Mutual Fund चा गुंतवणूकीसाठी मोठ्या प्रमाणात विचार केला जातो. मात्र नेमकी कोणती स्कीम स्वीकारावी असा अनेकांना प्रश्न पडतो. यासाठी Mutual Fund निवडताना कोणकोणत्या बाबींचा विचार करणे आवश्यक असते ते जाणून घेऊया.
गुंतवणूकीचे ध्येय काय आहे?
गुंतवणूकीचे ध्येय काय आहे, याचा विचार Mutual Fund निवडताना महत्वाचा ठरतो. समजा तुम्हाला लहान कालावधीनंतर काही खर्च करायचा असेल तर इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याकडे टाळले जाते. कारण इक्विटी म्युच्युअल फंड दीर्घ कालावधीत चांगली कामगिरी करण्याची शक्यता जास्त असते. लहान कालावधीत जोखीम तुलनेने जास्त मानली जाते. जर समजा 3 वर्षांतर तुम्हाला कार घ्यायची आहे तर अशावेळी मूळ गुंतवणूक सुरक्षित राहणे महत्वाचे असते. या दृष्टीने विचार करता इक्विटी म्युच्युअल फंडापेक्षा डेट म्युच्युअल फंडला पसंती दिली जाते.
जर दीर्घकालीन ध्येय असेल. समजा निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी पैसे गुंतवले जात असतील. अशा वेळी इक्विटी म्युच्युअल फंडचा विचार करता येतो. इक्विटी म्युच्युअल फंड दीर्घ कालावधीसाठी असेल तर रिटर्न्स चांगले मिळण्याची शक्यता असते. यामुळे तुमच्या गुंतवणूकीचे ध्येय काय आहे, हे म्युच्युअल फंडची निवड करताना महत्वाचे ठरते.
जोखीम घेण्याची तयारी किती आहे?
तुमची जोखीम घेण्याची तयारी किती आहे, हा देखील म्युच्युअल फंडची निवड करताना एक महत्वाचा मुद्दा आहे. डेट म्युच्युअल फंड सुरक्षित तर इक्विटी म्युच्युअल फंड जोखीमयूक्त मानले जातात. सामान्यत: इक्विटी फंड हे अधिक परतावा देताना दिसतात. इक्विटी म्युच्युअल फंडामध्येही स्मॉल कप, मिडकॅप, लार्ज कॅप असे पर्याय उपलब्ध होतात. लार्ज कॅप तुलनेने कमी जोखीमयुक्त मानले जातात. Contra Mutual Fund, Value Fund असे पर्यायदेखिल म्युच्युअल फंडमध्ये उपलब्ध होतात. हे सर्व निर्णय घेताना जोखीम घेण्याची आपली क्षमता समजून घेणे महत्वाचे ठरते.
फंडाची कामगिरी
गुंतवणूकीचे ध्येय काय आहे, जोखीम घेण्याची तयारी किती आहे असे काही प्रश्न महत्वाचे असतात. त्याबरोबर अधिक पुढे जाताना फंड हाऊस, फंडाची कामगिरी, त्याला असणारे रेटिंग अशा बाबीदेखील महत्वाच्या ठरतात. केवळ फंडाची मागील कामगिरी हा एकमेव निकषच बघणे योग्य मानले जात नाही.
शेअर मार्केटचा सखोल अभ्यास करणे शक्य नाही त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय मानला जातो. मात्र म्युच्युअल फंडचे अनेक प्रकार असून त्यांच्या तपशीलाचा बारकाईने अभ्यास करून निर्णय घेणे योग्य ठरते.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)