चीनमध्ये (China) नोव्हेंबर महिन्यात झिरो कोव्हिड धोरण (Zero-Covid Policy) हळू हळू शिथील व्हायला सुरुवात झाली. आणि तेव्हापासून तिथे कोव्हिड 19 (Covid 19) रुग्ण भराभर वाढायला लागले. यावेळी आलेली नवी लाट ओमिक्रॉन व्हेरियंटच्या (Omicron Variant) BF7 या सबव्हेरियंटमुळे आहे असं मानलं जातंय. म्हणता म्हणता चीन पाठोपाठ हाँग काँग (Hong Kong), दक्षिण कोरिया (South Korea), थायलंड (Thailand) आणि मलेशिया (Malaysia) या देशांमध्ये या सबव्हेरियंटचे रुग्ण वाढताना दिसले. त्यामुळे या देशातून आलेल्या प्रवाशांसाठी सगळ्याच देशात विमानतळांवर कडक पाहणी करण्यात येतेय.
चीनमधल्या या परिस्थितीचा जागतिक स्तरावर दुहेरी फटका बसतोय . एक चीनवर अजूनही आकडेवारी लपवल्याचा होत असलेला आरोप. त्यामुळे तिथल्या नेमक्या परिस्थितीचा अंदाज जगाला येत नाहीए. आणि दुसरं म्हणजे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होण्याबरोबरच जगातल्या पर्यटन उद्योगालाही पुन्हा फटका बसतोय. हे दोन्ही मुद्दे समजून घेऊया.
चीन कोरोनाचे आकडे लपवतोय?
जागतिक आरोग्य संघटनेनं तसा आरोप चीनवर केलाय. ‘आम्ही चीनकडे जलद, नियमित आणि विश्वसनीय डेटा मागत आहोत. तिथे किती लोकांना रुग्णालयात दाखल करावं लागलं, त्यांच्यामध्ये लक्षणं नेमकी काय होती आणि महत्त्वाचं म्हणजे कोरोना मृत्यू नेमके किती आहेत, हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण, असा डेटा चीनकडून नियमितपणे मिळत नाहीए,’ असं जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक डॉ. टेड्रोस अॅथनम घेब्रेयेसुस यांनी अलीकडे मीडियाशी बोलताना सांगितलं.
चीनची कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची व्याख्याही त्रोटक आहे. आणि तिथून विषाणीच्या सिक्वेन्सिंगची माहिती जगासमोर येत नाही, असंही आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे आरोग्य संघटनेच्या कोरोना बद्दलच्या अभ्यास आणि संशोधनालाही मर्यादा येत आहेत.
चीनमध्ये फक्त श्वासावरोधाने झालेल्या मृत्यूंची गणना कोव्हिड मृत्यू अशी करण्यात येते.
आणि चीनच्या अशा वागण्यामुळे जागतिक स्तरावर कोरोना संकट आटोक्यात आणण्यात अडथळे येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.
चीनमधल्या उद्रेकाचा जागतिक पर्यटनावर ‘असा’ परिणाम
2020 मध्ये कोरोना संकट खऱ्या अर्थाने जगभर पसरलं. आणि त्यानंतर अख्खं जगच लॉकडाऊनमध्ये गेलं. 2022 मध्ये हळू हळू आंतरराष्ट्रीय सीमा उघडतायत. पण, कोव्हिड पूर्व काळा इतकी हालचाल अजून सुरू झालेली नाही. खासकरून पर्यंटन क्षेत्र अजून पूर्ववत झालेलं नाही. आणि तेवढ्यात चीनमधल्या नव्या लाटेचा फटका क्षेत्राला बसणार आहे.
जगाचे व्यवहार सुरळीत सुरू असताना 2019 साली चीनमधल्या 15.50 कोटी लोकांनी 250 अब्ज अमेरिकन डॉलर चीन बाहेर परदेशात खर्च केले. म्हणजे काम किंवा नुसत्या पर्यटनाच्या बहाण्याने 15 कोटींच्या वर लोक जगभर हिंडले. आणि त्यातून जगाला 250 अब्ज अमेरिकन डॉलर इतका महसूल मिळाला.
चीनमध्ये झिरो कोव्हिड धोरण सुरू झालं. आणि जगासाठीच हा ओघ थांबला. आता नवीन लाटेत चीनमधून आलेल्या लोकांवर जगभरात निर्बंध आणि कडक चाचण्यांचा जाच आहे. त्यामुळे चीनमधून परदेशात होणाऱ्या पर्यटनाला चांगलाच फटका बसला आहे, बसणार आहे.
2023 मध्ये चीनमधून येणाऱ्या पर्यटकांबद्दल अनेक देशांना उत्सुकता होती. पण, आता परिस्थिती बदलणार आहे.