सध्या क्रिकेटचा हंगाम सुरु आहे. आशिया चषक क्रिकेटचे सामाने क्रिकेटप्रेमी मन लावून बघत आहेत. आपापल्या आवडत्या खेळाडूची इनिंग बघणे हा अनेकांच्या आवडीचा विषय असतो. अशातच तुमचे आवडते खेळाडू क्रिकेटचे सामने खेळण्यासाठी किती मानधन घेतात याची तुम्हाला कल्पना आहे का? नसेल तर या लेखात जाणून घेऊयात एका क्रिकेट सामन्यातून खेळाडूला किती मानधन मिळते.
खेळाडूंचा BCCI शी करार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच The Board of Control for Cricket in India (BCCI) ही क्रिकेटचे नियोजन करणारी शिखर संस्था आहे. या संस्थेचे स्वतःचे एक बजेट असते. संस्थेच्या घटनेनुसार दरवर्षी काही खेळाडूंशी BCCI करार करते. त्याबदल्यात BCCI ने ठरवलेले सामने खेळाडूंना खेळायचे असतात. वेगवगेळ्या खेळाडूंना त्यांच्या क्षमतेनुसार आणि अनुभवानुसार वार्षिक मानधन दिले जाते. याशिवाय वेगवगेळ्या सामन्यांसाठी वेगवेगळे मानधन देण्याची तजवीज देखील BCCI ने केलेली आहे.
खेळाडूंच्या A+ , A, B आणि C अशा श्रेणी केलेल्या आहेत. यानुसार A+ श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रुपये, A श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 5 कोटी रुपये, B श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 3 कोटी रुपये आणि C श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 1 कोटी रुपयांचे मानधन दिले जाते. याशिवाय कसोटी, टी-20 आणि वन डे क्रिकेट सामन्यांसाठी स्वतंत्र मानधन दिले जाते.
एका सामन्यासाठी मानधन किती?
BCCI खेळाडूंना वेगवगेळ्या सामन्यांसाठी वेगवेगळे मानधन देते. वार्षिक मानधनाच्या व्यतिरिक्त ही रक्कम खेळाडूंना मिळते. BCCI च्या नियमानुसार कसोटी सामन्यांसाठी खेळाडूंना 15 लाख रुपये, वन डे सामन्यांसाठी 6 लाख रुपये तर टी-20 सामन्यांसाठी 3 लाख रुपये मानधन दिले जाते. सर्व श्रेणीतील खेळाडूंना ही रक्कम समान मिळते.
सामन्यात खेळणाऱ्यालाच मिळते मानधन
जेव्हा केव्हा कुठले सामने घोषित होतात तेव्हा त्यात खेळणाऱ्या खेळाडूंची यादी देखील जाहीर होते. यादीत नाव असलेल्या सर्वच खेळाडूंना त्या त्या सामन्यासाठीचे मानधन मिळते असे नाही. जर एखादा खेळाडू संपूर्ण सामन्यात खेळलाच नाही किंवा त्याला खेळण्याची संधी मिळालीच नाही तर त्या सामन्याचे पैसे खेळाडूला मिळत नाहीत. म्हणजेचे जे सामने खराब हवामानामुळे, पावसामुळे रद्द होतात त्यांचे मानधन खेळाडूंना दिले जात नाही. मात्र जिथे कुठे सामने असतील तिथे येण्याजाण्याचा, राहण्याचा, खाण्यापिण्याचा खर्च BCCI करत असते.