Home Prices: कोरोनानंतर रिअल इस्टेट क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आले असून घरांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील प्रमुख 13 शहरांमध्ये घरांच्या किंमती सरासरी 14.7 टक्क्यांनी वाढल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागील दोन पतधोरण बैठकीत व्याजदरवाढ रोखून धरल्यानेही सदनिकांची मागणी वाढली आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरु, पुण्यासह 13 शहरांमध्ये घरांच्या किंमती जून तिमाहीत वाढल्या आहेत.
मॅजिकब्रिक्स या कंपनीने PropIndex असा अहवाल जारी केला आहे. देशातील प्रमुख 13 शहरांमध्ये घरांची मागणी वार्षिक 7.8 टक्क्यांनी तर तिमाहीत 10.4 टक्क्यांनी वाढली आहे. दरम्यान मागणीनुसार सदनिकांचा पुरवठा होत नसल्याने दरवाढ दिसून येत आहे. मागणी जास्त असल्याने कच्च्या मालाच्या पुरवठ्यावरही ताण येत आहे. त्यातून सर्वच प्रमुख शहरांत दरवाढ दिसून येत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
पुण्यातील रिअल इस्टेट क्षेत्राची स्थिती
पुण्यातील सदनिकांची मागणी जून तिमाहीत 8.7 टक्क्यांनी वाढली. घरांच्या किंमतीही वाढत आहेत. मात्र, नव्या सदनिकांचा पुरवठा 11.3% नी रोडावला आहे. त्यामुळे येत्या काळात पुण्यातील सदनिकांच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. विकासकांकडून मागणी वाढल्याने नव्या प्रकल्पांची घोषणा करण्यात येत आहे. पुणे शहराच्या चहूबाजुंनी नवे प्रकल्प उभे राहत आहेत.
मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्राची स्थिती
जून तिमाहीत मुंबईतील सदनिकांची मागणी 2.8% वाढली. तर नव्या घरांचा पुरवठा 4.3 टक्क्यांनी कमी झाला. घरांच्या किंमती मागील तिमाहीशी तुलना करता 2.1 टक्क्यांनी वाढल्या. मुंबईत मागील काही महिन्यांपासून मेट्रो लाइन 2A आणि 7 चे काम सुरू झाले आहे. तसेच जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती पाडून नव्याने बांधकाम करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात सदनिकांचा पुरवठा शहरात वाढू शकतो, असे अहवालात म्हटले आहे.
किंमत वाढीने इएमआय सुद्धा वाढणार
भारतामध्ये पुढील काही महिन्यांमध्ये सदनिकांची मागणी वाढतच राहील. मात्र, किंमत वाढीमुळे ग्राहकांच्या अपेक्षा आणि विक्री किंमतीत तफावत दिसून येईल. घरांच्या किंमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जाऊ शकतात. नागरिकांचा इएमआय येत्या काळात आणखी वाढू शकतो. तसेच आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यास घर खरेदी सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जाऊ शकते.