दुचाकी निर्माता कंपनी Hero MotoCorp ने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना (VRF) जाहीर केली आहे. कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी ही घोषणा करण्यात आली आहे. या योजनेची घोषणा करताना कंपनीने सांगितले की, कंपनीची कार्यक्षमता सुधारणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. वर्षभरात कंपनीच्या वाहनांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे यामुळे कंपनीच्या कारभाराला चपळ आणि 'भविष्यासाठी सज्ज' करण्याच्या दृष्टीतून हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ही स्वेच्छानिवृत्ती योजना कंपनीत नवीन भरती करून कार्यपद्धतीत सुधार करण्यात येणार आहे.
सर्व कर्मचाऱ्यांसाठी ही योजना उपलब्ध
निवृत्ती योजना कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू असेल. म्हणजेच प्रत्येक कर्मचारी या योजनेसाठी अर्ज करू शकतो. कंपनीने पुढे सांगितले की, VRS या योजनेत निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना खूप फायदेशीर सुविधा मिळणार आहेत. कंपनीत 9,173 कायमस्वरूपी आणि 19,782 तात्पुरते किंवा कंत्राटी कर्मचारी आहेत, त्यांची एकूण संख्या 28,955 इतकी आहे.
VRS अंतर्गत हे फायदे मिळतील
VRS घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ठराविक रक्कम, भेटवस्तू, वैद्यकीय विमा कव्हरेज व करिअर सपोर्टसह विविध फायदे मिळतील.कंपनीने दुचाकी विक्रीत गेल्या 7 वर्षातील नीचांक गाठल्यामुळे हा निर्णय घेतला आहे.
Hero कंपनीचा व्यवसाय मंदावला
हिरो कंपनीच्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाल्यास, मार्चमधील मासिक विक्रीच्या आकडेवारीत मोठी घट झाली आहे. मात्र या दुचाकी कंपनीला अशी अपेक्षा आहे की, चालू आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या विक्रीत वाढ होईल. गेल्या महिन्यात मार्च 2023 मध्ये कंपनीने 5,19,342 वाहनांची विक्री केली, जी वार्षिक आधारावर 15 टक्क्यांनी जास्त होती. कंपनीच्या एकूण विक्रीत सुधार होत आहे.