स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाला वाटते, त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत राहतो. कधी जवळच्यांना विचारपूस करून तर कधी एजंटद्वारे परवडणारे घर पाहत असतो. एखादे घर आवडले की घ्यायची तयारी सुरू होते. मात्र, बऱ्याच वेळा कर्जाचे व्याजदर, तुमच्याकडील रोख रक्कम या सर्वांचा हिशोब केल्यास घराचे बजेट आवाक्या बाहेर जाऊ लागते. त्यामुळे घर खरेदीचे गणित विस्कळीत होते आणि घर घ्यायच्या नियोजनाला खीळ बसते. मात्र, घर घेण्यासाठी सुरुवातीपासूनच बजेटच्या प्लॅनिंगवर भर दिला तर तुम्हाला घर खरेदी करण्यासाठी फार अडचणी येणार नाहीत.
बजेट प्लॅनिंग आहे महत्त्वाचे
घर घेणे म्हणजे खूप खर्चाची गोष्ट आहे. त्यासाठी आधीपासून तुमच्याजवळ खर्चाचा प्लॅन असणे गरजेचे आहे. म्हणजे किती लाख रुपयांपर्यंतचे घर घ्यायचे आहे. तुमच्याकडे भांडवल किती आहे? समजा तुम्ही 2 बीएचके घेत असाल तर कमीतकमी तुम्हाला 5 ते 15 लाखापर्यंत डाउन पेमेंट करावे लागू शकते. त्यांनतर येणारा हफ्ता कितीचा ठरवायचा. हाही मुद्दा असतोच. त्यामुळे घर खरेदी करायचे ठरल्यावर व्यर्थ खर्च टाळणाऱ्यावर भर देणे गरजेचे आहे. तसेच, काही कर्ज असेल तर तेही चुकते करण्यावर लक्ष द्यावे लागेल. याशिवाय तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचा स्त्रोत वाढवावा लागेल. घर घेतल्यानंतर हफ्त्यांची परतफेड आणि दैनदिन खर्च याचे नियोजन आधिच करणे आवश्यक आहे. भविष्यातील खर्चाचे नियोजन करून तुम्ही बचतीचा आणि उत्पन्न वाढीचा मार्ग निवडल्यास तुमच्या भांडवलामध्ये चांगली वाढ होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला बजेट प्लॅनिंग करावे आणि त्यानुसार बाकीच्या गोष्टी करायला लागतील.
घर कुठे घ्यायचं?
एकदा तुम्ही बजेट ठरवल्यावर ते कुठे घ्यायचे या स्टेपकडे तुम्ही वळू शकता. तसेच, कोणत्या सुविधा असायला पाहिजे या गोष्टीवर ही विचार करू शकता. कारण, एकदा घर घेतल्यावर तुम्हाला तिथेच राहायचे आहे. त्यामुळे तुम्हाला जवळपास सर्व सोयी-उपलब्ध आहेत की नाही हे पाहणेही गरजेच आहे. नाहीतर स्वस्त आहे म्हणून तुम्ही घर घेण्याचा विचार केल्यास तुम्हाला परत अडचणींना सामोर जावे लागू शकते. त्यामुळे शाळा, ट्रान्सपोर्टींग, हाॅस्पिटल, मार्केट या गोष्टी तुमच्या घराच्या जवळपास असतील याची खात्री करून घ्या. त्यासाठी थोडे अधिक पैसे द्यावे लागले तरी चालतील. मात्र, त्यानंतरचा होणारा अनावश्यक खर्च टाळता येणार आहे.
बिल्डरची कामगिरी तपासा
घर कुठे घ्यायचे ठरल्यावर, तुम्ही त्या क्षेत्रातली कोणता बिल्डर चांगला आहे हे सर्च करू शकता. एखादा जुना बिल्डर असेल, त्याचे प्रोजेक्ट चांगले असतील तर तुम्ही त्याच्याकडे घराची विचारणा करू शकता. नव्या एखाद्या बिल्डरच्या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा हे तुमच्यासाठी चांगले राहील. कारण, मार्केटमध्ये सध्या खूप बिल्डर आहेत. त्यामुळे असेच बिल्डर निवडा ज्यांचे काम चांगले आहे. याचबरोबर त्यांच्याकडून डाउन-पेमेंटपासून इतर महत्वाच्या कागदपत्रांविषयी पूर्ण माहिती विचारून घ्या. जेणेकरून मार्केटमध्ये काय रेट आहेत. हे तुम्हाला कळू शकेल.
होम लोनची माहिती काढा
मार्केटमध्ये कुठे कमी व्याजदरावर लोन मिळत आहे हे तपासा. त्याचबरोबर इतर बँकाच्या व्याजदरांची तुम्ही घेणार असलेल्या बँकेतील लोनशी तुलना करून पाहा. यामुळे तुम्हाला योग्य व्याजदर जाणून घ्यायला मदत होवू शकते. तसेच, लोन प्रोसेसिंग फी किती आहे, प्री-क्लोजर चार्जेस, लेट फी किती लागू शकते, अशा सर्व गोष्टींची चौकशी केल्यावर तुम्हाला ज्या ठिकाणी योग्य सवलत असल्याचे लक्षात आले. त्या ठिकाणी तुम्ही लोनसाठी बोलणी करू शकता.
कागदपत्रे तपासणे गरजेचे
तुम्ही जे घर घ्यायचे ठरवले तर त्या घराची अथवा जागेची सर्व जुनी कागदपत्रे तुम्हाला त्या घर मालकाकडून घ्यावी लागतील. म्हणजे सर्व खरेदी पत्र तुम्हाला तपासावे लागतील. या संबंधी तुम्हाला समजत नसल्यास एखाद्या जाणकार व्यक्तीकडून किंवा वकिलाकडून तुम्ही त्या गोष्टी समजून घेवू शकता. असे न केल्यास भविष्यात तुम्हाला त्रास होवू शकतो. यासाठी थोडे जास्तीचे पैसे गेले तरी चालतील पण तज्ज्ञ व्यक्तीला सोबत घेवून तुम्ही घराचा व्यवहार करायला पाहिजे. यामुळे घर खरेदी करताना तुमची प्रोसेस एकदम सोपी होवू शकते.
घर घ्यायच्याआधी तुम्ही वरील गोष्टी समजून घेवून त्यानुसार प्लॅनिंग केल्यास तुम्हाला घर विना टेन्शन घ्यायला नक्कीच मदत होईल.