Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EMI Smart Tips: कमी हप्त्याच्या नादात व्याजाचा भुर्दंड! 'लो ईएमआय' निवडण्यापूर्वी हे गणित नक्की समजून घ्या

EMI Smart Tips

EMI Smart Tips: स्मार्टफोन किंवा घरासाठी कमी हप्त्याचा (Low EMI) पर्याय निवडणे सुखकर वाटत असले तरी, दीर्घकाळात ते खिशाला कात्री लावू शकते. मुदत वाढल्याने व्याजाची रक्कम दुप्पट कशी होते, हे सविस्तर उदाहरणासह जाणून घ्या.

नवीन स्मार्टफोन, लॅपटॉप, एसी किंवा फर्निचर खरेदी करताना 'लो-कॉस्ट ईएमआय' हा पर्याय सध्या खूप लोकप्रिय होत आहे. दरमहा कमी रक्कम भरावी लागते म्हणून अनेकजण दीर्घ मुदतीचे कर्ज निवडतात. मात्र, हा छोटा हप्ता तुमच्या खिशाला मोठी कात्री लावू शकतो, हे अनेकांच्या लक्षात येत नाही.

ईएमआय आणि मुदतीचे गणित

कर्जाचा हप्ता जेवढा लहान असेल, तेवढा कर्जाचा कालावधी वाढत जातो. कालावधी वाढला की व्याजाचा बोजाही प्रचंड वाढतो. एका सोप्या उदाहरणावरून हे समजून घेऊया:

समजा, तुम्ही 10 लाख रुपयांचे कर्ज 10 टक्के व्याजाने घेतले आहे:

पर्याय 1 (जास्त हप्ता, कमी मुदत): जर तुम्ही 5 वर्षांसाठी कर्ज घेतले, तर तुमचा हप्ता सुमारे 21,247 रुपये असेल. ५ वर्षांनंतर तुम्ही एकूण 12.75 लाख रुपये भरलेले असतील, ज्यात व्याजाचा हिस्सा 2.75 लाख रुपये असेल.

पर्याय 2 (कमी हप्ता, जास्त मुदत): जर तुम्ही हेच कर्ज 10 वर्षांसाठी घेतले, तर हप्ता 13,215 रुपयांपर्यंत खाली येईल. मात्र, १० वर्षांनंतर तुम्ही एकूण 15.86 लाख रुपये भरलेले असतील. यात व्याजाची रक्कम 5.86 लाख रुपये होईल.

निष्कर्ष: हप्ता फक्त 8,000 रुपयांनी कमी केल्यामुळे तुम्हाला व्याजापोटी दुप्पट रक्कम मोजली लागते.

असे का घडते?

कर्जाचे व्याज हे नेहमी शिल्लक राहिलेल्या मुद्दलावर (Principal) मोजले जाते. जेव्हा तुम्ही कर्जाचा कालावधी वाढवता, तेव्हा:

  • मूळ रक्कम अतिशय संथ गतीने कमी होते.
  • बँक तुमच्याकडून अधिक काळासाठी व्याज वसूल करते.
  • अखेरीस, तुम्ही वस्तूच्या मूळ किमतीपेक्षा खूप जास्त पैसे मोजता.

गृहकर्जाच्या बाबतीत मोठा फटका

गृहकर्ज हे साधारणपणे 15 ते 25 वर्षांसाठी असते. अशा वेळी थोडासा हप्ता कमी केल्याने व्याजाचा आकडा कोटींच्या घरात जाऊ शकतो.

उदाहरण: 50 लाख रुपयांचे गृहकर्ज (8.5% व्याज) जर 25 वर्षांसाठी घेतले, तर व्याजापोटी सुमारे 70 लाख रुपये भरावे लागतात. तेच कर्ज 15 वर्षांसाठी घेतल्यास व्याजाची रक्कम 38 लाखांपर्यंत मर्यादित राहते.

दीर्घकालीन कर्ज कधी निवडावे?

कमी हप्त्याचा पर्याय पूर्णपणे चुकीचा नाही. जर एखाद्याला रोख रकमेची चणचण असेल तर हे फायदेशीर ठरू शकते. तसेच, हप्त्यातून वाचलेले पैसे जर तुम्ही शेअर्स किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवून कर्जाच्या व्याजापेक्षा जास्त नफा मिळवणार असाल, तरच हा निर्णय योग्य ठरतो.

 थोडक्यात सांगायचे तर कर्जाच्या जाळ्यात जितका कमी वेळ राहाल, तितका तुमचा फायदा होईल. कमी की जास्त ईएमआय यापेक्षा 'लवकरात लवकर कर्जमुक्ती' हे तुमचे उद्दिष्ट असायला हवे.