आपली जुनी पिढी ही बचतीला अधिक प्राधान्य देणारी होती. गाठीला पैसा साठवून, रोजच्या जगण्यात तडजोडी करुन पैशांची बचत करायची आणि पुरेसा पैसा साठला की त्यातून वस्तूंची खरेदी करायची, हा त्या पिढीचा शिरस्ता होता. शक्यतो कर्ज घेण्यापासून लांब राहावे, ही त्या पिढीची शिकवण होती. परंतु जसजसा काळ बदलत गेला, आर्थिक समीकरणे बदलत गेली आणि एकंदरीतच जीवनशैली बदलत गेली तसतशी ही शिकवण मागे पडली. उद्याची तरतूद दुय्यम स्थानावर जात आजचे जगणे सुखकर, सुखनैव आणि कमी कष्टदायक असावे अशी नव्या पिढीची धारणा बनली. जोडीला बाजारव्यवस्थेतील बदल हे खर्च वाढवणारे होतेच ! प्रतिष्ठेसाठीच्या कल्पनाही बदलत जात होत्या. या सर्वांतून पूर्वी अत्यंत निकडीसाठी कर्ज घेतले जायचे त्याऐवजी कर्ज घेणे ही बाब अगदी सामान्य बनली. बँका आणि वित्तीय कंपन्यांनी अशा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सुलभ कर्जासाठीच्या विविध योजना आणून त्यामध्ये मोठी भर घातली. परिणामी आज पर्सनल लोन किंवा वैयक्तिक कर्ज हे काही तासांत मंजूर होण्यापर्यंत आपण येऊन ठेपलो.
सध्याची पिढी कर्ज घेण्यावरून थोडीही बिचकत नाही. कर्ज घेणे हा त्यांच्या सवयीचा भाग झाला आहे. क्रेडिट ब्यूरो क्रिफच्या मते, 2021 मध्ये 48 टक्के पर्सनल लोक हे 26 ते 36 वयोगटातील युवकांनी घेतले होते. त्याचवेळी कर्ज घेणार्या 13 टक्के मुलांचे वय हे 25 पेक्षा कमी होते.
वास्तविक, बँक किंवा वित्तिय कंपन्यांकडून सहजपणे वैयक्तिक कर्ज जरी मिळत असले तरी ते फेडायचे आहे, हे लक्षात ठेवा. कर्ज फेडण्यासाठी आपले उत्पन्न देखील त्या अनुरुप असायला हवे किंवा उत्पन्न वाढवायला हवे.
वैयक्तिक कर्ज घेणे हा आपला शेवटचा मार्ग असायला हवा
- कर्जाचे चक्रव्यूह हे अशा प्रकारचे असते की त्यातून बाहेर येण्यास ग्राहकांना बराच काळ लागतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला कर्ज फेडणे अतिशय कठिण जाते, म्हणजेच एखाद्याला कर्जाची मूळ रक्कम चुकवणे अवघड जावू लागते, तेव्हा तो केवळ व्याजच भरत असतो.
- साधारणपणे आवश्यक कोणतेही महत्त्वाचे काम करताना आपण पर्सनल कर्जाचा विचार करतो. मात्र पर्सनल लोन हे सर्वात महाग असते. त्यावरील व्याज दर हे अगदी 15 ते 20 टक्क्यांपर्यंत असतात. त्यामुळे वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी अन्य पर्यांंयांचा विचार करावा. यासाठी मालमत्तेवरचे कर्ज, टॉपअप होम लोन, गोल्ड लोन आदी मार्ग उपलब्ध आहेत. त्यांच्या मदतीने आपण चांगली बचत करू शकतो.
- पर्सनल लोन हे मिळण्यास सुलभ जरी असले तरी त्याचा महिन्याचा एखादा हप्ता भरण्यास उशिर झाला तर त्यावर भरभक्कम दंड आकारला जातो. अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे आपल्या खात्यातून कर्जाचा हप्ता जाऊ शकला नाही तरीही ते कारण कर्ज देणार्या कंपन्या ग्राह्य मानत नाहीत. त्यासाठीचा दंड भरावाच लागतो.
- वैयक्तिक कर्जाचा हप्ता अधिक असल्यामुळे आपले महिन्याचे अर्थकारण कोलमडू शकते.
- या कर्जासाठी तारण किंवा जामीनदार यांची तरतूद करावी लागते. तारण देण्यात येणारी मालमत्ता ही आपलीच असते; पण जामिनदारांसाठी आपल्याला विनवण्या कराव्या लागतात. तसेच काही कारणाने जर हप्ते थकले तर जामिनदारही अडचणीत येऊ शकतात आणि त्यामुळे आपले त्यांच्याशी असणारे संबंधही कायमचे बिघडू शकतात.
सारांश, आपल्या गरजांना मुरड घालणे शक्य असेल, कर्जासाठीचे अन्य पर्याय वापरणे शक्य असेल तर शक्यतो पर्सनल लोनचा विचार टाळणेच योग्य !