Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hindenburg Report on Adani : LIC चं दोन दिवसांत 18,000 कोटी रुपयांचं नुकसान

LIC India

Image Source : www.telegraphindia.com

Hindenburg Report on Adani : हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालामुळे अदानी समुहाचं नुकसान झालं. त्या खालोखाल नुकसान झालंय ते LIC चं. दोन दिवसांत LIC ने 18,000 कोटी रुपये गमावलेत. ही पडझड कधी थांबणार बघूया…

हिंडेनबर्ग संस्थेचा (Hindenburg Research) अदानी समुहावरचा (Adani Group) अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर शेअर बाजारावर त्याचे दूरगामी परिणाम जाणवतायत. अदानी समुहाच्या शेअरमध्ये शुक्रवारी 20% घसरण दिसून आली. गौतम अदानी (Gautam Adani) यांनी श्रीमंतांच्या यादीतलं तिसरं स्थान गमावलं. आणि अदानी समुहाच्या एकूण शेअर मूल्यामध्ये 50,000 कोटींच्या वर घट झाली.    

अदानी समुहाचं झालं तसंच नुकसान या शेअरमध्ये सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या LIC कंपनीचं झालं. LIC ही देशातली सगळ्यात मोठी संस्थात्मक गुंतवणूक संस्था आहे. विमा योजना तसंच म्यच्युअल फंड योजनांच्या माध्यमातून कंपनी शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करत असते. त्यांची अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक होती. पण, 24 जानेवारीला हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर कंपनीचं अदानी समुहातल्या शेअरचं मूल्य 18,647 कोटी रुपयांनी खाली आलं आहे.    

24 जानेवारीला हे मूल्य 81,268 कोटी रुपये इतकं होतं. ते 27 जानेवारीला 62,621 कोटी रुपयांवर येऊन पोहोचलं. एस इक्विटी या कंपनीने दिलेल्या डेटानुसार, LIC कडे अदानी एंटरप्रायजेस कंपनीची 1% भागिदारी होती. त्याशिवाय अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट आणि अदानी टोटल गॅस या कंपन्यांमध्ये LIC ची गुंतवणूक होती. या सगळ्या शेअरमध्ये 20% वर घसरण झाली आहे.    

LIC शेअरचंही झालं नुकसान   

LIC कंपनीचा IPO गेल्याचवर्षी एप्रिल महिन्यात बाजारात आला होता. तेव्हापासून नोंदणीपेक्षा हा शेअर खालीच आला आहे. आता अदानी समुहाच्या ताज्या बातमीनंतर LIC च्या शेअरलाही फटका बसला. शुक्रवारी 27 जानेवारीला हा शेअर 667 रुपयांवर बंद झाला. त्यात सव्वा तीन टक्क्यांची घसरण झाली.   

lic.png
Source : Google

अदानी टोटल गॅस कंपनीतला LIC ची गुंतवणूक 6,237 कोटी रुपयांवर आली. अदानी पोर्ट्समधली 3,205 कोटी रुपये तर अंबुजा सिमेंटमधली गुंतवणूक 1,474 कोटी रुपयांवर खाली आली. हे शुक्रवारी बाजार संपल्यानंतरचं मूल्यांकन आहे. विशेष म्हणजे LIC म्युच्युअल फंडाची अदानी समुहाच्या सर्वच नोंदणीकृत कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे.    

जाणकारांनीही नवीन कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी ताजी परिस्थिती आणि बातम्यांचा आढावा घेण्याचा सल्ला दिला आहे. हिंडेनबर्ग अहवालाचे पडसाद आणखी काही दिवस राहणार असल्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.    

(Disclaimer : शेअर बाजारातली गुंतवणूक जोखीमपूर्ण असते. नीट अभ्यास केल्याशिवाय आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय यात गुंतवणूक करू नये. महामनी डॉट कॉम शेअरविषयी सल्ला देत नाही.)