आरोग्य विमा ज्याप्रमाणे आजारी पडल्यानंतर कामी येतो. त्या प्रमाणेच गृहविमा देखील काढता येतो. गृह विमा काढल्यानंतर घराची झालेल्या नुकसानीपासून तुम्हाला संरक्षण मिळते. याद्वारे तुमच्या मालमत्तेला सुरक्षा मिळते. गृहविमा हा जनरल इन्शुरन्सच्या अनेक प्रकारांपैकी एक आहे. वैयक्तिक घर, बंगलो, फ्लॅट, अपार्टमेंट यांचा तुम्ही विमा काढू शकता. नैसर्गिक आपत्ती, किंवा मनुष्य निर्मिती कोणत्याही आपत्तीत जर तुमच्या मालमत्तेचे नुकसान झाले तर विमा कंपनी तुमचे नुकसान भरून देईल.
गृह विम्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असतो?
वादळ, गारपीट, वीज कोसळणे, पूर, भुकंप या सारख्या नैसर्गिक आपत्तींचा यात समावेश असू शकतो. (अॅक्ट ऑफ गॉड नुसार काही नैसर्गिक आपत्तीमुळे होणार
नुकसानीपासून संरक्षण नसते. मात्र, अतिरिक्त प्रिमियम भरल्यास त्यापासून संरक्षण मिळू शकते.)
मानवनिर्मित आपत्ती जसे की, दंगल, आग, चोरी, तोडफोड, सामाजिक अशांततेच्या काळात घराचे झालेले नुकसान.
रेल्वे किंवा रस्त्याच्या बांधकामामुळे झालेले घराचे नुकसान.
स्फोटामुळे झालेले घराचे नुकसान यामध्ये संरक्षित असू शकते.
घराच्या बाहेर असलेल्या वस्तू, जसे की फर्निचर आणि इतर मालमत्ता, घरातील वस्तूंचाही विम्यात समावेश होऊ शकतो.
गृहविमा एकंदर चार प्रकारच्या नुकसानीपासून संरक्षण देतो.
घराच्या आतील बांधकामाचे नुकसान
बाह्य बांधकामाचे नुकसान
घरातील वस्तू आणि इतर सामानाचे नुकसान
आपत्तीच्या वेळी घरामध्ये असताना झालेली वैयक्तिक दुखापत
प्रत्येक गृहविमा पॉलिसीचे नियम आणि अटी वेगवेगळे असू शकतात. त्यानुसार मिळणाऱ्या संरक्षणामध्ये बदल होऊ शकतो. तसेच तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहता की स्वत:च्या घरामध्ये राहता. सोबतच भौगोलिक परिस्थिती, घराची वास्तू कोणत्या प्रकारची आहे, घराची किंमत, घरातील वस्तूंची किंमत यावरुनही तुम्हाला कशा प्रकारचे संरक्षण विम्यात देण्यात आले आहे. हे ठरू शकते. गृहविमा काढताना काही ठराविक वस्तू किंवा बाबींना सरंक्षण देण्यास विमा कंपनी नकार देऊ शकते. त्यामुळे घराचा विमा काढताना कोणत्या बाबी समाविष्ट आहेत आणि कोणत्या बाबी नाहीत याची सविस्तर माहिती घेतल्याशिवाय विम्याचे संरक्षण घेऊ नका.
विम्यामध्ये समावेश नसलेल्या बाबी कोणत्या?
वरती नमुद केल्याप्रमाणे नैसर्गिक आपत्तीला 'अॅक्ट ऑफ गॉड' असे म्हटले जाते. विमा कंपन्या भूकंप, पूर, सुनामी यासारख्या आपत्तीचा विमा संरक्षणात सहसा समावेश करत नाहीत. म्हणजेच अशा आपत्तीत झालेले घराचे नुकसान तुम्हाला मिळणार नाही. या सोबतच जर तुमच्या निष्काळजीपणामुळे घराचे नुकसान झाले असेल तर त्यापासून संरक्षण मिळत नाही. घराची व्यवस्थित देखभाल न केल्यामुळे जर काही नुकसान झाले असेल तर हे नुकसानही विम्यात कव्हर नसते.