली पास केला. घातक पदार्थ हाताळताना काही अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कंपनीची असेल असे या कायद्यात म्हटले आहे. त्यानंतर गॅस पुरवठादार कंपन्यांना ग्राहकांना संरक्षण देणे अनिवार्य करण्यात आले. मागील पंचवीस वर्षात या विमा संरक्षणाचा खूप कमी पिडित कुटुंबियांनी फायदा घेतला. फक्त माहिती नसल्याने ते या लाभापासून मुकले. गॅस पुरवठादार कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही या विम्याबाबत फारशी माहिती नाही, ही दुर्देवाची बाब आहे.
LPG इन्शुरन्स काय आहे? (What is LPG Insurance)
हा एक थर्ड पार्टी विमा कव्हर असून यास पब्लिक लायबिलिटी पॉलिसी असेही म्हटले जाते. इंडियन गॅस, भारत गॅस, हिंदुस्तान पेट्रोलियमसह इतर LPG पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना ही पॉलिसी काढणे अनिवार्य आहे. बहुतांश गॅस पुरवठादार कंपन्यांनी युनाइटेड इन्शुरन्स कंपनीकडून विमा पॉलिसी काढलेली आहे. मात्र, याचा प्रिमियम ते ग्राहकांकडून घेत नाहीत. कशी कायदेशीर परवानगी गॅस पुरवठादार कंपन्यांना नाही. कंपनी स्वत: विम्याचा मोठा प्रिमियम भरते. ग्राहकांना दुर्घटनेपासून संरक्षण मिळावे हा हेतू यामागे आहे.
दुर्घटना घडल्यास तीन गोष्टींपासून प्रामुख्याने संरक्षण मिळते (कंपनीनुसार विम्याची रक्कम बदलू शकते)
- गॅस दुर्घटनेत व्यक्तीचा मृत्यू झाल्यास 5 लाख रुपयांचे संरक्षण मिळते.
- दुर्घटनेत व्यक्ती जखमी झाल्यास 15 लाख रुपयांचे सरक्षण मिळते. मात्र, यात प्रति व्यक्ती 1 लाख रुपयांची मर्यादा आहे. तत्काळ मदतीसाठी प्रति व्यक्ती आधी 25 हजार रुपये दिले जातात.
- मालमत्तेच्या नुकसानीसही 1 लाखाचे विमा संरक्षण मिळते. ही मालमत्ता नोंदणीकृत असावी तसेच याच मालमत्तेच्या ठिकाणी गॅस कनेक्शन घेतलेले असावे. पुरवठादार कंपनीनुसार विम्याची रक्कम बदलू शकते.
दावा नोंदवल्यावर गॅस आणि विमा कंपनीचे एक पथक घटनास्थळी येऊन पाहणी करते. नुकसानीचा अंदाज घेऊन एक ठराविक रक्कम दिली जाते. प्रति व्यक्ती 10 लाख रुपये आणि एका दुर्घटनेसाठी जास्तीत जास्त 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळू शकते.
LPG दुर्घटनेचा क्लेम कसा कराल? (How to file claim after LPG gas accident)
- तुमच्या घरामध्ये गॅससंबंधित दुर्घटना घडल्यास सर्वप्रथम स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा.
- त्यानंतर गॅस एजन्सी/डिस्ट्रिब्युटरला दुर्घटना घडल्याचे लेखी कळवा. सोबत पोलीस तक्रार दाखल केल्याचा पुरावा तुम्ही जोडू शकता. गॅस एजन्सीकडे क्लेम दाखल करण्यासंबंधी माहिती मिळाली नाही तर तुम्ही थेट गॅस पुरवठादार कंपनीलाही संपर्क करू शकता. विम्याचा दावा ऑनलाइनही दाखल करता येतो.
- गॅस एजन्सी तुमच्या तक्रारीची माहिती पुरवठादार कंपनीकडे पाठवेल. जर फक्त मालमत्तेचे नुकसान झाले असेल तर गॅस कंपनीची एक टीम तुमच्या घरी येऊन नुकसानीची पाहणी करेल. त्यानंतर ठराविक रक्कम तुम्हाला भरपाई म्हणून दिली जाईल.
- जर दुर्घटनेत व्यक्तीचा मृत्यू झाल्यास - मृत्यू प्रमाणपत्र, शवविच्छेदन अहवाल आणि चौकशी अहवालसह इतर आवश्यक कागदपत्रे गॅस कंपनीकडे जमा करावे लागतील. त्यानंतर विमा मंजूर होईल.
- जर दुर्घटनेत व्यक्ती जखमी झाली असेल तर रुग्णालयाचे अॅडमिट कार्ड, ओरिजनल बिल, डॉक्टरांचे रिपोर्ट, प्रिस्क्रिप्शन, रुग्णालयाचे डिस्चार्ज कार्डसह इतर आवश्यक कागदपत्रे जमा करावे लागतील.
सिलेंडरची डिलिव्हरी घेताना काय काळजी घ्याल?
जेव्हा तुम्ही गॅस सिलेंडरची डिलिव्हरी घेत असता तेव्हा गॅसचे सील नीट आहे का हे जरूर तपासा. जर काही गडबड वाटल्यास डिलिव्हरी घेऊ नका. तसेच टाकीवर ISI मार्क असेल तरच टाकी घ्या. कारण, जर टाकी आयएसआय मार्क नसेल तर क्लेम मंजूर होणार नाही. गॅस एजन्सीचा आणीबाणी क्रमांक मोबाईलमध्ये सेव करुन ठेवलेले योग्य राहील. डिलिव्हरी दिल्यानंतर काही काळाने जर गॅस लिक असल्याचे जाणवल्यास एमर्जन्सी क्रमांकावर तत्काळ संपर्क साधा. गॅस संबंधित अधिक काळजी घेण्यासाठी पुरवठादार कंपनीचे संकेतस्थळ पाहा. यावर तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. त्यानुसार सुरक्षा बाळगा.