स्वत:चं घर विकत घेणं ही सर्वसामान्यांच्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे घर घेताना मनात उत्सुकता, भीती, टेन्शन अशा संमिश्र भावना असतात. कारण स्वत:चे घेणे यासारखा आनंद नाही. पण त्यासाठी पैसे कुठूनआणणार. म्हणजेच कर्ज मिळेल की नाही? किंवा डाऊन पेमेंटसाठी किती पैसे उभे करावे लागतील?, असे प्रश्न मनात घोळत असतात. पण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामध्ये पडल्याशिवाय याची उत्तरे मिळत नाहीत.
घर घेताना डाऊन पेमेंट का करावे लागते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण याचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी आपण डाऊन पेमेंट म्हणजे काय? हे अगोदर समजून घेऊ. डाऊन पेमेंट ही अशी एक रक्कम आहे; जी आपण खरेदी करण्यासाठी इच्छा दाखवलेल्या वस्तुची टोकन अमाउंट असते. त्या टोकन अमाउंटच्या विश्वासावर आणि आपल्या आर्थिक परिस्थितीवर आधारित उर्वरित रकमेसाठी बँक आपल्याला कर्ज देते. म्हणजेच ती वस्तू विकत घेताना आपली आर्थिक पत किती आहे, हे डाऊन पेमेंटमधून कळते.
त्यामुळे घर घेताना संबंधित व्यक्ती हे घर विकत घेऊ शकते का? त्याची आर्थिक स्थिती तेवढी मजबूत आहे का? तसेच त्याला बँकेतून किती कर्ज मिळू शकते. या गोष्टी डाऊन पेमेंटवर अवलंबून असतात. त्याचबरोबर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डाऊन पेमेंटमुळे विक्री करणारा आणि खरेदीदार यांच्यामध्ये विश्वासाचे नाते तयार होते.
घर खरेदी करताना डाऊन पेमेंटची रक्कम जास्त असेल तर तुमची कर्जाची रक्कम आपोआप कमी होते. कर्जाची रक्कम कमी झाल्यामुळे तुमचा ईएमआय आणि त्यावरील व्याजदरही कमी होतो. पण डाऊन पेमेंट कमी असेल तर कर्जाची रक्कम, व्याजदर आणि कर्जाचा कालावधी आपोआप वाढतो. त्यामुळे तुम्हाला दीर्घकाळासाठी होमलोनचा ईएमआय भरावा लागतो. परिणामी जेवढ्या रकमेचे कर्ज घेतलेले असते. तेवढीच रक्कम व्याजाच्या रुपात बँकेकडून वसूल केली जाते.
सध्या मार्केटमध्ये जिथे-जिथे डाऊन पेमेंटचा पर्याय उपलब्ध आहे. तिथे किमान 20 ते 30 टक्के रक्कम भरून उर्वरित पैसे कर्जाच्या रुपाने घेता येतात किंवा ती रक्कम ईएमआयने भरता येते. घर किंवा गाडी घेताना बँकाही 100 टक्के कधीही कर्ज देत नाही. त्यासाठी आपल्याला किमान 20 ते 30 टक्के रक्कम डाऊन पेमेंट म्हणून भरावी लागते.