नुकतीच आयपीएलची लिलाव प्रक्रिया पार पडली. लिलावात संघांनी खेळाडूंना विक्रमी बोली लावत खरेदी केले आहे. कोलकाता नाइट राइडर्सने मिचेल स्टार्कला तब्बल 24.75 कोटी रुपये, तर सनराइजर्स हैदराबाद 20.50 कोटी रुपये खर्चून पॅट कमिन्सला खरेदी केले आहे. स्टार्क व कमिन्ससह इतर खेळाडूंसाठी देखील संघांनी कोट्यावधी रुपये खर्च केले.
मात्र, विक्रमी बोली लावत खेळाडूंना खरेदी करणाऱ्या या संघांकडे नेमका पैसा येतो कसा ? आयपीएलचे व या संघांचे बिझनेस मॉडेल नेमके काय आहे ? या प्रश्नांची उत्तरे या लेखातून जाणून घेऊया.
आयपीएलचे बिझनेस मॉडेल
आयपीएलमध्ये केवळ तिकिटांच्या विक्रीमधून पैसे येतो, असा विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. आयपीएल सारख्या क्रीडा स्पर्धेचे बिझनेस मॉडेल हे वेगवेगळ्या माध्यमातून कमाई करते. 2008 मध्ये आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात 8 संघांना खरेदी करण्यासाठी तब्बल 723.59 मिलियन डॉलर्स खर्च करण्यात आले होते. संघ खरेदी करण्यासाठी खर्च केलेली संपूर्ण रक्कम बीसीसीआयची असते.
सर्वाधिक कमाई ही प्रसारण हक्क ( Broadcasting Rights ) आणि प्रायोजकत्वाच्या ( Central Sponsorship Deals) माध्यमातून होते. यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची विभागणी ही बीसीसीआय आणि संघांमध्ये होत असते. यातील जवळपास 50 टक्के उत्पन्न बीसीसीआय, 45 टक्के उत्पन्न आयपीएलमधील संघांचे असते. तर उर्वरित रक्कम प्लेऑफमध्ये पोहचणाऱ्या संघांना दिली जाते. यानुसार दरवर्षी प्रत्येक संघाला जवळपास 500 ते 600 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते.
या माध्यमातून आयपीएल संघ करतात कमाई
ब्रँड स्पॉन्सरशिप | प्रसारण हक्क व आयपीएलच्या मुख्य प्राजोजकत्वा व्यतिरिक्त संघ वैयक्तीक ब्रँ प्राजोजकत्वाच्या माध्यातून देखील कमाई करतात. जसे की, यामध्ये शर्ट स्पॉन्सरशिप, रेडिओ आणि डिजिटल पार्टनर्ससह इतर गोष्टींचा समावेश असतो. मात्र, यातून होणारी कमाई ही जास्त नसते. एकूण कमाईच्या जवळपास 40 ते 50 टक्के कमाई ही प्रामुख्याने प्रसारण हक्क व आयपीएलच्या मुख्य प्राजोजकत्वाच्या माध्यमातून होते. |
बक्षिसाची रक्कम | 2008 पासून ते आतापर्यंत आयपीएल विजेत्या संघांच्या बक्षिसाच्या रक्कमेत देखील प्रचंड बदल पाहायला मिळाला आहे. 2008 साली विजेत्या संघाला 4.8 कोटी रुपये, तर उपविजेत्या संघाला 2.4 कोटी रुपये बक्षिस स्वरुपात मिळाले होते. 2023 साली आयपीएल विजेत्या संघाला तब्बल 20 कोटी रुपये मिळाले होते. याशिवाय, स्पर्धेतील उपविजेत्या व तिसऱ्या-चौथ्या स्थानावरील संघांना देखील कोट्यावधी रुपयांचे बक्षिस मिळाले होते. बक्षिसाच्या रक्कमेतून देखील आयपीएलमधील संघ कमाई करतात. |
तिकिटांची विक्री | आयपीएलमधील प्रत्येक संघांला घरच्या मैदानावर जवळपास 8 ते 10 सामने खेळावे लागतात. घरच्या मैदानावरील सामन्यादरम्यान होणाऱ्या तिकिटांच्या विक्रीमधील 80 टक्के रक्कम संघाला मिळते. तर उर्वरित उत्पन्नाची विभागणी बीसीसीआय व स्पॉन्सरमध्ये केली जाते. संघांच्या एकूण कमाईमध्ये तिकिटांच्या विक्रीचा वाटा हा जवळपास 10-15 टक्के असतो. |
मर्चंडाइज सेल्स | संघांसाठी कमाईचे आणखी एक माध्यम म्हणजे विविध वस्तूंची विक्री. जर्सी, टोपी व संघांशी संबंधित इतर विक्रीच्या माध्यमातून संघ कमाई करतात. मात्र, हे उत्पन्न फारच कमी असते. |
आयपीएलचे बाजारमुल्य
आयपीएल ही जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे. गेल्याकाही वर्षात आयपीएलचे बाजारमुल्य प्रचंड वाढले आहे. 2022 साली या स्पर्धेचे बाजारमुल्य हे 8.4 बिलियन डॉलर एवढे होते. 2023 मध्ये यात तब्बल 28 टक्क्यांनी वाढ होऊन बाजारमुल्य 10.7 बिलियन डॉलर्सवर पोहचले आहे. 2008 पासून बाजारमुल्यात तब्बल 433 टक्क्यांची विक्रमी वाढ झाली आहे. केवळ आयपीएल स्पर्धाच नाही तर संघांची ब्रँड वॅल्यू देखील कोट्यावधी रुपये आहे.