लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा शेअर बाजारावर देखील मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे. एक्झिट पोलनंतर मार्केट उच्चांक पातळीवर पोहचले होते. मात्र, निकालामध्ये सत्ताधारी भाजप बहुमताचा आकडा पार करू शकत नसल्याचे समोर आल्यानंतर शेअर बाजारावर देखील याचा परिणाम पाहायला मिळाला. याआधीही लोकसभा निवडणुकांच्या निकालावेळी बाजारावर असाच परिणाम दिसून आला होता. शेअर बाजारामध्ये एवढी मोठी घसरण होण्यामागचे नक्की काय कारण आहे? याविषयी या लेखातून जाणून घेऊया.
लोकसभा निवडणुकीचा शेअर बाजारावर काय परिणाम झाला?
एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित एनडीएला बहुमत मिळत असल्याचे समोर आल्यानंतर शेअर मार्केट उच्चांक पातळीवर पोहचले होते. मात्र, निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपला एकहाती बहुमत मिळत नसल्याचे स्पष्ट आल्यानंतर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. मार्च 2020 नंतर म्हणजेच लॉकडाउननंतर बाजारात झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे.
सेन्सेक्स तब्बल 4389 अंक म्हणजेच 5.74 टक्क्यांनी घसरून 72079 अंकावर बंद झाला. तर प्रमुख कंपन्यांचा इंडेक्स असलेल्या निफ्टी 50 मध्ये 1389 अंकांची घसरण पाहायला मिळाली. बाजारातील या ऐतिहासिक घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 30 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. नव्याने बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का आहे.
या स्टॉक्सच्या किंमतीत झाली सर्वाधिक घसरण
स्टॉक्स | घसरण किती? |
अदानी पोर्ट्स | 21.40% |
अदानी एंटरप्राइजेस | 19.07% |
ओएनजीसी | 16.23% |
एनटीपीसी | 14.52% |
कोलइंडिया | 13.54% |
एसबीआय | 13.37% |
एलटी | 12.37% |
बीपीसीएल | 12.11% |
पॉवरग्रीड | 11.98% |
श्रीराम फायनान्स लिमिटेड | 9.13% |
आधीच्या निवडणूक निकालांचा बाजारावर कसा परिणाम झाला होता?
1999 पासून 2024 पर्यंतच्या लोकसभा निवडणुकांचा शेअर बाजारावरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळते. कारगिल युद्धानंतर झालेल्या 1999 च्या निवडणूक निकालाच्या दिवशी निफ्टी 1 टक्क्यांनी वाढला होता. तर 2004 लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशी निफ्टीमध्ये 0.37 टक्क्यांनी नोंद दर्शविण्यात आली होती.
2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावेळी बाजार बंद होता. मात्र, दुसऱ्या दिवशी बाजार उघडल्यानंतर निफ्टी 17.74 टक्क्यांनी वाढून उच्चांक पातळीवर पोहोचला होता. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस प्रणित आघाडी सरकार परत सत्तेत आल्याचा परिणाम बाजारावर पाहायला मिळाला होता.
2014 च्या लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी निफ्टीमध्ये 1.12 टक्क्यांनी वाढ झाली होती. तर 2019 च्या निकालाच्या दिवशी 0.7 टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली होती. तर 2024 च्या निकालाच्या दिवशी निफ्टीमध्ये तब्बल 6 टक्क्यांची ऐतिहासिक घसरण दिसून आली आहे.
शेअर बाजार धडाधड कोसळण्याचे कारण काय?
लोकसभा निवडणुकीच्या निकालांचा थेट शेअर बाजारावर परिणाम पाहायला मिळत आहे. सत्तेतील पक्षाला बहुमत मिळणार की नाही, यावर बाजारातील चढउतार अवलंबून असल्याचे दिसून आले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या देखील बाजारावर परिणाम दिसून आला.
भाजपला पूर्ण बहुमत मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्याने बाजारात पडझड पाहायला मिळाली. जवळपास सर्वच 19 सेक्टरमध्ये घसरण दिसून आली आहे. यामध्ये प्रामुख्याने पीएसयू, बँकिंग, ऑटो क्षेत्राचा समावेश आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यातच परदेशी गुंतवणुकदारांनी भारतीय बाजारात जवळपास 25 हजार कोटी रुपये काढून घेतले होते.
सत्तेत असलेल्या पक्षामुळे देशातील आर्थिक व व्यावसायिक धोरणे ठरत असतात. सरकार कायम राहिल्यास या धोरणांमध्ये फारसा बदल पाहायला मिळत नाही व गुंतवणूकदारांकडून याकडे सकारात्मकतेच्या दृष्टीने पाहिले जाते. परंतु, सरकार बदल असल्याचे दिसून आल्यास बाजारात अनिश्चितता पाहायला मिळते. परदेशी गुंतवणूकदारांकडूनही बाजारातून पैसा काढून घेतला जातो. याचा सर्वाधिक परिणाम सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर पाहायला मिळतो. निकालानंतरही बाजारातील पडझड पुढील काही दिवस अशीच राहण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मोठी गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगायला हवी.