Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Adani Enterprises FPO : Hindenburg अहवालानंतर FPO ला थंड प्रतिसाद 

Adani Enterprises FPO

Image Source : www.swarajyamag.com

Adani Enterprises FPO : Hindenburg Report चा परिणाम या FPO वर दिसून येत आहे. फॉलो ऑन ऑफरच्या पहिल्याच दिवशी फक्त 1% गुंतवणूक पहायला मिळाली. तर किरकोळ गुंतवणूदारांच्या श्रेणीतही 2% इतकाच प्रतिसाद मिळाला

अदानी उद्योग समुहाची (Adani Group) फॉलो ऑन ऑफर अर्थात FPO ला पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा खूपच थंड प्रतिसाद मिळालाय. या ऑफरमधून कंपनीने 4.55 कोटी शेअर विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. पण, यातल्या फक्त 4.7 लाख शेअरसाठीच नोंदणी झाली. ही नोंदणी एकूण शेअरच्या 1% इतकी आहे. 
किरकोळ गुंतवणूकदार, अदानी समुहातले कर्मचारी, शेअर बाजारातले बडे गुंतवणूकदार अशा सगळ्यांनी FPO साठी बिडिंग सुरू केलं आहे. 
आणि यात किरकोळ गुंतवणूकदारांनी त्यांच्यासाठी असलेल्या कोट्यातल्या 2% शेअरसाठी नोंदणी केली आहे. तर समुहातल्या कर्मचाऱ्यांनी 4% समभाग खरेदीसाठी इच्छा दर्शवली आहे. बाकी प्रतिसाद थंडाच पाहायला मिळाला. अदानी एंटरप्रायजेसचा शेअरही 27 जानेवारीला 15% घसरणीसह 2,882 रुपयांवर बंद झाला.

adani-share-price-2.png
Source - Google

हिंडेनबर्ग अहवालाचा विपरित परिणाम?

याच आठवड्यात हिंडेनबर्ग या अमेरिकेतल्या संशोधन संस्थेनं अदानी समुहाच्या ऑडिटविषयी एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला. यात समुहाचे शेअर कृत्रिमरित्या वाढवले जात असल्याचा तसंच कंपनीच्या अकाऊंटिंगमध्ये घोटाळा असल्याचा ठपका अदानी समुहावर ठेवण्यात आला. ही बातमी FPO सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आली. अदानी समुहाने हिंडेनबर्ग अहवालातले आरोप फेटाळले असले तरी त्याचा विपरित परिणाम अदानी समुहाच्या शेअरवर तसंच एकूणच भारतीय शेअर बाजारांवर झाला. 

सेन्सेक्स निर्देशांकात 27 जानेवारी रोजी 1000 हून जास्त अंकांची घसरण झाली. तर अदानी समुहाचं मागच्या दोन दिवसांमध्ये 20,000 कोटींच्या वर नुकसान झालं आहे. स्वत: अदानी जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत सातव्या स्थानावर फेकले गेले आहेत. पण, तज्ज्ञांना हिंडेनबर्ग अहवाल आणि अदानी FPO यांचा थेट संबंध तितकासा जाणवत नाही. 
‘अदानी समुहासाठी कालचा दिवस चांगला नव्हताच. पण, त्याचवेळी एकूणच शेअर बाजारात मागचा अख्खा आठवडा चांगला नव्हता. जागतिक स्तरावरही घसरण होतेय. त्यामुळे FPO ची सुरुवात धिमी झाली असावी. आणि महत्त्वाचं म्हणजे अँकर गुंतवणूकदार आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी पूर्वीच या FPO मध्ये 500 कोटींच्या वर गुंतवणूक केली आहे,’ असं शेअर बाजार विश्लेषक अमित बगाडे यांनी महामनीशी बोलताना सांगितलं.  

कुणी गुंतवले FPO मध्ये पैसे?

हा FPO किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यापूर्वी बुधवारी (25 जानेवारी) अदानी समुहाने 5,985 कोटी रुपये अँकर गुंतवणूकदारांकडून जमा केले आहेत. हे गुंतवणूकदार आहेत अबुधाबी मधली एक गुंतवणूक कंपनी, गोल्डमन सॅच, बीएनपी परिबास तसंच मॉर्गन स्टॅनले, नोमुरा सिंगापूर. 
देशी गुंतवणूकदारांमध्ये LIC म्युच्युअल फंड, HDFC लाईफ इन्श्युरन्स, स्टेट बँक लाईफ इन्श्युरन्स, स्टेट बँक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अशा संस्थांनी एकगठ्ठा गुंतवणूक केली आहे. 
सामान्य गुंतवणूकदारांनी मात्र निदान पहिल्या दिवशी या FPO कडे पाठ फिरवली. 
हा FPO 31 जानेवारीपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला आहे. यातून मिळणारा पैसा अदानी समुह ग्रिन हायड्रोजन प्रकल्प, विमानतळांची सुरू असलेली कामं तसंच हरितमार्ग प्रकल्पासाठी वापरणार आहे.