“देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी” असा काहीसा अनुभव देणारी केंद्र सरकारची आरोग्य विमा योजना म्हणजे “”आयुष्मान भारत योजना” (ABY). ही योजना “प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” (PM-JAY) तसेच “मोदी केअर योजना” या नावांनी देखील ओळखली जाते. या योजनेअंतर्गत दारिद्रय-रेषेखाली असलेल्या कुटुंबांसाठी प्रतिवर्ष प्रति-कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विम्याचे संरक्षण (हेल्थ इन्शुरन्स कव्हर) दिले जाते, म्हणजेच या योजनेस पात्र असणारी कोणतीही गरीब व्यक्ती सरकारी किंवा गैरसरकारी (प्रायव्हेट) हॉस्पिटलमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत विनामूल्य उपचार घेऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही योजना एक पेपरलेस (डॉक्युमेंट्स-विरहित) योजना आहे.
सन् 2011 मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील ग्रामीण आणि शहरी भागांतील दारिद्रय-रेषेखालील कुटुंबाना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ABY किंवा PM-JAY योजनेद्वारे पुरविण्यात आलेले हेल्थ I-कार्ड (आरोग्य ओळखपत्र), रेशन कार्ड, आधार कार्ड, इलेक्शन वोटर्स कार्ड, ड्रायव्हिंग परवाना अशी अगदी मूलभूत ओळखपत्रे या योजनेचा लाभार्थी ठरविण्यास वैध मानतात. आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्याआठी ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. ऑफलाईन पद्धतीने योजनेचा लाभ घेण्यासाठी आपली नजीकच्या कॉमन सर्विस सेंटरची (CSC) मदत घेता येते. अगदी बेसिक डॉक्युमेंट्सच्या आधारे इच्छुक व्यक्ती योजनेचा लाभार्थी होऊ शकते. CSC कडूनच “आयुष्मान भारत - गोल्डन कार्ड” प्राप्त होते.
ग्रामीण भागात पक्के घर नसलेली कुटुंबे, वयस्क (16-59 वर्ष) नसणारी कुटुंबे, दिव्यांग (Handicapped) व्यक्ती असणारी कुटुंबे, केवळ महिला कुटुंब-प्रमुख असणे, अनुसूचित जाती/जमातीमधील व्यक्ती, भूमिहीन व्यक्ति/ वेठबिगार मजूर यांना या योजनेसाठी पात्र समजले जाते. यांव्यतिरिक्त आपल्या आजुबाजूला अनेक कचरा वेचणाऱ्या, घरकाम करणाऱ्या, शिवणकाम करणाऱ्या व रस्त्यावर काम करणाऱ्या अन्य व्यक्ती, छोटे दुकानदार, फेरी-वाले, प्लंबर, मिस्त्री, पेंटर, वेल्डर, सेक्युरिटी गार्डस, सफाई कर्मचारी, हँडीक्राफ्टचे काम करणाऱ्या व्यक्ती, टेलर, ड्रायव्हर, रिक्षा चालक, दुकानात काम करणारे लोक असतात. अशा व्यक्तींना देखील आयुष्मान भारत योजनेसाठी (ABY) पात्र ठरवण्यात आले आहे. कुटुंबाचं आकार, लिंग, वय, यांपलीकडे जाऊन सर्व पात्र (Eligible) व्यक्तींना ह्या योजनेचा लाभ घेता येतो.
कॅशलेस आणि पेपरलेस क्लेम सुविधेद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या या आरोग्य योजनेमध्ये सुमारे 1949 प्रक्रिया आणि पॅकेजेस समाविष्ट आहेत. ज्यामध्ये औषध-पुरवठा, चिकित्सा सेवा, डॉक्टरांची फी, हॉस्पिटल्सची रूम फी, ऑपरेशन थिएटर आणि अगदी ICU ची फी इत्यादी सुविधा विनामूल्य स्वरूपात मिळतात. याव्यतिरिक्त कोरोनरी बायपास सर्जरी, गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया आणि स्टेंटिंग यांसारखे प्रमुख उपचार 15 ते 20 टक्के स्वस्त दरात प्रदान केले जातात. शासनाने सूचिबद्ध केलेल्या सरकारी आणि गैरसरकारी हॉस्पिटल्समध्ये लाभार्थ्यांना कॅशलेस स्वरूपाचे उपचार घेता येतात. ज्या मध्ये हॉस्पिटलमध्ये उपचारांकरिता दाखल होण्यापूर्वी 3 दिवस आणि उपचारांनंतर 15 दिवसांची क्लिनिकल ट्रीटमेंट आणि औषधोपचार अंतर्भूत होतात. याचसोबत प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असणारा एक “आयुष्मान मित्र” तसेच “हेल्प डेस्क” लाभार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी सज्ज असतात.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या संकेतस्थळाला भेट देऊन आपण या योजनेबाबत अधिक माहिती तपशिलवार जाणून घेऊ शकतो. आता तर अगदी “Paytm App” वर देखील आपल्याला या योजनेचे फीचर्स पहाणे शक्य होत आहे. आपल्याला किंवा आपल्या नातेवाईकांना जरी या योजनेचा लाभ घेण्याची आवश्यकता नसेल, तरी देखील समाजात आपल्या आजुबाजूला वावरणाऱ्या कष्टकरी महिला, हातावर पोट असणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा आपण लाभ मिळवून देऊ शकतो. लाभार्थी व्यक्ती 14555 / 1800 111 565 या टोल-फ्री संपर्क क्रमांकावर कॉल करून देखील या योजनेची माहिती मिळवू शकतात. केवळ “माहितीचा अभाव” हे आपल्या देशातील अनारोग्याचे आणि सामाजिक विषमतेचे कारण ठरले आहे.