Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hero MotorCorp EV : हिरो वाढवणार इलेक्ट्रिक टू-व्हीलरची रेंज, परवडणारी उत्पादनं लॉन्च होणार?

Hero MotorCorp EV : हिरो वाढवणार इलेक्ट्रिक टू-व्हीलरची रेंज, परवडणारी उत्पादनं लॉन्च होणार?

Image Source : www.rushlane.com

Hero MotorCorp EV : हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) लवकरच त्यांची इलेक्ट्रिक टू-व्हीलरची रेंज वाढवणार आहे. एवढंच नाही, तर कंपनी सध्याच्या विक्रीच्या पायाभूत सुविधांमध्येदेखील सुधारणा करणार आहे. भविष्यातला इलेक्ट्रिक टू व्हीलरमधला एक मजबूत खेळाडू म्हणून कंपनीचा प्रयत्न सुरू झालाय.

हिरो मोटोकॉर्प ही देशातली एक अग्रगण्य दुचाकी निर्माता कंपनी (Two wheeler manufacturer company)आहे. कंपनीचे सीईओ म्हणून नुकतेच नियुक्त झालेले निरंजन गुप्ता यांनी कंपनीच्या 3 नव्या योजना सांगितल्या आहेत. कंपनी इलेक्ट्रिक वाहन प्रकारामध्ये लक्ष केंद्रित करणार असल्याचं ते म्हणाले. कंपनीकडे सध्या 3 नव्या योजना आहेत. यातली पहिली योजना प्रीमियम सेगमेंटमध्ये (Premium segment) विस्तार वाढवणं, प्रवासी सेगमेंटमध्ये विस्तार करणं आणि महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये आपली लीडरशीप निर्माण करणं, अशी माहिती गुप्ता यांनी दिलीय.

वेगावर भर

या तिन्ही योजना पूर्ण करण्यासाठी स्पीडवर भर दिला जाणार आहे. पूर्वी निरंजन गुप्ता यांच्याकडे सीएफओ म्हणजेच मुख्य वित्त अधिकारी म्हणून जबाबदारी होती. कंपनी इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्पेसमध्ये नवीन एंट्री-लेव्हल मॉडेल लॉन्च करण्याच्या सध्या तयारीत आहे. जास्तीत जास्त ग्राहकांना आपल्या ब्रँडकडे आकर्षित करण्यासाठी एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक स्कूटर्स सादर करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

अधिक उत्पादन श्रेणीवर कंपनीचे लक्ष आहे

मार्चच्या अखेरीपूर्वी आम्ही 100 शहरांमध्ये विस्तार करणार आहोत आणि त्यानंतर कंपनी पुढच्या तिमाहीत आपला विस्तार अधिक जोमानं वाढवेल. Vida V1 श्रेणीसह कंपनी सध्या टॉप एंड स्थानावर आहे. ब्रँड सादर केल्यानंतर, आता उत्पादन श्रेणी (Product range) स्थापित करणं अत्यावश्यक आहे, असं त्यांचं मत आहे.

फेम 2 आणि पुढची रणनीती

इलेक्ट्रिक वाहन (EV) स्टार्टअप्सची संख्या सध्या खूप जास्त असल्याचं दिसतं. म्हणजेच एकप्रकारची बाजारपेठेत गर्दीच झाल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यात फेम 2 (FAME 2) सबसिडी कमी केल्यानंतर या विभागात थोडंसं एकत्रीकरण (Consolidation) पाहिलं जाण्याची शक्यता आहे. ते पुढं म्हणाले, की समजा याचं प्रमाण वाढत गेलं, तर सहाजिकच बाजारात सध्या अस्तित्वात असलेले स्टार्टअप्स कमी होतील. आम्ही यावर लक्ष केंद्रित करत आहोत. जेव्हा अशी परिस्थिती येईल, तेव्हा आमचा ब्रँड अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल, असा आम्हाला विश्वास वाटत असल्याचं ते म्हणाले.

प्रिमियम सेगमेंटमध्ये प्रॉडक्ट रेंज सादर करण्यावर भर

संभाव्य एकत्रीकरणाच्या दरम्यान कंपनीला अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. कंपनी आपल्या विविध टाय-अप आणि प्रॉडक्ट रेंजवर अधिक लक्ष केंद्रित करेल. इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्पेसमध्ये लीडरशीप टार्गेट करण्याशिवाय कंपनीचं आणखी एक ध्येय असणार आहे, ते म्हणजे कंपनी प्रीमियम सेगमेंटमध्ये (160-450 CC) प्रॉडक्ट रेंज लॉन्च करण्याचा प्लान असल्याचं त्यांनी म्हटलंय.

गुंतवणूक वाढवण्यासंदर्भात आधीच घोषणा

हिरो मोटोकॉर्पनं इलेक्ट्रिक वाहन प्रकारात आधीच आपली विस्तार योजना जाहीर केलीय. सध्याचा या वाहनांना मिळणारा प्रतिसाद पाहता ही गुंतवणूक करण्याचं कंपनीनं ठरवलंय. जवळपास 1500 कोटींची गुंतवणूक करण्याचं कंपनीचं नियोजन असणार आहे. जीईएफ कॅपिचल पार्टनर्सकडून कंपनी हा निधी उभारणार असल्याचं कंपनीनं आधीच सांगितलंय. 

जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्राधान्य

जागतिक स्तरावर पर्यावरणाला निर्माण होणार धोका लक्षात घेता विविध देशांत इलेक्ट्रिक मोबिलिटीचा पर्याय वापरण्यावर भर देण्यात येतोय. त्यामुळे कंपनी यावर काम करत आहे. भारतासह थायलंडमध्येही इलेक्ट्रिक बाइक निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यावर कंपनीनं जोर दिलाय.